Tuesday, December 31, 2013

चूक कोणाची
रेसिडेन्सीच्या दुसर् या वर्षी आमची मठाच्या हॉस्पिटल मध्ये पोस्टिंग लागायची, माझी दिवाळी नंतर लगेच सुरु झाली. पहिल्या दिवशी ज्या मॅडमच्या OPD मध्ये मला बसवण्यात आल त्या मॅडम सुट्टीवर होत्या, म्हणजे मला एकट्याला OPD बघायची होती त्या दिवशी. मी खुश झालो पहिल्यांदा स्वतःच्या मर्जीनुसार पेशंट तपासायचे होते.
दोन तीन पेशंट बघितल्यावर मध्ये थोडा वेळ रिकामा होता. मी जरा खुशीतच होतो, मस्तपैकी अभ्यासाच पुस्तक वाचत बसलो होतो. इतक्यात ‘सर आत येऊ का?’ असा आवाज आला, मी दरवाज्याकडे बघितले तर एक १२-१३ वर्षाची चुणचुणीत मुलगी आत डोकावत होती. मी तिला आत बोलावल. राधा (नाव बदलले आहे), साधारण गोरा रंग, किरकोळ बांधा, कुरळे केस बांधलेले, मोठे पाणीदार डोळे आणि त्या डोळ्यात असणारी निरागसता माझ्या मनाने चटकन हेरली. ती येऊन खुर्चीत बसली, मी विचारले काय होतंय तर भली मोठी फाईल माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाली ‘सर्दी झालीये तपासायच आहे.’ फाईल बघून मी मिश्किलपणे म्हणालो ‘एवढीशी तू आणि किती मोठी फाईल गं, सारखी आजारी कस काय पडतेस’. तर ती फक्त हसली, त्या हसण्यातही निरागसता होती. मी तिला तपासले आणि मग तिची फाईल चाळू लागलो, चाळताना माझं लक्ष्य CD4 count या टेस्ट कडे गेले, हि टेस्ट HIV positive रुग्णामध्ये करतात आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती कितपत आहे हे तपासतात, माझ्या काळजात धस्स झाल अरे बापरे या पोरीला तर HIV आहे. माझ्या मनावर ताबा ठेवत तिला विचारलं ह्या टेस्ट का केल्या तर ती म्हणाली ‘मला माहित नाही दर सहा महिन्याला डॉक्टर करायला सांगतात, मी करते’. मग मी म्हणालो ‘आई वडील कुठे आहेत तुझे?’ ती ‘ते वारलेत’, मी ‘कशाने?’, ती ‘माहित नाही’.  माझ्या लक्षात आले कि तिचे आईवडील HIV मुळे गेले. मी काही नाही बोलता तिला औषधे लिहून दिली. ती हसतच निघून गेली. दुसर् या दिवशी मॅडम आल्या त्यांच्याकडे मी तिची चौकशी केली. त्यांनी सांगितल कि तिचे आईवडील ती ३ वर्षाची असतानाच गेले आणि तिचा सांभाळ तिच्या आजीने केला पण आता आजी वारली आहे आणि ती आपल्या आत्या कडे राहते. आत्या तिला वैतागली आहे आणि लक्ष्य देत नाही. मठ तिच्या पूर्ण औषधांचा खर्च करत आहे. ती शाळेत जाते आणि मन लावून शिकते आहे. बर नाही वाटल तर स्वतः येऊन औषधे घेते.
मी खूप अस्वस्थ झालो, तिच्या आईवडीलांची शिक्षा ती भोगतीये आणि त्याची तिला काही कल्पना नाही. त्या निरागस बोलक्या डोळ्यात कितीतरी स्वप्ने असतील. काय होईल त्या स्वप्नांच जेव्हा तिला हे सर्व कळेल. त्या डोळ्यात ती चमक राहील का? ते हसू राहील का? असे बरेच प्रश्न मला पडले. अश्या किती राधा या समाजात आहेत हाही मोठा प्रश्न आहे.