Saturday, August 26, 2023

“हेलो”, “डॉ. मंगरुळकर”

 



सकाळी ९  वाजता अंजू चा फोन आला मेडिसिन ऑफिस मधून, अंजू “सारंग, तुला मंगरुळकर सरांनी OPD मध्ये बोलावलंय आत्ताच्या आत्ता”. मी “काय झालं?”, अंजू “मला नाही माहित, जा भेट.” तिने फोन ठेवला. पोस्टिंग जॉईन करून फक्त ४-५ दिवस झाले होते. अचानक मेडिसिन विभाग प्रमुखांनी बोलावलंय म्हटल्यावर मला टेन्शन आलं. सर फार कडक शिस्तीचे आहेत वैगैरे कानावर पडलं होतं माझ्या. भीत भीतच मी OPD चा दरवाजा ठोठावला. “मे आय कमिन सर?”, आतून एक हाय पीच आवाज आला अस्खलित पुणेरी इंग्रजीत “येस कम इन”. मी आत गेलो मंगरुळकर सर समोर खुर्चीत बसलेले होते. साधारण उंची, गोरा रंग, चेहऱ्यावर आत्मविश्वासी तेज, काळेभोर डोळे, भेदक नजर. ती नजर मला निरखून बघत होती, नुसती बघत नव्हती तर मला नखशिखांत स्कॅन करत होती. माझ्या मणक्यातून भीतीची एक लहर सरकली. इतक्यात शेजारून आवाज आला “सर, हा सारंग”. मी शेजारी बघितलं आमचे लेक्चरर पवन सर उभे होते ते बोलले “उद्यापासून तुमच्यासोबत राउंड घेईल सर”. मी मनातल्या मनात ‘अरे बापरे मला HOD सोबत राउंड घ्यायचा आहे’. मंगरुळकर सर माझ्याकडे बघून म्हणाले “उद्या सकाळी शार्प ७ वाजता ८ व्या मजल्यावर थांब आणि तुझा फोन नंबर दे”. मी माझा नंबर दिला त्यांनी त्यांच्या मोबाईलवर सेव्ह केला आणि मला call केला म्हणाले “माझा नंबर सेव्ह कर”. मी तो केला. “आता तू जाऊ शकतोस” एवढं बोलून ते समोर टेबलावर काही कागद चाळू लागले. मला कळेना मी तिथून जाव कि न जाव, पवन सरांना ते समजल त्यांनी मला जाण्याचा इशारा केला. ती माझी मंगरुळकर सरांसोबत पहिली भेट. हि घटना २०१२ मधली आहे.

दुसऱ्या दिवशी शार्प ७ वाजता माझा फोन वाजला, मी ठरल्या प्रमाणे ८ व्या मजल्यावर उभा होतो. मी फोन उचलला “हॅलो” पलीकडून आवाज “डॉ. मंगरुळकर”. मी “येस सर”, सर “तू आलायस का?” मी “हो सर”; सर “ठीक आहे, मी खाली रिसेप्शन ला आहे लिफ्ट ने वर येतो”. मग हे नित्याचाच झालं. मी रोज त्यांची ८ व्या मजल्यावर वाट बघायचो, सर शार्प ७ वाजता रिसेप्शन कौंटरवर यायचे, तिथे रिसेप्शनिस्ट त्यांच्या पेशंटची लिस्ट द्यायचा, सर मग लिफ्ट ने सर्वात वरच्या मजल्यावर यायचे आणि आम्ही चालत राउंड घेत जायचो. हा कार्यक्रम संपायला ९-९.३० वाजायचे. या दरम्यान प्रचंड शिकायला मिळायचे. सर प्रत्येक वेळेस विचारयाचे, या पेशंट बद्दल तुला काय वाटते. त्याचे स्पष्टीकरण द्यायला लागायचे, logic सांगावे लागायचे. पहिला आठवडा मला काहीच कळत नव्हते, हळू हळू मला त्यांच्या कामाची पद्धत समजायला लागली, पेशंटची नेमकी माहिती कशी घ्यायची, कमी वेळेत त्या माहितीच्या आधारे वैद्यकीय निदान कसं करायचं, कुठल्या नेमक्या आणि गरजेच्या टेस्ट करायच्या, अनावश्यक टेस्ट कशा टाळता येतील आणि कमीत कमी औषधे वापुरून पेशंट कसे बरे करता येतील यावर सरांचा भर असायचा. सर नेहमी म्हणायचे OPD मध्ये येणाऱ्या ८०% पेशंटला फारसं काही नसत. ते म्हणायचे “माझी पेशंट बाबत एक default setting आहे कि त्याला काही झालेलं नाही, ते मानसिक आहे, पेशंटला हे prove करावं लागेल कि तो आजारी आहे.” त्यांच्या या settings चा आम्हा रेसिडेंट लोकांना फार त्रास व्हायचा कारण पेशंट हा खरोखर आजारी आहे आणि त्याची लक्षणे मानसिक नाहीत हे आम्हाला prove करायला लागायचं. आत्ता १०-११ वर्षानंतर सरांचं असं logic का होतं ते समजत.

पेशंट treat करताना सर नेहमी पेशंटच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत जागरूक असायचे. ते नेहमी म्हणायचे “सारंग, नेहमी लक्षात ठेव. उपचाराचे दुष्परिणाम फक्त पेशंटवर होत नाहीत तर त्याच्या कुटुंबावर पण होत असते; तेव्हा आपण त्या कुटुंबावर अन्याय तर करत नाही ना याची शहानिशा करत जा”. एक किस्सा मला चांगला लक्षात आहे. एक पेशंट, अल्कोहोलिक लिव्हर चा admit झाला रक्ताच्या उलट्या होत्या म्हणून रात्री उशिरा, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलेलं, त्याची BP कमी होती ventilator चालू होता. पेशंटच वय साधारण ६५-७० होत. त्याला एक मुलगा होता तो रिक्षाचालक होता, त्याला २ मुलं होती, बायको आणि आई (पेशंटची बायको) असं कुटुंब. कसबस हातावरल पोट होत बिचाऱ्याचं. त्यावेळेचा ICU च्या ventilator चा खर्च ८-१० हजार प्रतिदिवस होता, बाकीचे औषधे आणि तपासण्या वगैरे पकडलं तर तो खर्च ५-६ दिवसात १.५ – २ लाखाच्या वर गेला असता. सर आले रीतसर पेशंट तपासला आणि समुपदेशन कक्षात आम्ही आलो, पेशंटचा मुलगा आणि बायको आतमध्ये आली, सर टेबलावर बसले होते मी, आणखीन एक मेडिकल ऑफिसर, ICU registrar उभे होतो. त्या नातेवाईकांची अवस्था बघून सरांच्या मनात घालमेल झाली, त्यांनी हळूच माझ्याकडे बघितलं, मी माझे हात माझ्या ओठावर ठेऊन आता सर काय बोलतात याकडे लक्ष देत होतो. क्षणभर आम्हा दोघांची नजर खिळली, मला जाणवलं कि सरांना तो क्षण जड झालाय, त्यांना सर निगेटिव्ह सांगणार आहेत. हलकी शी त्यांचा कपाळावर आठी पडली आणि परत मोकळी झाली. क्षणापुरता संवेदनशील चेहरा अचानक निर्विकार झाला. सुरुवातीला सरांनी पेशंटच्या आजाराविषयी व गांभीर्य विषयी कल्पना दिली. त्याच्या उपचाराच्या खर्चाचा अंदाज दिला आणि उपचार करून काही फारसा फायदा होणार नाही हेही सांगितलं. तो मुलगा भावनेपोटी हात जोडून म्हणाला “सर, कितीबी खर्च येऊ द्या माझी तयारी हाय, रिक्षा विकतो, पर बापाला नीट करा”. सर म्हणाले “अरे आत्ता जरी बरे झाले तरी महिना दीड महिन्यांनी पुन्हा असं होणार तेंव्हा काय करशील”. “महीन्याच आयुष्य मिळाल तरी चालतंय साहेब तुम्ही करा प्रयत्न” तो बोलला. मग सर बोलले “अरे पण रिक्षा वगैरे विकल्यावर तू खाणार काय आणि कुटुंबाचं काय तुझ्या”. “काहीतरी जुगाड हुईल साहेब” त्याच प्रतिउत्तर. सरांनी परत समजावलं “तुझे वडील त्यांच्या पद्धतीने जसे जगायचे तसे जगलेत, त्यांना तू वाचण्याचा प्रयत्न करतोयस ते पण बरोबर आहे. पण जशी वडिलांची जबाबदारी तू घेतोयस तशी कुटुंबाची नाही का तुझ्यावर? त्यांचावर अन्याय का करायचा? तू तुझ उत्पन्नाच साधन विकायला निघालायस, काही आठवड्यांनी वडील राहणार नाहीत तेंव्हा तुझे कुटुंब तुला दोष देणार नाही का? एक डॉक्टर म्हणून जीव वाचविण माझ कर्तव्य आहे तरीपण मला हे वाटत कि इथं आपण थांबूया, फार काही करायला नको. त्या मुलाच्या आईने पण त्याला समजावलं “लेका, सायेब सांगत्यात ते खर हाय, उगा पोरांची पोटं मारू नगस, काय करणार ह्यास वाचवून, परत जाऊन पिणारच त्यो बाबा, त्यापेक्षा सायेब सांगत्यात तसं कर, आपल्या भल्याच सांगत्यात ते.” मोठ्या मुश्किलीने तो मुलगा तयार झाला. पेशंट संपला आणि कुटुंब वाचल. ७-८ महिन्यांनी त्या रिक्षावाल्यान मला हाक मारली, मी कोरीडोर मधून जात होतो. “डॉक्टर साहेब, मला तुमच्या सरासनी भेटायचं आहे, साहेबांनी सल्ला दिला, माझी रिक्षा वाचली, माझ मोठं पोरगं  १०वी त बोर्डात आलंय.” मी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता यायला सांगितलं, सरांना सांगितलं त्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसलं. दुसऱ्या दिवशी त्या माणसाचे पेढे मी आणि सरांनी आनंदाने खाल्ले. हि घटना माझ्या मनावर इतकी कोरली गेली, आज माझ्या व्यवसायात जेंव्हा मी असे सल्ले देतो. अनेकांना या गोष्टीचं अप्रूप वाटत काहींनी बोलूनही दाखवलंय. याच श्रेय मी मंगरुळकर सरांना देतो.

सर नेहमी वैज्ञानिक दृष्टीकोन व logic च्या माध्यमातून विचार करायचे, त्यामुळे त्यांना बऱ्याचदा लोकांच्या टीकेला सामोरे जायला लागायचे, काहीही झाले तरी ते आपले विचार सोडत नसत. एक असाच किस्सा घडला. सरांच्या सोसायटी मधील एक गृहस्थ रात्री हॉस्पिटल ला भरती झाले, त्यांना दररोज भरपूर सिगारेट ओढायची सवय होती त्यामुळे त्यांना स्मोकर्स कफ (COPD-Bronchitis) होता, सरांचे घरगुती संबध असल्याने सर त्यांना नेहमी सिगारेट बंद करायला सांगायचे पण तो गृहस्थ काही ऐकायचा नाही. त्याचा खोकला वाढला होता, खोकता खोकता त्याला उलटी झाली आणि उलटीतून रक्त पडलं, हे रक्त खोऊन फुफुस्सातून येतय का जठर-अन्न नलिकेतून येतय हे स्पष्ट सांगता येत नव्हते, कारण खोकला आणि उलटी हे एकत्रच यायचे. म्हणून याचा शोध घ्यायला सरांनी त्यांना भरती केलं होतं. सरांनी त्यांना “बेरियम स्वोलो” नावाची  क्ष- किरण तपासणी सांगितली. यात बेरियम चे सोल्युशन प्यायला द्यायचे व अन्न नलीकेचा क्ष- किरणांचा फोटो काढायचा. त्यात असे आढळले कि त्यांच्या अन्न नलिकेत काही दोष होता. मग सरांनी अन्न नलिकेची इंडोस्कोपी करायला सांगितली, ती रीतसर झाली त्यात अन्न नलिकेत तळाला गाठी वाढलेल्या दिसल्या, त्याचा तुकडा तपासायला घेतला, २ दिवसात समजलं कि अन्ननलिकेचा कर्करोग आहे म्हणून. CT scan झाले कर्करोग पसरला होता आणि उपचाराच्या पलीकडे गेला होता. सरांनी त्यांचे समुपदेशन केलं, आजाराची परिस्थिती सांगितली Pallitive care उपचार पद्धतीचा सल्ला दिला.  तासाभराने राउंड संपल्यावर मी व पवन सर पेशंटकडे गेलो, कर्करोग तज्ञाने सांगितलेले उपचार सुरु करायचे होते. त्या पेशंटची बायको चिडलेली होती, रागारागाने आम्हाला बडबडायला लागली, २ दिवस निदान लावायला उशीर झाला म्हणून तो पसरला, ती बेरियम टेस्ट outdated आहे, मी वाचल इंटरनेटवर, डायरेक्ट इंडोस्कोपी केली असती तर चालल असता.... ब्ला, ब्ला, ब्ला. आम्ही तिला शांत करायचा प्रयत्न करत होतो, तिला समजून सांगत होतो कि हा कर्करोग इतका पसरायला २-३ महिने जावे लागतात पण ती ऐकत नव्हती. ती म्हणाली मंगरुळकर चाप्टर बंद करायचा आहे आम्हाला, अमुक अमुक डॉक्टर कडे ट्रान्स्फर करा आमची केस. शेवटी आम्ही सरांना कळवलं, सर म्हणाले त्यांना जे योग्य वाटते ते करुदे. दुसऱ्या फ़िजिशिअन ने पण हेच सांगितल्यावर त्यांनी सरळ हॉस्पिटल बदललं, ८-१० दिवसांनी सरांनी आम्हाला विचारल नेमक काय झालं. आम्ही सर्व सविस्तर सरांना सांगितलं. मला वाईट वाटलेलं, मी म्हणालो सर एवढ logic कस कळल नाही तिला. सर हसून म्हणाले “हे बघ, हि एक मानसिक अवस्था असते, कुणावर तरी खापर फोडायचं असत. काय आहे इतके वर्ष तो माणूस माझ्याकडे दाखवत होता, सोसायटीत होता, त्याला समजावून सांगायचो पण सिगारेट काही सुटत नव्हती, त्याची बायको एकदाही त्याच्याबरोबर भेटायला आली नव्हती, कधी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली नव्हती. आता अचानक इतका मोठा आजार समोर आल्यावर ते तिला स्वीकारू वाटत नव्हत, त्या सिगारेट मुळे हे घडलंय हे स्वीकारायचं नव्हत म्हणून ती अवस्था, असे प्रसंग येणार तुमच्या आयुष्यात, त्याचा सामना करायलाच पाहिजे. सगळे तुम्हाला चांगलं कधी म्हणणार नाहीत. कोण ना कोण वाईट म्हणणार आहेच. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायच.” पुढे नंतर सरांनीच सांगितलं कि त्या पेशंटची दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये एका कँन्सर सर्जन ने सर्जरी केली आणि संध्याकाळी तो पेशंट मेला.

वेळे बाबतीत सरांना जरासुद्धा बेशिस्तपणा आवडत नसे. दीनानाथ ला दररोज सकाळी ७ म्हणजे, ७ वाजता सर हजर असायचे. आम्हा एका सुद्धा रेसिडेंट ला आठवत नाही कि सर लेट आलेत म्हणून. पहाटे ४.३०  - ५ वाजता उठणार, रोज सतार वाजवण्याचा रियाझ करणार. शार्प ७ ते ९ राउंड घेणार, ९-९.३० ला त्यांची प्रायव्हेट OPD सुरु व्हायची, ती लगबग १ वाजता संपायची, एक वाजता सरांना डिस्चार्ज समरी ची softcopy पाठवावी लागे किंवा सिनियर रेसिडेंट/लेक्चरर ने ती चेक करायची असा नियम होता. संध्याकाळी सर्व पेशंटचे updates त्यांना द्यायला लागायचे. चुकून आम्ही विसरलो तर रात्री ९.३० – १० च्या सुमारास त्यांचा कॉल यायचा. HOD असल्याने दर सोमवारी त्यांची OPD असायची. दररोज OPD ड्यूटी वर असलेल्या रेसिडेंट आणि मेडिकल ऑफिसर यांच्या नाश्त्याचा खर्च ते मेडिसिन department तर्फे करायचे. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. कुणा विद्यार्थाला अडचण असेल तर मदत करायचे, वेळप्रसंगी हॉस्पिटल प्रशासनाशी विद्यार्थासाठी भांडण पण करायचे. आम्हाला आठवडी सुट्टी वगैरे काही प्रकार नसायचा, जेंव्हा कधी कुठल्या कामानिमित्त सुट्टी हवी असेल तर आधी आम्हाला कामासाठी एक लोकम द्यायला लागायचा त्या रेसिडेंट ची सही घेऊन मग सरांकडे रजा अर्ज द्यायला लागायचा. शक्यतो सर कधी अडवत नसत पण कारणमीमांसा मात्र करावी लागत असे. कधी हॉस्पिटल चे काम अडले नाही व मुलांचे सुद्धा. एकदम विन-विन.

सरांना शास्त्रीय संगीताची फार आवड, कुणी जाणकार व्यक्ती भेटले कि त्यांचाशी भरभरून बोलत असे. ते स्वत: टेक्नॉलॉजी वापरत असत, भारतात कॉम्पुटर अस्तित्वात असल्यापासून ते वापरत होते, त्या काळात ते digital OPD करत असे. IPD नोट्स व डिस्चार्ज समरी साठी त्यांनी व्हाईस रेकॉर्डिंग मशीन आणली होती. त्यात ते notes dectate करायचे व नंतर स्टाफ ते type करत. ते मराठी आणि ईंग्रजी ब्लॉग्स लिहित असत, त्याचं बघून मीही मग ब्लॉग्स लिहायला लागलो. ते आवर्जून माझे ब्लॉग्स वाचायचे आणि मला प्रोस्ताहन द्यायचे. माझ्यात असलेला एक सुप्त गुण त्यांच्यामुळे बाहेर आला.

त्यांचाकडे कुणी तक्रार घेऊन गेलं कि दोन्ही बाजू शांतपणे ऐकणार, त्याचं आकलन करणार आणि logic च्या मदतीने न्यायनिवाडा देणार. दोन्ही पार्टी ला काय समज द्यायची ते आपसूक बसायचं. अगदी कमी शब्दात, स्पष्ट.

एथिकल मेडिकल प्रक्टिस त्या माणसाने कधी सोडली नाही. एकदा एका कार्डीयोलोजीस्ट ने एका पेशंटला ४ stent घातले, खरतर त्याला बायपास गरजेचे होते पण त्या पेशंटला ऑपरेशन ची भीती वाटत होती म्हणून असं केलं, तेंव्हा सर त्या डॉक्टरवर खूप भडकले, तसा संयमी माणूस पण माझ्यासमोर त्या डॉक्टर ला झापायला चालू केले. मी त्यांचा रुद्रावतार तेंव्हा पहिल्यांदा बघितला. एकदा दुसऱ्या युनिट च्या एका कन्सल्टंट चे सर लोकम होते, त्यांचा पेशंटची माहिती द्यायला त्या युनिट ची एक सिनियर रेसिडेंट आमच्याबरोबर राउंड आलेली, तिला एका पेशंटची काही औषधे का चालू आहेत ते सांगता येईना. बिचारीला सर संपूर्ण राउंड संपेपर्यंत झापत होते. डॉक्टर असणे म्हणजे नेमकं काय असा क्लास तिचा घेतला, अर्थात तिच्याबरोबर मलाही जोडे मिळतच होते. ती घटना अजूनही ती रेसिडेंट विसरली नाही.

दर दसऱ्याच्या जवळच्या रविवारी, सर सर्व आजी-माजी रेसिडेंट डॉक्टर्सना पार्टी द्यायचे तेही कुटुंबासहित, मनमोकळे पणे सर्वांशी बोलायचे. त्यातल्या एका पार्टीत सर गमतीने माझ्या बायकोला सांगत होते, “मी याला घाबरतो, त्याने कधीच माझी परमिशन घेतली नाही, तो सरळ त्याचा निर्णय सांगतो.” मी चमकलो, मला समजेना मग सरांनी उदाहरण दिलं मला सुट्टी हवी असेल तर मी कशी मागायचो ते. मी आधीच लोकम प्लान केलेला असायचा. सरांना म्हणायचो “सर, मी अमुक अमुक तारखेला सुट्टी घेतोय, हि हि कामे पेडींग होती ती केलीयेत, माझ्या ऐवजी अमुक अमुक तुमच्या सोबत राउंडला येईल, त्याला सर्व कामे सांगितली आहेत.” सरांना मी कधीच असं नाही विचारल कि “मी अमुक अमुक तारखेला सुट्टी घेऊ का?” सर म्हणाले मला याला कधीच नकार देता आला नाही कारण याने कधीच परवानगी मागितली नाही. सरांचं बोलण्याच्या भाषेकडे एवढे बारीक लक्ष असायचं कि बस्स. माझी बायको पण हसायला लागली म्हणाली “घरीसुद्धा असंच असत याचं”. तेंव्हा पासून मी परमिशन साठी विचारयला लागलो, सर प्रत्येक वेळी हसायचे आणि म्हणायचे राहू दे लोकम कोण आहे ते सांग.  

दीनानाथ सोडताना सरांना भेटलो ग्रामीण भागात प्रक्टिस ला जातोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला, म्हणाले मी हि कर्जत ला सुरुवातीला प्रयत्न केले होते पण तिथल्या स्थानिक विचारसरणीची व राजकारणी लोकांनी मला टिकू दिलं नाही म्हणून मी आपलं पुण्यातच स्थायिक झालो. मला म्हणाले तुला जमेल, तू तिथला आहेस आणि तिथल्या लोंकाना वेगळ्या भाषेची सवय असते ती तुला जमते. त्या दिवशी मला त्यांनी भरभरून मार्गदर्शन केले आणि आशीर्वाद दिले. २-३ वर्षांनी स्वत:ची OPD सुरु करायची होती, माझी इच्छा होती कि सरांच्या हस्ते उदघाटन करायचं. मी सरांना एक फोन केला, सर एका शब्दात तयार झाले फक्त २ अटी घातल्या उदघाटन रविवारी ठेवणे आणि ड्रायव्हर दे म्हणाले. मी एका पायावर तयार झालो. सरांनी नियमाप्रमाणे वेळ घेतली. ठरल्याप्रमाणे वेळेत घरी आले, यथेच्छ जेवले, गप्पा मारल्या. मला म्हणाले मला २ तास झोपायचं आहे (दुपारची झोप त्यांना प्यारी होती) आमच्या गावाकडच्या साध्या घरात, एका खोलीत गाढ झोपले. संध्याकाळी फीत कापली, थोडं भाषण केलं आणि पुण्याला परत गेले. दुसऱ्या दिवशी सरांचा फोन आला म्हणाले “सारंग, कालचा दिवस फार छान गेला, खूप छान जेवलो, बऱ्याच दिवसांनी दुपारी गाढ झोप लागली रे, thank you for this”. मला म्हणजे आकाश ठेंगणे झाले. ती माझी शेवटची दीर्घ भेट.

नंतर अधून मधून फोन व्हायचा, कोविड आले, दसरा पार्टी झालीच नाही, पहिली कोविड लाट संपली, प्रचंड अनुभव आलेला, सरांशी गप्पा माराव्या वाटायचं आज जाऊ, उद्या जाऊ म्हणून राहून गेलं. दुसरी कोविड लाट आली एकेदिवशी समजलं सरांना कोविड झालाय आणि सर व्हेन्टीलेटर वर आहेत, घालमेल झाली, लॉक डाऊन मुळे जाता येईना. फोनवर सुजाता आणि पवन सरांकडून कडून माहिती घेत होतो. काही दिवसांनी ते बरे झालेत समजले. देवाचे आभार मानले. त्यांना फोन केला, छान बोलले. त्यांनी त्यांचा कोविड चा अनुभव लिहिला, तो वाचला, खतरनाक आहे. नंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं “Modern medicine: Getting Better or Bitter? reflections of clinician” नावाचं, सध्या अमेझॉन वर उपलब्ध आहे. मला त्यांनी फोन केला पुस्तकाबद्दल माझ्या प्रतिक्रिया मागितल्या. मी ते अर्धच वाचलं होतं, मी म्हणालो “सर तुमचे सगळे विचार तुम्ही यात टाकलंय असं दिसतंय, माझ अजून पूर्ण झालं नाही वाचून, पूर्ण करतो मग पुन्हा चर्चा करू”. सर “ठीक आहे” म्हणाले. अजून ते पूर्ण झाले नाही.

१ महिन्यापूर्वी समजलं सरांना Lung cancer आहे म्हणून, भेटायला गेलो पण त्यांना त्यात बुरशीचे संसर्ग झाल्याने भेटण्याचा योग आला नाही. बाकीच्याकडून कळाल होतं कि आता स्टेबल आहेत. नंतर भेटू म्हणून आलो परत. परवा सुजाताचा फोन आला सरांना देवाज्ञा झाली. आतलं काही हरवल्याची भावना झाली. कसाबसा पुण्यात पोचलो त्यांच्या पार्थिवावर डोक टेकलं म्हणालो “सर बरीच चर्चा बाकी राहिली, पुस्तक वाचण बाकी राहिलं, तुम्हाला भेटू शकलो नाही, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा”.

असा माणूस पुन्हा होणे अवघड आहे.

Tuesday, March 31, 2020

इफेक्ट - साईड इफेक्ट



कोल्हापूर ला काम करत असतानाची गोष्ट आहे. एका सिनीअर आय सी यु मेडिकल ऑफिसर चा फोन आला "सर एक फिट आलेला पेशंट आलाय, आत्ता स्टेबल आहे. आधी ******* या हॉस्पिटल ला ऍडमिट होता. " मी ठीक आहे बघतो म्हणालो, थोड्या वेळाने तो पेशंट बघितला. साधारण ३५-३६ चा तरुण होता, सावळा रंग , भरल्या अंगकाठीचा, साधारण ८०-८५ किलो वजन असावं त्याचं. त्याला अधूनमधून सारख्या फिट येत होत्या, कोल्हापुरातल्या २ चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता तिथं त्याच्या बऱ्याच तपासण्या झाल्या होत्या पण निदान काही लागलं नव्हतं. आमच्या एका मेडिकल ऑफिसर च्या ओळखीने इथे ऍडमिट केलं होतं. मी त्याला तपासलं असं फिट येण्यासारखं काही शारीरिक कारण सापडलं नाही. त्याचा एम आर आय स्कॅन बघितला तो हि नॉर्मल होता . त्याला ह्या आधी कधीच फिट चा आजार नव्हता, त्याचं काही मेटाबोलिक कारण आहे का त्याचा विचार केला, पण आधीच्या डॉक्टरांनी सुद्धा हा विचार केला होता कारण त्या संबंधीचे सर्व टेस्ट करण्यात आले होते ते सर्व नॉर्मल होते. त्याला डायबेटीस होता त्या साठी तो आयुर्वेदिक औषधे घेत होता गेले ८-९ महिने. गेले १ महिना तो फार चिडचिड करत होता असं त्याच्या बहिणीने मला सांगितलं. आता तर जास्तचं करत होता; त्याला बांधून घालायला लागत होतं.
माझ्या मनात त्याला मेंदूज्वर असल्याची शंका येत होती किंवा अजून काही रेअर मेटाबोलिक कारणं त्या साठी काही टेस्ट प्लॅन करायचं डोक्यात चाललं होतं, त्याच्या मणक्यातील पाणी तपासायला घ्यायचं असा विचार करत होतो. इतक्यात दुसरा एक विचार मनात आला त्या आयुर्वेदिक औषधांचा साईड इफेक्ट तर नसेल. मी तिच्या बहिणीला विचारलं कि त्या औषधांबद्दल काही माहिती आहे का? ती मला एवढाच सांगू शकली एक पाउडर होती आणि एक काढा त्याच्या पेक्षा जास्त काही तिला माहित नव्हतं किंवा ज्या डॉक्टर कडे तो औषधें घेत होता त्या बद्दलपण माहिती नव्हती. हॉस्पिटल मध्ये एक BAMS झालेली मेडिकल ऑफिसर होती; तिला विचारलं डायबेटीस मध्ये आयुर्वेदिक रेमेडी काय आहे म्हणून.तिने काही वनौषधींची नावे घेतली आणि एक नाव घेतलं शिसे. शिसे म्हणजे लेड (lead) हा एक जड धातू आहे. त्याच्यामुळे सुद्धा फिट येऊ शकते. bingo मी लगेच त्याची ब्लड लीड लेवल करायला सांगितली, ती प्रचंड जास्त होती. त्यावर लगेच उपचार सुरु केले. २ दिवसात त्याला फिट यायची बंद झाली ४-५ दिवसात त्याच वागणं पण सुधारलं.
मी त्याला म्हटलं "डायबेटीस साठी तू ऍलोपॅथी खा किंवा आयुर्वेदिक खा ते तुला आयुष्यभर खायला लागेल मग तू आयुर्वेदिक च्या मागे का लागला आहेस". तो म्हणाला "सर ऍलोपॅथी औषधाला साईड इफेक्ट असतात पण आयुर्वेदिक औषधाला नसतात म्हणून घेत होतो." मी त्याला म्हणालो "मग हे काय होतं, साईड इफेक्टच ना? ऍलोपॅथिक औषधाला साईड इफेक्ट असतात कारण ती अभ्यास करू शोधलेली आहेत, साईड इफेक्ट ला कसं ट्रीट करायचं हेही सांगितलेलं आहे. आयुर्वेदात कदाचित या साईड इफेक्ट बाबत म्हणावा तेवढा अभ्यास झाला नसावा त्यामुळे कदाचित हा गैरसमज असावा. कारण जे औषधं शरीरावर परिणाम करत असेल तर ते दुष्परिणाम पण करणार. दुष्परिणाम म्हणजे नको असलेले परिणाम, ते परिणामच आहेत फक्त आपल्याला नको असतात."
मी आयुर्वेदाच्या विरोधात नाही. ज्याने त्याने आपल्या इच्छेप्रमाणे उपचार घ्यावे फक्त एकच लक्षात ठेवावे औषधं कोणतही असो आयुर्वेदिक, ऍलोपॅथिक, होमिओपॅथिक त्याला जर परिणाम असेल तर दुष्परिणाम पण नक्की आहे.

If there is effect there should be side effect, no side effect no effect.
                                                  -डॉ. सारंग कोकाटे

Thursday, November 21, 2019

‘पुरा’नुभव


४ ऑगस्ट २०१९, रविवार. पुण्याहून घरी येत होतो. घरच्यांचा फोन वर फोन, कधी येतोयस कधी येतोयस. का तर नदीला महापूर आलेला होता कोणत्याही क्षणी नरसोबावाडी-कुरुंदवाड चा पूल बंद होणार होता.  कुरुंदवाडमध्ये प्रवेश केल्या केल्या शिवाजी पुतळा आहे त्याच्या समोर जो रस्ता आहे त्यावर पाणी आले होते. त्याची पातळी अजून वाढली कि ते पाणी जोरदार वाहणार होतं, हा नेहमीचा अनुभव. याला आमच्या भागात पाण्याला धार पडली असं म्हणतात. एकदा का हि धार पडली कि मग तिथं गाडी तर सोडाचं चालताही येत नाही. प्रयत्न केला तर पुरात वाहून जाण्याची शक्यता दाट, म्हणून धार पडायच्या आधी मी घरी यावं अशी आमच्या घरच्यांची इच्छा. रात्री ११ वाजता शिरोली फाट्यावर पोहोचलो, वेड्यासारखा पाऊस पडत होता, समोरचं अजिबात दिसत नव्हतं. शिरोली पुलाच्या कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडला पाणी आलं होतं आणि असा अंदाज होता तासाभरात दुसऱ्या बाजुनेपण पाणी भरणार होतं. बऱ्याचश्या बसेस बंद केल्या होत्या. मला जयसिंगपूरला कोणत्याही परिस्थितीत पोहचायचं होतं, तिथं मला न्यायला वडील आणि एक मित्र येणार होते. बऱ्याच वेळाने मला कर्नाटकची एसटी मिळाली, गर्दी होती, कसाबसा  जयसिंगपूरला पोचलो. वडील कधीच येऊन थांबले होते. गाडीतून आम्ही घरी जायला निघालो. वाडी-कुरुंदवाड पुलावर १-२ इंच पाणी आलं होतं, तीच परिस्थिती शिवाजी पुतळ्यासमोर होती. रात्री १२.३०- १ च्या दरम्यान घरी पोचलो. सगळं गाव जागं होत. प्रत्येकाच्या तोंडात पुराचीच चर्चा. जोरदार पाऊस सुरूच होता.
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे OPD सुरु केली पण एकदमच शांत होती. २ व्हीलर वरून आख्या गावाची चक्कर मारली, रात्रीत वाडी-कुरुंदवाड रस्त्यावर ३-४ फूट पाणी आलं होतं, दुसऱ्या बाजूला तेरवाडचा रस्ता पण बंद झाला, शिरढोण मार्गे इचलकरंजी रोड  तर कधीच बंद झाला. आता फक्त एकच रस्ता उरला होता गावातून बाहेर पडायचा तो म्हणजे मजरेवाडी मार्गे, गुरुदत्त कारखाना तिथून हुपरी.
दुपारी साधारण ३ च्या दरम्यान, गावातले एक माझे डॉकटर मित्र होते गायनॅक त्यांचा फोन आला "अरे सारंग तुझ्या हॉस्पिटलला बेड आहे का रे?" मी "आहे कि, का?"; सर "अरे सकाळी मी एक सेक्शन केलं पण दुपारपर्यंत माझ्या हॉस्पिटलमध्ये पाणी आलंय, तुझ्याकडे शिफ्ट करायचं म्हणतोय, २००५ ला तुझ्या कडे पाणी आलं नसेल ना?". कुरुंदवाडच्या इतिहासात आजपर्यंत २००५ चा महापूर हा सगळ्यात मोठा होता, त्यावेळी जवळपास ८०% गाव बुडालं होतं. मी " नाही सर नव्हतं आलं, तुम्ही पाठवा पेशंट काही प्रॉब्लेम नाही". तासाभरानं पेशंट आला, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काही मिनिटात सर आले आमच्यात थोडं डिस्कशन झालं आणि तिला पुढची पोस्ट ऑपरेशन ची ट्रीटमेंट सुरु केली. इकडं पाणी गावात शिरत होत, शालिकाच्या शाळेत पाणी गेलं होत त्यामुळे तिला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ती घरीच होती. तिचा आणि संयुजांचा धुडकुस चाललेला त्यात भर म्हणजे त्या पेशंटचा २ वर्षांचा मुलगा होता राजवीर, तो पण त्या दंग्यात सामील झाला. इकडं सगळ्या गावात मात्र चिंता पसरत होती, पाणी झपाट्याने वाढत होतं, कोयना, राधानगरी धरणभागात पाऊस थांबत नव्हता त्यामुळं अजून पाणी वाढणार होती. मी न्यूज चॅनेल लावून बसलो. मीडिया नुसता मोदी आणि अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होता का तर काश्मीर प्रश्न सोडवला कलम ३७० रद्द केलं या साठी. मराठी न्यूज चॅनेलवर पण तेच. खाली बातम्यांच्या पट्या फिरतात त्यात मात्र पाऊस, पुणे, नाशिक, मुंबई मध्ये वाहतुकीची कोंडी, महालक्षमी एक्सप्रेस मधले प्रवासी असे वाचवले याची चर्चा. बाकी काहीच अपडेट नव्हते. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती असताना जलसंपदा मंत्री मात्र काश्मीर प्रश्न सोडवल्यामूळ आनंदात होते आणि रस्त्यावर डान्स चालला होता. असो.
बुधवारी पाणी घरापासून फक्त १०० फुटावर राहिले होते, उरला सुरला मजरेवाडी रस्ता एव्हाना बंद झाला होता. आमचं गाव आता ३ बेटांसारखं दिसत होतं. एक छोटा बेट राजवाडा, दुसरा सगळ्यात मोठा बेट म्हणजे माळभाग, इथं माझं घर आणि हॉस्पिटल होतं. तिसरा सगळ्यात लहान बेट म्हणजे दत्त कॉलेज परिसर. बहुतांश लोक गाव सोडून आधीच गेले होते. राजवाडा भागात काही लोकं निर्वासित झाली होती तिथं साधारण २०००-२५०० माणसं होती, आमच्या म्हणजे माळभागावर सगळ्यात जास्त १०-१५ हजार लोक निर्वासित झालेली आणि दत्त कॉलेज परिसरात हजारभर माणसं होती. या तिन्ही ठिकाणी जायचं एकचं साधन म्हणजे बोट. भैरेवाडी म्हणून एरिया पूर्ण बुडाला होता त्यांचे २ मजले पाण्याखाली होती. तिथं शेकडो माणसं अडकली होती, त्यांची जी दुभती जनावरं होती त्यांना तिथल्या उंच इमारतीच्या गच्चीवर बांधण्यात आलं होतं. त्यांना सांभाळण्यासाठी पुरुष मंडळी तिथं राहिले होते व लहान मुले, बायका यांना माळभागावर राहायला पाठवलं होतं. ३ त्यातली कुटुंबं माझ्या घरी राहायला होती, बाकीची आपापल्या ओळखीने राहत होती तर बरेच लोक रस्ता बंद व्हायच्या आधी गुरुदत्त कारखान्यावर गेली होती.
गावामध्ये जसजसं पाणी वाढत होतं  तसतसं त्या भागातली लाईट बंद करत होते. आईला २००५ च्या पुराचा अंदाज होता, पिण्याचा पाणी पुरवठा लवकरचं बंद होणार होता. सोमवारपासून आम्ही घरातली सगळी माणसं RO केलेले पाणी हळूहळू भरायला लागलो, दर तासादोन तासाला घरच्या RO फिल्टर मधनं फक्त १५ लिटर पाणी मिळायचं, आम्ही ते भरायचो आणि वरच्या मजल्यावर ४-५ पिंप ठेवले होते त्यात भरायचो. ते सर्व पिंप भरायला बुधवार उजाडला. बुधवारी संध्याकाळी आमच्या एरियाचा DP पाण्याखाली गेला आणि घर व हॉस्पिटल ची लाईट गेली. दरम्यानच्या काळात आईवडिलांनी गहू, तांदूळ व डाळी १५-२० दिवस पुरतील या हिशोबाने भरून ठेवलं होतं.
या काळात वैद्यकीय अनुभव तर तुफान आले. इन्व्हर्टरवर बुधवारची रात्र कशी बशी गेली, माझी ECG मशीन मी चार्ज करून घेतली होती. आता जवळपास ८० टक्के गाव पाण्यात होतं माझं आणि आणखी २-३ जणांचे दवाखाने फक्त चालू राहिले होते. आम्ही ठरवलं कि आता रस्ता मोकळा होईपर्यंत मोफत उपचार करायचे त्यामुळं दवाखान्याला भरपूर गर्दी. एक जण आला अति दारू प्यायल्याने बेशुद्ध होता त्याला फिट येत होत्या. त्याला ऍडमिट केलं, दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला त्याला समजावून घरी पाठवलं. संध्याकाळी भैरेवाडीतली ओळखीतले ३ कुटुंब राहायला आली. ती ८-१० जण, आम्ही घराचे ६ जण आणि बाळंतिणीचे ४-५ जण अशी घरात २० एक लोकं होती. त्या सगळ्यांचं जेवणखाणं वगैरे करण्यात आमची हि आणि आई लागली होती. जिन्याच्या पोर्च आमचं स्वयंपाक घर झालं होतं. गुरुवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान पाणी आमच्या घराच्या मागच्या बाजूला लागलं. पहाटे ४ ते सकाळी ११ वाजेपर्यंत आख्या तळमजल्यावरचं सामान ३ ऱ्या मजल्यावर शिफ्ट केलं होतं. गुरुवारी संध्याकाळी जवळपास ९५ टक्के कुरुंदवाड पाण्याखाली होतं. घरात मागच्या बाजूला पाणी चढलं. आता माझ्याकडे अस्वस्थ असलेले पेशंट यायला लागले होते. कुणाचं शेतीच नुकसान झालेलं, कुणाचं घर पडलेलं, कुणाचं सामान वाहून गेलेलं. माझ्याकडे औषधं होती तोपर्यंत मी ती दिली. समोरच्या मेडिकल वाल्याने मात्र तप्तर सेवा दिली. लोकांकडे हार्ड कॅश नव्हती. त्याने उधारीवर  ६०-७० हजाराचा माल वाटला. शुक्रवारी घराच्या पुढच्या साईडला म्हणजे हॉस्पिटलमध्ये पाणी आलं. जवळपास माझं घर रस्त्यापासून ३ फूट उंचावर आहे. माझ्या घरात १ फूट पाणी होतं. म्हणजे रस्त्यावर ४ फूट (म्हणजे कमरेच्या वर पाणी आलं होतं). त्या पाण्यातच माझी ओ . पि . डी  चालायची. एक गरीब कुटुंब आलं लहान बाळाला घेऊन, त्याला चांगलाच ताप आलेला आणि खूप खोकला होता. माझ्याजवळची औषधं  संपली होती. समोरच्या मेडिकल मध्ये पण संपली होती. अजून एक मेडिकल दुकान उघडं होतं  तिथं त्या पोराचा बाप जाऊन आला अर्थात कमरेएवढ्या पाण्यातनं, त्याला १०० रुपये कमी पडत होते. मी २०० रुपये दिले म्हणालो त्या पोराला कायतरी खायला पण दे. तो बापडा हात जोडून बघत राहिला, मी त्याला थोपटलं आणि जा म्हणालो. २ दिवसांनी तो परत आला २०० रुपये द्यायला. स्वाभिमानी होता. त्याला कसबस समजावलं आणि म्हणालो लेकरांसाठी दूध घे याच; १०० रुपये लिटरनं मिळतंय आजकाल. आशीर्वाद देत गेला.  दुसऱ्या एका गायनॅक डॉक्टरांचा मला फोन आला; त्यांच्याकडे ८ महिन्यांची प्रेग्नेंट बाई ऍडमिट होती, तिला न्यूमोनिया झाला होता. धाप लागत होती. डॉक्टरांनी मला कंसल्टेशन ला येशील का म्हणून विचारलं. त्यांचं हॉस्पिटल १ कि.मी. लांब आहे, तिथं जायला मला साधारण १००-२०० मीटर अंतर कमरेएवढ्या धार पडलेल्या पाण्यातून जावं लागणार होत . या दरम्यान माझा जरा जरी तोल गेला असता तर मी वाहून गेलो असतो. मी क्षणभर विचार केला आणि हो म्हणालो. ते १००-२०० मीटर अंतर पार करायला मला दीड तास लागला. मी पेशंट बघितला, ट्रीटमेंट प्लॅन दिला, परत जाताना मात्र माझ्या दिमतीला ४ माणसं आली त्यांनी मला परत सोडलं. पुढं २ दिवसांनी सरांचा निरोप मिळाला कि पेशंट आऊट ऑफ डेंजर आहे.
शुक्रवार-शनिवार पर्यंत कोणत्याच सरकारी खात्याची मदत आलेली नव्हती. लोकांकडे खायला अन्न कमी पडायला लागलं, गावातल्या काही पुढारी मंडळींनी एक लाकडी नाव घेतली आणि अडकलेल्या लोकांची सुटका करायला सुरु केलं. गावातल्या एका धान्य व्यापाऱ्याच्या गोडावून मध्ये पाणी शिरलेलं, जी चांगली धान्याची पोती होती ती त्याला पैसे देऊन मागत होती. त्याने नकार दिल्यावर त्याच्या समोर गावातल्या लोकांनी त्याचं आख्ख दुकान लुटलं आणि घराघरात धान्य वाटत सुटली. आम्हा डॉक्टरांना पण प्रश्न पडला होता आता करायचं काय, कारण लोकं पुराच्या घाण पाण्यानं अंघोळ करत होती, शौचालयं नसल्यानं कुठंही बसत होती, त्यामुळं साथीचे आजार पसरण्याची भीती होती. सर्दी-खोकला ताप, जुलाब-उलट्या, स्किन इन्फेक्शन यांनी ऊत आणला होता. ट्रीटमेंट द्यायला डॉकटर तर होते पण औषधं नव्हती. कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन ने जयसिंगपूर, इचलकरंजी असोसिएशन च्या मदतीने, बोटीतून जाऊन औषधं आणली. ती कुरुंदवाडच्या ३ टापूवरील डॉक्टरांकडे पोचली आणि दिवसरात्र वैद्यकीय सेवेचा घाणा फिरत होता. रोज कॅम्पवर कॅम्प होऊ लागले. ४ पोरं अशी सापडली ज्यांना मोठेमोठे गळू होते, त्यांना ड्रेन करणं गरजेचं होतं. त्यांना हॉस्पिटलला घेऊन येत होतो तोवर आमचे सर्जन मित्र भेटले. त्यांना घेतलं त्यांनी लीलया ते गळू फोडले ते पण बॅटरीच्या उजेडात. त्या पोरांना औषधं दिली आणि पाठवलं. असंच एका रात्री साडेअकरा-बारा च्या  एक पेशंट आली. तिच्या छातीत दुखत होतं. धाप लागत होती. ३ महिन्यापूर्वी तिची अँजिओ प्लास्टी झाली होती. माझी आई मेणबत्ती धरून उभी होती, लाईटच नव्हती. त्या पेशंट ची BP २४०/१२० होती. ECG मध्ये हृदयावर ताण पडतोय असं वाटत होतं (Unstable Angina). ऑक्सिजन होता तो तिला लावला. माझ्याकडे ना औषधं होती ना कुठली वैद्यकीय उपकरणं चालवू शकत होतो. हॉस्पिटलचं बरंच सामान हलवलं होतं, त्यामुळे कुठं काय ठेवलंय याचा पत्ता नव्हता. एकतर ती गाव सोडून बाहेर कुठे उपचार घ्यायला जाऊ शकत नव्हती आणि प्रयत्न केला असता तर तिला उपचार मिळायला ५-६ तास लागले असते. तोपर्यंत २४० BP मुळे तिला स्ट्रोक बसला असता किंवा डेथ झाली असती. जे काय व्हायचं होत ते फक्त इथंच होतं त्यामुळे मी ती मेणबत्ती घेतली आणि जिथं सामान ठेवले तिथं काय सापडतंय का बघितलं. ५-१० मिनिटं शोधल्यावर मला betaloc नावाचं इंजेक्शन सापडलं, त्यानं तिची BP कमी येणार होती पण छाती दुखणं बऱ्यापैकी कमी येईल का या बद्दल शंका होती. तिच्याबरोबर तिची मुलगी होती, तिला सगळं सांगितलं. ती म्हणाली तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. मी ते इंजेक्शन दिलं. तिच्याजवळ तिच्या रक्त पातळ करायच्या गोळ्या होत्या त्या दिल्या आणि आता सगळं देवावर सोपवलं. २ तासांनी तिची BP कमी झाली. छातीवरचा ताण पण कमी झाला. खरं हे २ तास माझी एवढी वाट लावतील असं वाटलं नव्हतं. त्या बोचऱ्या थंडीत मला घाम फुटला होता. मॉनिटर नसल्याने मी दर १०-१५ मिनिटाला तिची BP चेक करत असे. रात्रीची वेळ असल्याने पेशंट झोपली. त्यामुळे मी तिला दार १/२ तासानं उठवायचो अन विचारायचो कमी आहे का? खर तर ती जिवंत आहे का असली तर शुद्धीवर आहे का हे बघत होतो. २ तासांनी तिला बर वाटलं तोवर तिचा नवरा पण आला होता. तो म्हणाला साहेब तीला टेन्शन आलं कि तिची BP वाढते. मी तिला विचारलं कसलं टेन्शन आहे तर ती बया चक्क गायला लागली "दुष्मन न करे दोस्त ने ऐसा काम किया है.... ". मी म्हणालो छान आहे या परिस्थितीत पण गाणं सुचतंय. तिला घरी पाठवल, रात्री हॉस्पिटल ला ठेऊन फायदा नव्हता, चालूच नव्हतं काही, शिवाय आपल्या लोकांच्यासोबत असली कि मन शांत राहील हा हेतू. रात्री काही वाटलं  तर यायला सांगितलं नाहीतर सकाळी परत भेटायला सांगितलं. आता ती आहे व्यवस्थित. एक म्हाताऱ्याला संध्याकाळी काही लोकं घेऊन आली. त्या पेशंटला रोज दारू लागायची आता या परिस्थितीत त्याला मिळत नव्हती म्हणून त्याचे हातपाय थरथरायला लागले होते, असंबंध बरळत होता याला आमच्या भाषेत अल्कोहोल विड्रावल म्हणतात. त्या लोकांमध्ये एक लोकप्रतिनिधी होता त्याला म्हटलं "साहेब, ह्या पेशंटला आठवडाभर ऍडमिट ठेवावं लागेल, बांधून घालायला पाहिजे आणि उपचार करायला पाहिजे. याच्या उपचारासाठी जी औषधं लागणार आहेत ती आत्ता नाहीयेत आणि लवकर मिळणार पण नाहीत. एक काम करा त्याला दारू द्या प्यायला तासाभरात सरळ होईल नंतर पूर ओसरला कि मग आपण ट्रीटमेंट करू". तो लोकप्रतिनिधी माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला आणि हसायला लागला. त्याने पोरांना चपटी आणायला सांगितली. आई त्याला म्हणाली "साहेब त्याला हॉस्पिटलच्या बाहेर द्या नाहीतर लोकं रांग लावतील इथं दारू प्यायला सांगत्यात म्हणून". सगळी हसायला लागली. त्याला हॉस्पिटलच्या बाहेर नेलं चपटी पाजली १५ मिनिटात पेशंट एकदम टकाटक.
रोज कॅम्प व्हायचा, आम्ही १००-१२५ पेशंट बघायचो. सर्दी खोकला, जुलाब, पोटदुखी, फंगल इन्फेक्शन यांना ऊत आलेला. ६-७ दिवसानी सरकारी मदत यायला सुरु झालेली. त्यात औषधं यायची ती वाटायला लागायची. माळभागावर जी थोडी जमीन शिल्लक त्यात एस. पी. हायस्कुल होतं, तिथं मोठं ग्राउंड आहे, त्या शाळेत बरीच निर्वासित राहिले होते आणि तिथं बोर्डिंग स्कुलची चारपाचशे पोरं होती. तिथंच सरकारी यंत्रणा राबत होती. हेलिकॉप्टर तिथं उतरायचं त्यातनं सामान यायचं मग ते कुरुंदवाड सह आजूबाजूच्या खेडयांना बोटीतून पाठवत असे. त्याच चॉपरने आम्ही काही पेशंट शिफ्ट केले. एक हार्ट अटॅक, एक अवघडलेली बाई, २ अत्यवस्थ मुलं, एक ९५ वर्षाची मांडीचे हाड मोडलेली म्हातारी इत्यादी.
संपूर्ण गावातून पुराचं पाणी जायला चांगले १५-२० दिवस गेले होते. ८-१० दिवसांनी मजरेवाडी रोड खुला झाला त्यामुळं गावात मदत यायला सुरु झाली. आता पर्यंत TV वर कुरुंदवाडची बातमी गेली होती आणि अख्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ यायला सुरु झाला. जसं जसं पाणी कमी झालं तस तस त्याची भयानकता जाणवायला लागली. आख्या गावाला कचऱ्याकुंडीचं स्वरूप आलेलं, दुर्गंध आणि कचऱ्याने सगळे हैराण झालेले. प्रत्येकजण आपापल्या  घरात जात होता, कुणाचं घर पडलं होतं, कुणाची भांडी-कपडे वाहून गेलेले, कुणाचं फर्निचर खराब झालेलं, इलेकट्रॉनिक वस्तूंचा तर खुळखुळा झालेला. प्रत्येकजण डोक्याला हात लावून बसायचा. शेतातली पिकं तर विचारू नका. लाखो-करोडॊ रुपयांचं नुकसान झालेलं. आता प्रत्येक कुरुंदवाडकर पुढले काही दिवस सफाईचा मागे लागला. नगरपालिकेच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे दिवस रात्र राबून ते कचरा वाहून नेत होते. बऱ्याच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते संपूर्ण देशातून येत होते त्यांचाही हातभार लागत होता. वायरमन परत लाईट जोडत होते. ज्यांची घरं पडली होती ते लोकं पुढचे काही महिने राहण्यासाठी भाड्याच्या जागा शोधत फिरत होते. अख्या महाराष्ट्राने सर्व पूरग्रस्त भागाला मदतीचा हात दिला. २-२ महिन्याचं रेशन दिलं. स्टोव्ह, कपडे औषधं इत्यादी सामान दिलं गेलं. त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नाही हे खरं. बाहेरून बरीच वैद्यकीय मदत येत होती. कॅम्प घडत होते. बाहेरून डॉक्टर्स येत होते. पुढचे काही आठवडे असच चालू होतं त्यामुळं गावातल्या डॉक्टरांना थोडा आराम मिळाला. या पूर काळात मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे पहायला मिळाले. मदतीचे हात दिसले, परिस्थितीवर पोळ्या भाजणारे लोकं पण बघितली. मदतीच्या आलेल्या गाडयांना अडवून त्यातल्या सामानाची लुटालूट पण बघितली. त्याच सामानाची साठेबाजी करून विक्रीस काढलेलं पण बघितलं आणि आलेली मदत ढापून नंतर निवडणुकीत त्याचा वापर केला, स्वतःला दानशूर समाजसेवक असल्याचं भासवून मतं विकत घेणारे उमेदवार पण बघितले. या वर्षीच्या पुराने पुरा अनुभव दिला हे खरं .
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Sunday, January 27, 2019

सुचलेल्या शब्दातून अन् शब्दातून सुचलेले



***
आसवांची त्या कदर ठेऊन,
एक हात आला रुमाल घेऊन,
त्या दोघांचे प्रेम पाहून,
पाऊस आला जोरात धावून.
***
पहिल्यांदा तुला पाहिलं मी राणी,
तेंव्हा पावसात म्हणत होती तू गाणी,
तुझ्याशी नजरानजर झाली ज्या क्षणी,
काळजाचं झालं गं माझ्या पाणी पाणी
***
या शांततेत नेहमी काहीतरी घडत असते,
मात्र हे आतलं वादळ सर्वांना दिसत नसते,
हसर्‍या गालावरच्या रेषा नेहमी,
सुकलेले ओघळ झाकत असते.
***
बघ असं मला काही पण सुचतं,
सुचल्यावर मग ते शब्दात बसतं
***
आंबट-तिखटाशिवाय गोडाची चव कळत नाही,
रात्र असल्याखेरीज दिवसाचं मह्त्व कळत नाही,
पुसायचे असतात चरचरते अश्रु हसत कारण,
दु:ख असल्याशिवाय सुखाला अस्तित्व मिळत नाही.
***
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये,
नाही तिला दिशा, झालिये तिची दशा,
विचारांच्या भोवर्‍यात गरगरताना दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
बुडतही नाहीये, तरतही नाहीये,
भावनेंच्या कल्लोळांवर हिंदकळताना दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
तुटतही नाही, टिकतही नाही,
उदासिनतेच्या सागरात हरवलेली दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
किती व्हल्ले मारा, किती शिडं उभारा,
तर्क-वितर्काच्या वादळात अडकलेली दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
***
माझ मन आज जरा विचित्रपणा करायला लागलयं,
का कुणास ठाऊक सारखं इतिहासात बघायला लागलयं
कसली हुरहुर लागलिये कुणास ठाऊक,
आनंदात सुद्धा उदास करायला लागलयं
***
भावनांचा कारंजा मला शब्दातुन उडवायचा असतो,
मनातलं सारं माझ्या कवितेत सांडायचं असतं,
लिहायला घेतो काहीतरी सुचेल म्हणुन,
माझ्याकडचा शब्दकोष मात्र तेंव्हा आटला असतो.
***
विचारतेस मला तुझं माझ्यावर प्रेम किती,
किती विचारुन घालते प्रेमाला मर्यादा किती,
विचारतेस तर सांगतो माझं प्रेम किती,
मला सांग आहे विश्वाची मर्यादा तरी किती.
***
                               -डॉ. सारंग कोकाटे