Wednesday, May 2, 2018

डायलेसिसदुपारचे ३ – ३.३० वाजले असतील कणेरीमठातल्या हॉस्पिटलमध्ये येऊन मला एक आठवडाच झाला होता. नुकतंच जेवण करून मी उरलेली OPD संपवत होतो. अचानक एक बाई, एक तरुण मुलगा आणि हॉस्पिटल मधला वार्डबॉय स्ट्रेचरवर एका माणसाला घेऊन आले. “डॉक्टर ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा” असं ती बाई ओरडत होती. मी पेशंट बघितला अर्धवट शुद्धीत होत, डाव्या पायाला गुडघ्यापासून खाली भलंमोठ ड्रेसिंग होतं. नाडीचे ठोके चालू होते, BP पण ठीक होतं, शरीरात पाणी आणि क्षारांची बरीच कमतरता भासत होती. मी त्यांना तपासत तपासत त्यांची माहिती त्यांच्या बायकोकडून घेत होतो. पन्नाशीच्या आसपास वय, एका संस्थेच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, शाळेच्या मैदानावर गवत काढत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावलं. त्यावेळी त्याला काही वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा पाय सुजला, दुखायला लागला, ताप यायला लागला म्हणून त्यांनी गावतल्या एका सर्जन कडे त्याला   अॅडमिट केलं. पायला भरपूर सूज येऊन त्यामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. सूज उतरायला आणि पायातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायला मासावर एक आवरण असते त्याला चिरा द्यावा लागतो त्याला fasciotomy म्हणतात तसा चिरा त्या सर्जनने दिला होता आणि त्याला काही अँटीबायोटिक्स चालू केले होते. दुर्दैवाने ती जखम अजूनच चिघळली आणि शिवाय पेशंटच्या लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्याच्या रक्तात लघवीवाटे जे विषारी पदार्थ (युरिया आणि क्रीयाटेनीन) बाहेर टाकले जातात त्याचं प्रमाण वाढायला लागलं. याला वैद्यकीय भाषेत Acute kidney failure म्हणतात. सर्जनने त्याच्या परीने उपचार चालू ठेवले, पुढच्या ४ दिवसात त्याचं क्रीयाटेनीन ७ पटीने वाढलं आणि त्याची शुद्ध हरपायला लागली. तसं त्या सर्जनने यांना तातडीने डायलेसिस लागेल असं सांगून पाठवलं होतं. मी त्याचे सगळे जुने पेपर तपासले त्यात ३ वेगवेगळी अँटीबायोटिक्स होती ते तिन्ही किडनीला इजा करू शकत होते. मी त्या सगळ्या औषधांवर खाट मारली, केसपेपरवर उपचारांचा प्लान लिहिला आणि त्याला अॅडमिट करायला सांगितलं. पेशंटची बायको मला विचारायला लागली डायलेसिस कधी करणार म्हणून, मी तिला म्हटलं यांना डायलेसिसची गरज नाहीये मला थोडा वेळ द्या होईल सगळं व्यवस्थित. तिचा माझ्यावर काही विश्वास बसला नाही पण माझा आत्मविश्वास बघून ती काही बोलली नाही. तो पेशंट अॅडमिट झाला. मी माझे उरलेले पेशंट संपवत होतो. १५-२० मिनिटांनी मेडिकल ऑफिसरचा मला फोन आला “सर डायलेसिस ला कधी घ्यायचं?” मी “त्याची गरज नाहीये मी जस लिहिलंय तसं उपचार चालू कर.” “पण सर एवढं क्रीयाटेनीन आहे डायलेसिस लागणारच न त्याला” तो म्हणाला; “मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही, मी सांगतो तेवढं कर” मी त्याला दम भरला. अर्धा तास गेला असेल माझा शेवटचा पेशंट संपवत होतो तेंव्हा एक सिनियर ब्रदर आणि एक हॉस्पिटलचा सिनियर स्टाफ माझ्याकडे आला डायलेसिस बद्दल विचारायला लागला, मी त्यांना थांबवलं, पेशंट तपासला आणि त्यांना घेऊन पेशंटकडे घेऊन गेलो. त्याच्या सर्व नातेवाईक आणि माझ्या सर्व स्टाफला या म्हणालो आणि एका खोलीत त्यांना बसायला सांगितलं. एकतर मी तिथे नवीन आणि मी काहीतरी आगळावेगळा प्रयोग करतोय असं त्यांना वाटत होतं, माझ्यावर त्यांचा विश्वास कसा काय बसेल? मला त्यांना समजवायचं होतं कि डायलेसिस का लागणार नाही ते.
मी त्यांना Acute renal failure(ARF) आणि chronic renal failure(CRF) मध्ये फरक सांगितला, CRF च्या बहुतांश लोकांना डायलेसिस हे लागतेच आणि ते करावेच त्यात काही दुमत नाही. ARF मध्ये आपणास त्याच्या कारणांचा शोध घ्यायचा असतो. ह्या पेशंटला किडनीला इजा होण्याची ३ कारणे होती. पाहिलं म्हणजे जो काय जंतुसंसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या पायाच्या मांसल भागाला इजा झाली होती आणि त्याचे विषारी घटक रक्तात मिसळून किडनीला इजा करत होते, दुसरं म्हणजे त्या सर्जनने सर्वच्या सर्व अँटीबायोटिक्स किडनीला इजा होतील अशी वापरली होती आणि तिसरं म्हणजे त्या पेशंटचं क्रीयाटेनीन एवढं वाढतंय म्हटल्यावर त्या सर्जनने त्याच्या पाणी पिण्यावर आणि सलाईनवर जवळपास बंदी घातली होती, उलट यांना जास्त प्रमाणात सलाईन द्यावं लागतं जेणेकरून विषारी घटक dilute होऊन किडनीला होणारी इजा थांबली असती. CRF मध्ये पाणी पिण्यास आणि सलाईन ला मनाई असते. या सगळ्या गोष्टी मी एका कागदावर चित्र काढून त्यांना समजावून सांगितल्या माझा पूर्ण प्लान काय आहे ते समजावून सांगितलं. आता थोडा थोडा त्यांचा विश्वास माझ्यावर बसायला लागला. तो पर्यंत त्या पेशंटला जवळ जवळ २ लिटर सलाईन गेलं होतं आणि तो एकदम खणखणीत शुद्धीवर आला होता आणि उठून बसला होता, त्याला जवळपास २००ml लघवी पण झाली होती. (शक्यतो अश्या पेशंटला लघवीला नळी बसवतात आणि त्यांच्या लघवीच प्रमाण मोजतात) ते बघून पेशंटच्या बायकोने माझ्यासमोर हात जोडले तिच्या डोळ्यातून  घळघळा पाणी व्हायला लागलं; म्हणाली “४ दिवसांनी माझा नवरा जागा झाला”. मी म्हटलं “ चालायचं मावशी खायला द्या त्यांना.”
पुढे त्या पायाच्या चिघळलेल्या जखमा साफ करायला पाहिजे होती नाहीतर जंतुसंसर्ग आटोक्यात आला नसता, अश्या जखमा भूलेखाली साफ करतात (debridement म्हणतात याला). मी आमच्या हॉस्पिटलच्या सर्जनला कॉंल दिला. तोही म्हणाला “debridement लागेल याला पण एवढ्या क्रीयाटेनीनला कसं करणार, काय प्रोब्लेम झाला तर”. मी म्हणालो “सर ARF आहे काही होणार नाही तुम्ही करा”. तो “एकदा नेफ्रोलॉंजिस्ट(किडनी चा डॉक्टर) ला विचारा”. मी लगेच जवळच्या नेफ्रोलॉंजिस्टला फोन लावला, त्याने हिरवा कंदील दिला. debridment झालं. जखम हळू हळू भरायला लागली, त्याला चालता पण येऊ लागले, विशेष म्हणजे त्याला जवळजवळ दिवसाला २-२.५ लिटर लघवी होऊ लागली आणि क्रीयाटेनीन लेवल पण अर्ध्यापेक्षा कमी झाली, १५-२० दिवसांनी पेशंट घरी गेला. ३ महिन्यांनी त्याचं क्रीयाटेनीन लेवल नॉर्मल झालं तेही एकही डायलेसिस न करता. गेले दीड वर्ष हा पेशंट माझ्याकडे येतोय अजूनतरी त्याच्या किडन्या शाबूत आहेत. 

Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.

Thursday, March 10, 2016

किंमत

सकाळचे १०-१०.३० वाजले होते, बाराची ड्युटी होती, घरी कुणी नव्हते, एकटेपणा मला खात होता, म्हटलं हॉस्पीटलला जाऊन बसावं, म्हणून आवरलं. इतक्यात माझा फोन वाजला, अनोळखी नंबर होता पण पलीकडून एक ओळखीचा आवाज आला “नमस्कार डॉक्टरसाहेब ओळखलंत का? संदीप (नाव बदललंय) बोलतोय कराडहून (गावही बदललंय)”. मी चमकलो हा संदीप म्हणजे लोकल राजकारणात उठबस असणारा कार्यकर्ता. “नमस्कार, तुम्हाला विसरून कसं चालेल, काय काम काढलं आज गरीबाकडे”. मी बोललो. “तुम्ही आणि गरीब?? गप्प बसा!!! बरं ते जाऊ द्या अहो आमचं एक पेशंट आहे, **** हॉस्पीटलला भरती केलीया, जरा आमच्याकरता बघून गेला असता तर बरं झालं असतं”. त्या हॉस्पिटल पासून मी फक्त १० मिनिटावर होतो. अनासाये माझ्याजवळ वेळही होता म्हटलं बघून येऊ. “१०-१५ मिनिटात येतो”, मी म्हणालो. “बरं बरं मग मी तिथल्या लोकास्नी तुमच्याबद्दल सांगून ठेवतो” एवढं बोलून त्याने मला पेशंटचे नाव गाव सांगितले.
***
थोड्याच वेळात मी तिथे पोहचलो. पेशंट एक पस्तीशीची बाई होती. तिचा नवरा, दीर आणि १०-१२ वर्षाच्या आसपास तिची २ मुलं, तिच्या भोवतीने उभे होते. २-३ दुसरे पेशंट, २ गुलाबी ड्रेस घातलेल्या नर्स आणि १ मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त तिथं कुणी नव्हतं. त्या बाईच्या एका पायाला भलं मोठं ड्रेसिंग केलं होतं. मी नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली. ते दोघे पुरुष लगबगीने माझ्याकडे सरकले आणि मला जरा बाजूला घेऊन तिच्या आजाराबद्दल सांगू लागले.
तिला एका पायाला गेल्या काही महिन्यापासून जखम झाली होती. त्याचं कारण असं होता कि तिच्या कमरेच्या मणक्यातील नसेवर दाब पडून ती खराब झाली होती, त्यामुळे त्या पायातली स्पर्श ओळखण्याची तिची क्षमताच गेली होती. त्यामुळे तिला लागलेले लवकर कळाले नाही आणि हळूहळू ती जखम खोल होत गेली आणि त्यात जंतुसंसर्ग झाला. तिचं एक महिन्यांपूर्वी मणक्याची याच कारणानिमित्त शस्त्रक्रियाही झाली होती. एका प्लास्टिक सर्जन कडे ती उपचार घेत होती त्या जखमेकरिता. त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था अगदीच बिकट होती, हातावरच पोट आणि मुलं सोडून सगळेच कष्टकरी, शेतात राबून दोन घास कसेबसे मिळवायचे. त्यात आधी झालेला उपचारांवर खर्च त्यामुळे ते दोघेही काकुळतीला आलेले. ते नेहमी ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होते त्यांनी सांगितले होते कि घोट्यापासून पाय काढावा लागेल कारण इन्फेक्शन अगदी घोट्याच्या हाडापर्यंत आत पसरलंय. पण ते बाहेरदेशी जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या प्लास्टिक सर्जनकडे त्यांना पाठवलं. त्या डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं कि पाय वाचवता येईल. थोडा वेळ लागेल आणि खर्चिकपण आहे. हा सगळा इतिहास सांगे पर्यंत तिथल्या वार्डमधल्या डॉक्टरने ड्रेसिंग उघडलं, आणि ती जखम मला बघायला मिळाली. ती जखम इतकी खोलवर होती अगदी तळपायातली हाडं दिसत होती, मास तर गायबच झालं होता, त्यातून पांढरा रंगाचा द्रव पाझरत होता शिवाय त्याची भयानक दुर्घंधी पसरली होती. क्षणभर त्या वासाने मला कसतरी झालं. तसं बघायला गेलं तर अश्या प्रकारच्या जखमा भरपूर बघितल्यात पण त्या दिवशी नको नको झालं, असो.
***
त्या सर्वांची, “पाय वाचावा” अशी भावना होती आणि ते साहजिकच होतं. मी स्वतःला काही प्रश्न केले, मनातल्या मनात. हा पाय पूर्ण बरा होण्याची शक्यता किती? बरा झालाच तर परत जखम होणार नाही याची शाश्वती किती? हे सर्व करण्यात किती खर्च होईल? किती वेळ ह्या उपचारासाठी लागेल? हे विचार मनात घोळत असतानाच पेशंटचा नवरा म्हणाला “डॉक्टर साहेब काय पण करा पण त्यो पाय वाचलं असा काही तरी मार्ग सांगा”.  मला त्याला कसं समजावून सांगावं हे कळेना? मी काही क्षण घेतले आणि मग बोलू लागलो, “हे बघा, पायाचा तळवा हा १५-२० छोट्या छोट्या हाडांनी एकमेकांमध्ये सांधलेला असतो, तिथं काही एकचं हाड नसतं. त्यावर मास, चरबी, इतर पेशी, त्वचा अश्या गुंतागुंतीची रचना असते. आता त्यांच्या तळपायाची त्वचा तर सोडाच पण मास पण नाहीये आणि जे इन्फेक्शन(जंतुसंसर्ग) झालंय ते फक्त वरवरचं नसून त्या हाडांच्या सांधलेल्या  कपारीत पण शिरलंय, त्यामुळे हे कितपत बरं होईल याच्याबद्द्ल जरा शंकाच आहे. ते डॉक्टर पाय वाचवायचा प्रयत्न करताहेत हे चांगलंच आहे पण त्यात ८०% अपयश येण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या उपचाराचा खर्च किती येईल हे पण सांगता येणं अवघड आहे.” “खर्चाची काय काळजी नाय साहेब, आमचं चॅरिटी मधून काम होईल”. तो मध्येच माझं बोलणं तोडून म्हणाला. “चांगलं आहे” मी म्हणालो “पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करायची आहे कि जरी खर्च केला तरी अपयश येण्याची शक्यता दाट आहे. या गोष्टीची मानसिक तयारी असू द्या. मला मान्य आहे कि मी सुरुवातीलाच निगेटिव्ह बोलतोय पण जी काही वस्तुस्थिती आहे त्याची खरी कल्पना देणं माझं कर्तव्य आहे.” यावर तो म्हणाला “साहेब जर का तिचा पाय काढला तर तिला घरी बसून ऱ्हाव लागल, आम्ही एक तर गरीब काम केलं तरच पोटाला मिळल, कस करायचं आम्ही वो?” “खर आहे तुमचं अश्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्य बदलते, पण त्यांना बसून रहाव काही लागणार नाही, कृत्रिम पायाच्या साह्याने त्या चालू शकतील, रोजची कामे करू शकतील आणि अशी बरीच उदाहरणे आहेत समाजात”. मी उत्तरलो. थोडा वेळ त्यांची समजूत घातली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो.
***
२-३ दिवस गेले असतील, मला परत फोन आला त्या पेशंटच्या दिराचा. “साहेब जरा वेळ आहे का?” मी “आहे की बोला”. “अहो तुम्ही जरा येता का, तुम्ही त्या डॉक्टरास्नी जरा सांगता का, कि आम्ही आमची जमीन विकू, पैका भरू, परंतु आमासनी चांगले उपचार द्या म्हणून”. तो काळकुतीला येऊन बोलला, मी विचारलं “का? काय झालं, ते काय बोलले काय?”. तो “ते काही नाय बोलले पर त्यांचे अशिस्टंट डॉक्टर बोलले, काय झालं आमचा भाऊ (पेशंटचा नवरा) त्यांना विचारत व्हता कि, अजून किती दिवस औषध द्यायची ते. तर ते म्हणाले सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे, चांगले उपचार कसे होणार म्हणून, ओपेरेशन लागल म्हणत्यात, पैका भरा म्हणत्यात ५००००, आता अचानक कुठनं आणणार व्हो, २-४ दिवसात कायतरी जुगाड करतो. पर उपचार मात्र चांगले करा म्हणावं.” मी चमकलो, म्हणालो “अरे, पण तुमचं तर चॅरिटीमधून होणार होतं ना? मग आता हे काय”. “कुठंच काय, शहरातल्या लोकांच काय बी खर न्हाय पयले म्हणाले हुईल म्हणून आता नाय म्हणत्यात” तो वैतागून बोलला. “ठीक आहे मी तिथल्या चॅरिटी मधल्या माणसाशी बोलतो” असं म्हणून मी फोन ठेवला.
काही वेळाने मी तिथल्या चॅरिटी ऑफिस मध्ये गेलो, तिथल्या एका मॅडमशी बोललो. ती म्हणाली “ आमच्या इकडे चॅरिटीमध्ये उपचार घेण्यासाठी २ महत्वाच्या गोष्टी लागतात, एक म्हणजे ते दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार आहेत त्यांची फुकट उपचार करण्याची तयारी हवी. त्यांच्याजवळ पुरावा आहे पण ते डॉक्टर याला तयार नाहीत, आम्ही काय करणार”. आता ह्यांना चॅरिटीतून सवलत द्यायची नाही म्हणून हे कारण सांगताहेत कि डॉक्टरला ती म्हणतेय त्या प्रमाणे फुकट उपचार करायचे नाहीत हे काही कळेना. गुंता असा कि जो कोणी डॉक्टर होता त्याने हे काही स्पष्ट नातेवाईकांना सांगितले नाही, जो कोणी बोलला तो रेसिडेंट डॉक्टर (शिकाऊ डॉक्टर) होता. मी तिला म्हणालो “ ते सगळं ठीक आहे पण कुणी रेसिडेंट डॉक्टरने अश्या पद्धतीने बोलणं चांगलं आहे का? हॉस्पिटलच्या Reputation ला हे शोभतंय का? मुळातच त्याला हे काही बोलायचा अधिकार नाहीये.” ती म्हणाली “बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही घेऊ त्यावर काहीतरी action”.  मी निघालो त्या पेशंटच्या नवऱ्याला बोलावलं आणि सांगितलं कि, तुम्ही सरळ तुमच्या डॉक्टरकडे जा, जे काही घडलं ते त्यांना स्पष्ट सांगा आणि फी मध्ये सवलत मागा”.
***
त्या दरम्यान हि केसवर मी एका अर्थोपेडीक मित्रासोबत चर्चा केली, त्याच मत असं पडलं कि पाय काढला तर त्यांना हे बर आहे, कारण आता जरी ती जखम भरली त्यावर कृत्रिम त्वचा चढवली तरी पण पुढे काही दिवसांनी १००% पुन्हा तशीच जखम त्यांना होणार आणि शेवटी हा पाय काढावाच लागणार, दुसरं म्हणजे आता फार थोडा भाग काढायला लागेल, घोट्यापासून कृत्रिम पाय बसवला कि त्यांना त्यांच्या कामात काहीच अडचण होणार नाही उलट नंतर पाय काढला तर तो थोडा जास्त काढावा लागेल, जास्त तडजोड करावी लागेल आणि खर्चही दुप्पट होईल.
दुसऱ्या दिवशी फोन आला, मी विचारलं काय झालं म्हणून, पलीकडून नवरा बोलला “काही नाही साहेब पैसे भरायचे ठरलंय आजच २०००० भरले, ४-५ दिवसात उरलेले भरणार आहे.” मी विचारलं “बरं पण डॉक्टर काय म्हणाले?”, “काही नाही जर पाय पाहिजे असेल तर फुकट होत नाही आणि चॅरिटी पाहिजे असेल तर पाय काढून टाकूयात” तो हताशपणे बोलला. मी काहीच बोललो नाही, काय बोलावं हेच कळेना; “ जाऊ द्या साहेब, तिचा पाय चांगला होणं महत्वाचं” तो म्हणाला. मी त्याला, माझी आणि माझ्या मित्राची काय चर्चा झाली ते सांगितली. योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं. परत मला त्यांचा फोन काही आला नाही, कि काही नवीन कळाल नाही.
***
काही आठवड्यांनी मला दुसऱ्या एका कामानिमित्त त्या हॉस्पिटलला जाण्याचा योग आला. जाता जाता सहज मला ती पेशंट आठवली. मी चॅरिटी ऑफिसला गेलो, तिथल्या त्या मुलीशी ह्या पेशंट बद्दल विचारलं. ती म्हणाली “अहो कसले ते नातेवाईक, १००००० बिल झालं फक्त २०००० भरले आणि ऑपरेशन झाल्यावर पळून गेले, पैसे न देता.” मी चमकलो “अरे बापरे! पण तिचा पाय वाचला का?”. ती “ते काय मला माहित नाही, तुमच्याजवळ त्यांचा पत्ता आहे का?” मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो. त्या पायाची काय किंमत हा प्रश्न मात्र अजून मनात घोळतोच आहे.

Friday, July 10, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 4

सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले धर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिचन, बौद्ध, ज्यू, जैन इत्यादी, प्रत्येक धर्मात अनेक जाती आणि पोटजाती पण आहेत. यातील हिंदू धर्म वगळता इतर सर्व धर्म हे कोण्या एका संताच्या शिकवणीवर आधारलेले आहेत आणि ते एक ईश्वरवादावर आधारित आहेत.
इतके दिवस धर्मावरती वाचतोय, एक प्रश्न मला सारखा पडत होता धर्माचा उद्येश्य काय? what is purpose of religion? प्रत्येक धर्मामध्ये आचरण कसे असावे, दुसऱ्याशी कसे वागावे, काय खावे, काय कपडे घालावेत, परमेश्वराची आराधना कशी करावी. असे नाना प्रकार सांगितलेत. थोडक्यात काय तर जगण्याच्या रिती सांगितल्यात, बरोबर! त्या कशासाठी? तर माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात सुसूत्रता रहावी. माणूस शांततेत आणि आनंदात राहावा. हाच उद्येश्य असला पाहिजे, नाही का?  हा उद्येश्य कोणताही धर्म सध्या पूर्ण करतोय का? समाजात जातीय ताणताणाव आहे, दंगली घडतात, जाळपोळ होते, दुकानं लुटली जातात, स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष मारला जातो, युद्ध होतात, बॉम्बहल्ले होतात, असं का?
उदाहरण घेऊ, समजा ४ लोकांना सांगितलं कि तुम्ही गणिताचा वापर करा पण उत्तर हे १० आलं पाहिजे. हे १० तुमचं उद्दिष्ट आहे, तुमचं ध्येय आहे. पहिल्याने लिहिलं ५+५ =१०; दुसऱ्याने ५x२ =१०, तिसऱ्याने १५-५=१०; चौथ्याने २०/२=१०. सगळ्या पद्धती ह्या बरोबर, नाही का. मग कोणती पद्धत अवलंबवायची, मग हे चौघे एकमेकांशी भांडायला लागले माझी पद्धत तुझ्यापेक्षा सरस आहे म्हणून. धर्माच्या बाबतीत पण असंच आहे कि, सर्व धर्मांचा उद्येश्य सारखाच आहे कि, पद्धती वेगवेगळ्या आहेत. फक्त या पद्धतींच गणित वरच्या गणिताइतकं सोप नाही तर ते बरच क्लिष्ट आहे.
अडचण इथं आहे कि सर्वाना आपलीच पद्धत भारी वाटते आणि ते त्या दुसऱ्यावर लादू पाहतात. मग तो हिंदू असो मुस्लीम असो ख्रिश्चन असो बौद्ध असो किंवा आणखी कोणी असो. मग ते दहशतीने असो, प्रेमाने किंवा राजकारणाने असो किंवा पैसे देऊन असो.
दुसरी गोष्ट म्हणजे या क्लिष्ट प्रकारच्या धार्मिक भाषेमुळे, सामान्य माणसाला स्वतःच्या धर्माविषयी काही ज्ञान नसतं. त्यामुळे तो एका विशिष्ट अश्या व्यक्तींकडे जात असतो ज्याला धर्माविषयी ज्ञान आहे. (असं सामान्य माणूस मानतो) ज्यांना हिंदू लोकं साधू-संत म्हणतात, मुस्लीम मुल्ला-मौलवी, तर ख्रिश्चन प्रिस्ट म्हणतात. अश्या वेळी जे हे लोकं सांगतील त्याला सर्वसामान्य माणूस खर मानतो आणि त्या पद्धतीने वागतो. सामान्य माणूस अजिबात त्या गोष्टी पडताळून पहायची, त्यावर आकलन करायची तसदी घेत नाही. कारण एक तर त्याला ह्या व्यक्तींवर प्रचंड विश्वास असतो, दुसरं म्हणजे तो घाबरत असतो मी जर असे वेडेवाकडे प्रश्न विचारले तर माझं काही वाईट होईल का? समाज काय म्हणेल? तिसरं म्हणजे कुटुंबाची दोन वेळेची खळगी भरणे आणि संसार करणे यात तो इतका गढून गेलेला असतो कि या विषयावर विचार करायला वेळ देणे त्याला परवडणारे नसते. ह्या गोष्टींचा फायदा हि वरची मंडळी, राजकारणी मंडळी घेऊ पाहतात. भडक विधानं केली जातात, तरुण वर्गाला भडकावले जाते. कधी नीट लक्ष दिले तर लक्षात येते कि जास्ती जास्त दंगलींचे प्रमाण हे निवडणुकीच्या आधी, सणासुदीच्या काळात घडतात. प्रत्येक दंगलीमागे काहीतरी कारस्थान लपलेले असते. खरतर यात भरडला जातो सामान्य नागरिक. नाही का? पुढे याच दंगलीचा आधार घेतला जातो आणि तरुणांना सांगितलं जात/मनात येतं कि आपल्या धर्माच्या लोकांची काय अवस्था केली दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी आणि परत हि धार्मिक तेढ पुढच्या पिढीमध्ये नुसती टिकवली जात नाही तर वाढवली जाते. मी MBBS ला असतानाची गोष्ट आहे आम्ही ३rd year ला होतो तेंव्हा धुळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती, सगळीकडे तणावाच वातावरण, सारख सारखं काहीतरी नवीन कानावर यायचं, अफवांचे उधान आले होते. अश्या सुन्न मानसिक अवस्थेत आम्ही होस्टेल च्या कट्यावर बसलो होतो, दोन जुनिअर पण होते दोन्ही धर्माचे, हिंदू होता तो उद्विग्न होऊन म्हणाला “साल्या तुमच्यामुळे असं होतं नेहमी, कापून काढलं पाहिजे सगळ्यांना.” मुस्लीम म्हणाला “मी काय केलंय आणि येऊन तर बघ मीच कापून काढेन.” ते दोघं एकमेकांच्या अंगावर गेले. मी त्यांना अडवलं म्हणालो “अरे तुम्ही दोघ चांगले मित्र आहात का उगाच भांडताय. हि जी काही दंगल घडलीय ती तुमच्या दोघांमुळे नाही झालीये. तुम्हाला जर कापून काढायचे आहे तर त्या ५-५० लोकांना कापा जे अत्याचार करत आहेत. त्यांच्या चुकीसाठी तुम्ही एकमेकांना का जबाबदार धरताय. तसं जर केलं तर पुढच्या दंगलीची जबाबदारी तुमच्या दोघांची असेल. कारण तुम्ही एकमेकांची मन कलुषित करता आणि दुसऱ्यांची सुद्धा.” दोघं ढसाढसा रडली. एक प्रकारचं दुष्टचक्रच होऊन बसलंय हे. नाही का?
दहशदवाद, संपूर्ण मनुष्यजातीच्या अवघड जागेचं दुखण होऊन बसलंय. हि जी माथेफिरू लोकं आहेत जे स्वतःला मुस्लीम समजतात, त्यांना इस्लाम समजलाय कि नाही देव जाणे. कारण इस्लाम मध्ये निरपराधी व्यक्तीला इजा करणे/मारणे हे पाप आहे. प्रत्येक दहशदवादी सगळ्यात पहिल्यांदा हेच करतोय. साधारण १००-१५० वर्षापूर्वी या गोष्टींचे पाळेमुळे सापडतील, युरोप-अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली, व्यापारानिमित्त अनेक युरोपियन देश जगभर प्रवास करू लागले, त्या काळच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अरब-आफ्रिकन देशांमध्ये त्यांनी आपली पाळेमुळे रोवली. साहजिकच त्यांच्याबरोबर ख्रिश्चन धर्मप्रसारक तिथे पोहोचले. त्यांनी धर्माचा प्रचार-प्रसार सुरु केला. तिथे काही मुस्लीम व्यक्तींनी त्या विरोधात एक वैचारिक लढा सुरु केला, पुढे त्या संघर्षाने हिंसक वळण घेतलं, पुढे मोटारींमुळे खनिज तेलाची मागणी होऊ लागली आणि अरब देशात पैशाची बरकत आली. २ महायुद्धे झाली, रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सूर झाले. या देशांच्या तेलसाठा मिळवण्यासाठी छुप्या चढाओढी सुरु झाल्या आणि कट्टर मुस्लीम धर्मवाद्यांचा वापर अमेरिकेने रशियाचा विरोध करण्यासाठी केला. या काळात त्यांना भरपूर शस्त्रसाठा, पैसे पुरवण्यात आले. आता हेच राजकारण सगळ्या जगासाठी त्रासदायक ठरतंय. हा विषय एवढा गुंतागुंतीचा आहे, प्रत्येक देशाचं एक वेगळ राजकारण आहे. त्याची व्याप्ती आहे. यावर एखाद मोठ पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. काहीही असो पण दहशद्वादामुळे सामान्य माणसाचेच हाल होतात, मग तो हिंदू असो मुस्लीम असो वा ख्रिश्चन, त्रास सगळ्यांना होतो. मनुष्याजातच नष्ट होते कि काय अशी भीती कधीकधी वाटते.
अंधश्रद्धा आणि धर्माचा जवळचा संबंध आहे. काही वर्षापूर्वी गणपती दुध पितोय म्हणून कित्येक लिटर दुधाची नासाडी झाली. अजूनही नरबळी सारखे प्रकार आपल्या देशात घडतात. दाभोलकर सारख्या माणसाची हत्या होते. जेवढा माणूस शिकतोय तेवढाच अंधश्रधाळू बनतोय असं वाटत. मेसेजेस फिरत असतात, शिर्डीतून हा मेसेज आलाय, ५ जणांना पाठवा म्हणजे भलं होईल नाहीतर काहीतरी वाईट बातमी कळेल. काय म्हणावं याला काही कळत नाही. गणपती उत्सवात डॉल्बी चालू असते गाणी काय तर “पोरी जरा जपून दांडा धर...”; “तुझा झगा ग....” आणि त्यावर दारू पिऊन धिंगाणा चालू असतो. असं करणाऱ्यांच्या आया-बहीणीचा चेहरा मला बघायचा आहे, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे ती बघायचीय.

माझ्यासारख्या व्यक्तीची फार घालमेल होते हे बघून, मग शब्दातून, लिखाणातून ते व्यक्त होऊ लागते. तरीही मी आशा करतो कि आजचा तरुण कुठेतरी शहाणा होईल, स्वतःच आकलन करेल. स्वतःच्या धर्माविषयी जाणून घेईल, दुसऱ्या धर्माविषयी आदर ठेवेल. मी या दिवसाची वाट बघतोय कि प्रत्येक माणूस सद्सात्विवेक बुद्धीने वागेल, प्रत्येक गोष्टीचं आकलन करेल, पडताळून बघेल आणी माणसाला माणसासारखं वागवेल. कारण माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.