Saturday, July 5, 2014

प्रेग्नंसी

स्त्रीरोग व प्रस्तृतीशास्त्र या विभागात पोस्टिंग होती तेंव्हाची गोष्ट. मला या विषयात अजिबात रस नव्हता म्हणून मी ही पोस्टिंग शक्य तेवढं टाळत होतो. कधी न कधी मला ती करावी लागणारच होती. जाहीर होतं कि ती पोस्टिंग मी काही मन लावून केली नाही. मी फ़क़्त ओ. पि. डी. करत होतो. या ओ. पि. डी. मधलाच हा एक किस्सा.
सकाळची वेळ होती भरपूर पेशंट होते त्यामुळे आमच्या मॅडम दोन खोल्यात पेशंट बघत होत्या. मी एका खोलीत आणि दुसरी रेसिडेंट दुसऱ्या खोलीत असे पेशंट्स ची माहिती आधी घेऊन ठेवत होतो. तिशीच्या आसपास असलेली एक मध्यमवर्गीय बाई आत आली. रंग सावळा, नजरेत अस्वस्थता इकडे तिकडे बघायला लागली. मी तिला बसायला सांगितले आणि विचारलं काय झाल. बहुतांश स्त्रिया एका पुरुषाला त्यांचे प्रोब्लेम सांगायला कचरतात, अशा वेळी आम्हालाच कोंडी फोडावी लागते, इथंही असचं झाल, मग विचारलं “काही पाळीचा त्रास वैगेरे आहे का ताई?” ती म्हणाली “हो, मॅडम नाहीयेत का?”; मी “आहेत, येतील त्या तुम्ही मला सांगा, काही प्रोब्लेम नाही”. ती म्हणाली “माझी पाळी चुकालीये आणि मला ह्या डॉक्टरांनी इथं पाठवलयं” माझ्या समोर तिने चिट्ठी धरली. मी चिठ्ठी वाचली, तिला एड्स होता साधारण ७-८ वर्षापासून. तिला दोन मुली होत्या त्यातली धाकटी एड्सनी वारली होती, मोठीला आजार नव्हता. इतक्यात मॅडम आल्या, मी त्यांना माहिती सांगितली, डॉक्टरांची चिठ्ठी पण दाखवली. तिला आम्ही युरीन प्रेग्नंसी टेस्ट करून यायला सांगितले. १० मिनिटांनी ती टेस्ट करून आली. ती टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजे ती प्रेग्नंट होती. तिला तिच्या या आजारपणामुळे आता मुल नको होतं म्हणून MTP साठी तिला काही औषधं, कायद्याची सोपस्कार पार पाडून तिला दिली. आता परत असं काही होऊ नये म्हणून FAMILY PLANNING चा सल्ला मॅडमांना द्यायचा होता त्याआधी त्यांनी तिच्या नवऱ्याची चौकशी केली. ती म्हणाली वर्ष झालं आम्ही एकत्र राहत नाही. “मग हे कसं?” मॅडमांनी विचारलं. ती म्हणाली “ते मी डान्स करते ना म्हणून झालंय”. आम्ही दोघं “म्हणजे?”. ती चिक असा आवाज करत म्हणाली “अहो मी कलानिकेतनात असते ना.” आमच्या डोक्यात प्रकाश पडला कि ही तमाशातली आहे ते (इतका वेळ आम्हाला असं वाटत होतं कि नवराच दोषी आहे). “कुणामुळे झालंय हे माहितीये का?” मॅडम. ती “नाही”. “अग तुझ्यामुळे त्याला आजार होईल कि, माहिती आहे का” मॅडम जवळजवळ ओरडल्याच “काळजी नाही का घ्यायची”. तिला मात्र या गोष्टीचं काहीच देणघेण नव्हतं. तिला आपल्यामुळं समाजातल्या कितीतरी कुटुंबाचं नुकसान होतंय याची जाणीवच नव्हती. मॅडम वैतागल्या होत्या त्यांनी खुणेनेच तिला जायला सांगितलं. ती गेली, आम्ही दोघं एकमेकांकडे बघायला लागलो. कसं होणार या समाजाचं हा प्रश्न आमच्या दोघांच्याही मनाला भिडलेला होता. 
डॉ. सारंग कोकाटे
९४० ४९५ ४७४३

Tuesday, May 6, 2014

संवाद


संध्याकाळची वेळ होती, मी आणि ती (बायको) सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल बघून सारस बागेजवळून जात होतो. तिला पावभाजी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे गेलो. नेहमीप्रमाणे गर्दीतून गाडी काढत तिथे पोचलो. तिथं पावभाजीच्या दुकानदारांची खूप मोठी कॉम्पिटिशन चालू असते. प्रत्येकजण इकडे-इकडे म्हणून गिऱ्हाईकांना ओढत असतात. आम्ही विचार करत होतो कुठल्या दुकानावर जाऊन बसाव; इतक्यात एक मुलगा माझ्या गाडीच्या समोर आला, “साहेब इथं लावा गाडी आणि या बसा”. मी गाडी लावली आणि आम्ही दोघं टेबल खुर्ची लावली होती तिथं बसलो. काही सेकंद गेले. “काय खाणार पोरांनो” असा एक गावरान आवाज कानावर पडला. आमच्या शेजारी एक ७०री गाठलेला एक माणूस उभा होता. घोगरा आवाज, गावरान लहेजा (बहुतेक खानापूर, पानशेत भागातला असावा, मी अंदाज बांधत होतो), पांढरी खुंट वाढलेली दाढी, तिरकी मळकट गांधी टोपी, पांढरा कुर्ता (तोही मळलेला), सुरकुतलेला काळपट पण हसरा चेहरा आमच्याकडे बघत होता. मी विचारलं काय काय आहे. इतक्यात ती म्हणाली “मला फक्त पावभाजी पाहिजे”. (बहुतेक पावभाजी खायचा पक्का निर्णय केला असावा)
एक पावभाजी मी ऑर्डर दिली, तो “तुम्हासनी काय द्यायचं”. मला काही भूक नव्हती, मी ज्यूस मागवला. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आणली. न सांगता त्याने बटर मध्ये भाजलेले २ जास्तीचे पाव त्याने मुद्दाम ठेवले, “लागले तेव्हढे खा म्हणाला”.(जास्तीचे पाव खपवायची चांगली कल्पना होती) काही वेळ गेला मी त्याला विचारले “कुठं राहता तुम्ही? कुठल्या गावचे?” तो म्हणाला “इथंच राहतो पर्वतीच्या पायथ्याला, लहान होतो तवाच आईबाप गेले. अनाथ झालो, इकडची तिकडची कामं करून पोट भरायचो, गेल्या ३० वर्षांपासून इथ कामाला हाय, आधी ह्या मालकाचा बा होता त्यान रहायला एक खोपी दिली, पोटा पाण्यापुरता पगार हाय हो साहेब.” त्याची टेप सुरु झाली “एवढा म्हातारा झालो तरी बी एकदा सुदिक दवाखान्याची पायरी चढलो न्हाय बघा; बॉडी एकदम टकाटक. इथंन पुढं बी न्हाई चडणार. मेलो तरी चालल”. मी विचारलं असं का? तो म्हणाला “मग काय, हि डॉक्टर लोकं नुस्त लुटत्यात, अवं शेजारच्या अमक्या अमक्याच्या बा च्या छातीत दुखायला लागलं तवा त्याला अॅडमीट केलता, त्याच्या नाकातोंडात नळ्या घातल्या, चार ठिकाणी सुया घातल्या आणि  नुसती औषधं चालू पर काय फायदा तो जायचा तसा गेला. त्याच्या मुलान ४ लाखांचं कर्ज काढलं आता बसलाय आयुष्यभर फेडत. त्या डॉक्टरांनी आधीच सांगितलं असतं कि त्यो न्हाई वाचणार म्हणून तर एवढा खर्च झाला असता का त्याचा. डॉक्टर काय आपली तिजोरी भरेपर्यंत सांगतोय बघू, होईल, प्रयत्न चालू आहेत म्हणून, जवा तिजोरी भरली तवा सांगतोय काय होणार न्हाय म्हणून. त्याचा बाप तर गेलाच पर पैसा बी गेला. ह्या डॉक्टर माणसाचं काय खर नसतंय त्यांच्या नादी न लागलेलं बर.” मला त्याने एक सणसणीत कानफटीत मारल्याची भावना झाली. त्याच्या मनावर डॉक्टर म्हणजे पैसे लुटणारा माणूस हि संकल्पना ठासून भरली होती. हे ऐकताना मी तिच्याकडे(बायकोकडे) बघितले, ती माझ्याकडेच बघत होती कि आता माझा काय रिप्लाय असेल. मी एक डॉक्टर आहे हे त्याला सांगायची माझी हिम्मत झाली नाही. मी त्याच्या बोलण्यावर फक्त हसलो आणि त्याला बिल दिले सोबत ५० रुपये टीप पण दिली. कदाचित त्याला एका डॉक्टरकडून खुश करायचा एक छोटासा प्रयत्न असावा तो. ती मात्र माझ्यावर चिडली तुला काय कळतं का? असो टीप घेऊन तो मात्र खुश झाला म्हणाला इथनं पुढ कधी बी इकडं आलात कि इथच यायचं, ह्यो म्हातारा तुमच्या सेवेला इथंच सापडल.
ती घटना माझ्या मनातून काही जाईना. मी विचारात पडलो का बर ह्याला डॉक्टर बद्दल एवढी चीड निर्माण झाली? खरंच त्या डॉक्टर ने तिजोरी भरेपर्यंत त्या मुलाला लुटलं असेल का? नक्की काय झालं असाव? कुठं चुकलं असावं?
मला असं वाटत कि चुकतो तो संवाद. एखादा पेशंट अतव्यस्थ असतो, मरणाच्या दारावर असतो तर त्या पेशंट्स च्या नातेवाईकांशी डॉक्टरने पुरेसा वेळ देऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना पेशंट्स च्या प्रकृतीबद्दल स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. ते त्या पेशंट बद्दल काय निदान करतात, काय तपासण्या करतात आणि नेमकी काय उपचार पद्धती अवलंबतात या बद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. विशेष म्हणजे या सर्व प्रयत्नात किती खर्च येऊ शकतो, किती प्रमाणात अपयश येण्याची शक्यता असते हे पण सांगण गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हंजे आपला जवळचा कुणी मृत्यूमुखी पडू शकतो ही कल्पनाच कुणी करू शकत नाही, त्यापेक्षा हे सत्य सहजासहजी स्वीकारले जात नाही. बहुतांश लोकांचा आता समज असतो कि आता हॉस्पिटल ला घेऊन आलोय तर होईल सगळे व्यवस्थित. खरी गोष्ट अशी आहे कि मृत्यू हा अटळ आहे. कधी ना कधी तो येणारच आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, जगातल्या सर्वात भारी दवाखाने फिरा किंवा भारी डॉक्टरांचा उपचार अवलंबवा त्या पासून काही सुटका नाही. जेंव्हा केंव्हा गंभीर रुग्णावर डॉक्टर उपचार करत असतो तेंव्हा तेंव्हा त्याने/तिने त्या रुग्णाच्या एकंदरीत परिस्थितीची कल्पना स्पष्टपणे नातेवाईकांना देणे गरजेचे आहे. कोणत्या उपचारपद्धती मुळे रुग्णाला फायदा होईल, बरा होण्याची शक्यता किती आणि त्यातून त्याचा खर्च किती या सगळ्या बाबी विचारात घेऊन उपचार केले पाहिजे. त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले पाहिजे. थोडासा संवाद अश्या संवेदनशील गोष्टीसाठी आवश्यक असतो, नाही का?
डॉ. सारंग कोकाटे
९४० ४९५ ४७४३

Sunday, March 30, 2014

हेतू


माझी नाईट ड्यूटी होती, रात्रीचे १२-१२.३० झाले असतील, मला सिस्टर चा फोन आला ‘सर अमुक अमुक रूम मधल्या आजींची शुद्ध हरपलीये आणि दरदरून घाम फुटलाय तुम्ही लवकर या’. मी तिला फोनवरच रक्तशर्करा (नेहमीच्या भाषेत रक्तातली साखर) तपासायला सांगितली आणि तडक तिथे गेलो. तिथे पोहोचेपर्यंत सिस्टरने रक्तशर्करा तपासली होती मला ती म्हणाली ‘सर शुगर फक्त ३० आहे’. मी म्हणालो ‘२५% डेक्स्रोज लाव’ म्हणजे सलाईन मधून साखर द्यायला सांगितली. दुर्देवाने तिची शिरेतली सुई औट गेली होती म्हणजे नवीन सुई लावावी लागणार होती. तिच्या शिरा सहजासहजी दिसत नव्हत्या. मग मी तिच्या एका हातावर आणि सिस्टर दुसऱ्या हातावर शिरेमध्ये सुई लावायचा प्रयत्न करू लागलो. या सगळ्या गोंधळात मी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होत ते म्हणजे रूम मध्ये त्या आजीचा मुलगा उभा होता आणि तो ते सर्व बघत होता. त्याला काय सुरु आहे याची कल्पना देणे गरजेचे होते. मी माझं काम सुरु ठेवतच त्याला बोललो ‘आजींची साखर खूप कमी झालीये आणि त्या हे इंजेक्शन दिले कि व्यवस्थित होतील.’ नॉर्मली नातेवाईक असं काही सांगितलं कि बर म्हणतात आणि गप्प बसतात. हा मात्र बोलायला लागला ‘जाऊदे डॉक्टर साहेब तुम्ही सर्व खूप प्रयत्न करताय, पण ती तर मरणारच आहे तर तिला शांतपणे मरु द्या. मी तुम्हाला काही नाही बोलणार किंवा हॉस्पिटलवर केस नाही करणार.’ सुरुवातीला मला वाटलं कि याचा धीर खचलाय आणि म्हणून हा असा बोलतोय म्हणून मी त्याला आपला धीर देत म्हणालो ‘घाबरू नका आजी ठणठणीत होतील १० मिनिटात फक्त हे इंजेक्शन जाऊदे, तुम्ही धीर धरा.’ आणि मी आपलं माझं काम सुरूच ठेवलं तर तो मात्र म्हणायला लागला ‘मी आणि माझ्या भावाने मनाची तयारी केली आहे, गेली तर जाऊदे कशाला तुम्ही प्रयत्न करताय, काही करू नका.’ या वेळी मात्र मला विचित्र वाटलं, असं वाटलं कि हा मनुष्य या आजीच्या मरणाची वाटच बघतोय मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य केलं आणि सुई घालायला लागलो. तेवढ्यात माझा जुनिअर तिथ आला आणि तो त्याला समजावयला लागला पण तो काही ऐकायला तयार होईना मग मी वैतागून म्हणालो ‘तुम्ही तस लिहून द्या कि काही करू नका आम्ही आमचे प्रयत्न थांबवतो.’ तो लिहून तर देईनच पण उलट त्याने माझा हात पकडला आणि खेचला त्यामुळे मी महत प्रयत्नाने लावलेली सुई बाहेर पडली. आता माझं डोक फिरलं आणि मी त्याच्यावर उखडलो आणि त्याला २-३ शिव्या हासडल्या आणि जुनिअर ला त्याला बाहेर काढायला सांगितलं. जुनिअर ने त्याला रुमच्या बाहेर खेचून नेलं. मी शांतपणे सुई लावली आणि इंजेक्शन दिल. १०-१५ मिनिटात आजी जाग्या झाल्या, व्यवस्थित बोलायला लागल्या, ते बघून खुश व्हायचं सोडून तो माझ्याकडे रागाने बघायला लागला. मग मी त्याला सज्जड कोल्हापुरी दम भरला. सिस्टरला सुचना दिल्या आणि झोपायला गेलो. पुढच्या २-३ दिवसात आजी बऱ्या झाल्या आणि चालत घरी गेल्या. नंतर आम्हाला समजलं कि त्याला ती जिवंत नकोच होती कारण तिचे लाईफ इन्शुरन्सचे पैसे त्याला हवे होते.
मी त्याला शिव्या हासडल्या होत्या हे जर मॅनेजमेंटला समजलं असत तर अक्षरशः माझी खरडपट्टी झाली असती आणि मला १०००-१२०० रुपये दंड पण झाला असता. मी जर तस केलं नसतं त्या आजीच्या मुलाचा वाईट हेतू तर साध्य झालाच असता शिवाय हॉस्पिटलवर केस करून नुकसान भरपाई साठी त्याने नक्की दावा केला असता. महत्वाच म्हणजे त्या आजी हकनाक गेल्या असत्या. असो पण कधी कधी शिव्या घालण पण फायद्याच ठरतं.
डॉ. सारंग कोकाटे
९४० ४९५ ४७४३

Wednesday, February 19, 2014

प्रेमValentine’s Day निमित्त भरपूर मेसेजेस येत होते, काही शुभेछ्या होत्या, काही प्रेम म्हणजे काय यावर होते तर काही फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यात प्रेम नसून आईवडील, भाऊ, बहिण, मित्र यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असते अश्या आशयाचे मेसेजेस होते, मग माझ्या मनात प्रेमाबद्दल लिहाव असा विचार आला आणि लिहित सुटलो.
या विषयावर तसं भरपूर साहित्य लिहिलं आहे. लेख, कथा-कादंबऱ्या, काव्यांमध्ये प्रेमाविषयी भरभरून लिहिलं आहे. प्रेमावर चित्रपट, गाणी, संगीत, नाटकं हि आहेत. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? आणि त्यावर प्रत्येकाची आपापली मतं असतात.
माझ्या मनाने प्रश्न विचारला प्रेमाची सुरुवात कशी होते?(अर्थात मी प्रियकर आणि प्रेयसी च्या प्रेमाविषयी लिहितोय). प्रेम होण्याआधी एखाद्याला समोरची व्यक्ती किंवा व्यक्तीमधील एखादी गोष्ट आवडायला पाहिजे. मग ती आवड इतकी तीव्र होत जाते आणि आकर्षणात बदलते. इथं बरेच लोक फसतात या आवडीला किंवा आकर्षणाला प्रेम समजतात. म्हणजे लव अॅट फर्स्ट साईट हे फक्त उत्कट आकर्षण असते. मग सुरु होतो प्रवास सहवासाचा गाठी-भेटी होतात, हिंडणे, फिरणे, हॉटेल्स, पिझ्झा वैगेरे वगैरे सुरु होतं, थोडक्यात डेटिंग सुरु होते. गुलाबी दिवस असतात हे, आनंदी-आनंद गडे सारखं. जोडीदाराच्या सर्व गोष्टी आवडायला लागतात. तो आणखी हवाहवासा वाटतो. काही काळ जातो, एकमेकांची सवय झाली असते, त्याच्या/तिच्या व्यक्तीमत्वातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात. काही निगेटिव्ह गोष्टी समोर यायला लागतात. याशिवाय अपेक्षा वाढायला लागतात, अॅडजेस्टमेंट करावी लागते. इथं खरी कसोटी असते, जरी निगेटिव्ह गोष्टी असतील, तरी तो व्यक्ती हवाहवासा वाटत असेल आणि त्याच्यासाठी वाट्टेल ते अॅडजेस्ट करायची तयारी असेल तर खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात व्हायला लागते. जर दोघांना निगेटिव्ह गोष्टी खटकत असतील तर लवकरच ब्रेक-अप होतं. एक जण अॅडजेस्ट करायला लागला/लागली तर त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो आणि मग एकतर्फी प्रेम सुरु होतं. जर दोघांना एकमेकांचे निगेटिव्ह पाँइंट मान्य आहेत पण ते परिस्थितीशी अॅडजेस्ट करू शकत नाहीत तरी ब्रेक-अप होतं. खर प्रेम तेंव्हा सुरु होतं जेंव्हा दोघांनाही निगेटिव्ह गोष्टी मान्य असतात आणि ते दोघेही अॅडजेस्टमेंटची तयारी ठेवतात. बरेचसे प्रेमविवाह फेल होतात ते याच कारणामुळे, म्हणून जेंव्हा केंव्हा कोणाला वाटलं कि आपण प्रेमात पडलोय तर त्याने/तिने त्या व्यक्तीला जाणून घ्यायला थोडा वेळ घेतला पाहिजे.
प्रेम हि खूप गुंतागुतीची भावना आहे, ते व्यक्त करण्याच्या पद्धती पण निराळ्या असतात. काहीजण प्रेम शब्दात व्यक्त करतात, चांगल्या गुणांचं कौतुक करतात, स्तुती करतात. काही जण भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. काहीजण काळजीतून प्रेम व्यक्त करतात, काहीजण आपल्या प्रेमीच्या सहवासात राहणे पसंत करतात. काही जण स्पर्शातून प्रेम व्यक्त करतात. बऱ्याचवेळा ह्या व्यक्त करण्याच्या पद्धतीलाच प्रेम समजले जाते आणि गोंधळ होतो. उदा. एकजण समजा भेटवस्तू देऊन प्रेम करतोय आणि त्याची प्रेयसी मात्र काळजी व्यक्त करून प्रेम करतीये आणि ती त्याला काहीच भेटवस्तू देत नसेल तर त्याला असा वाटू शकते कि ती माझ्यावर प्रेम करत नाही. बरेच जण स्पर्शालाच प्रेम समजतात आणि गफलत होते. प्रत्येक स्पर्श हा प्रेमाचा असतो असं नाहीये. एकमेकांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती जर समजून घेतल्या तर ५०% जोडप्यांचा संसार आणखी सुखी होईल असं मला वाटत.
प्रेम दुसऱ्यांदा होतं का हो? बऱ्याच लोकांना प्रेमभंग अथवा दुसऱ्या कारणामुळे अपेक्षित जोडीदार मिळत नाही. त्यावेळी त्याचं मन खिन्न झालेले असते, अश्या लोकांना मला नेहमी सांगू वाटत घाबरू नको तुला परत प्रेम होईल ह्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. मनाच्या जखमा कितीपण खोलवर असू द्या, कालांतराने त्या भरतात आणि मन परत फुलू शकते.
एकतर्फी प्रेमवीरांना सांगू वाटतं, ते तुझ्यासाठी मृगजळ आहे त्याच्या मागे कधी धावशील तर हातात काहीच लागणार नाही, उलट त्याच्या मागे न धावता बाकीच्या गोष्टीत लक्ष घाल आयुष्यात प्रगती तर होईलच पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती सुद्धा येऊ शकते.
मला वाटतंय खूप लिहिलंय प्रेमाबद्दल, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना हा.

Wednesday, February 12, 2014

VIPसकाळी ९ वाजता सरांसोबत राउंड संपला होता इतक्यात एक नवीन पेशंट भरती झाल्याचा मेसेज आला, मग मी आणि सर ७ व्या मजल्यावर पेशंट तपासायला गेलो. त्याला जुलाब झाले होते, २ दिवसात तो २ हॉस्पिटल फिरला होता, तिथे त्याला काही फरक पडला नव्हता म्हणून इथं आला होता. सरांनी तपासलं काही विशेष नव्हतं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, एकंदरीत viral वाटत होतं. त्याला फक्त सलाईन लावलं तरी पुरेसं होतं २ दिवसात त्याचे जुलाब आपोआप थांबणार होते. आम्ही सिस्टरला सूचना दिल्या आणि तिथून बाहेर पडलो, २ मिनिटात सरांचा फोन वाजला, बोलण झाल्यावर मला म्हणाले मंत्रालयातून फोन होता तो पेशंट अमुक-अमुक मंत्र्याचा खास आहे म्हणे लक्ष ठेव. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी माझा युनिट चा उरलेला राउंड घेत होतो. जेमतेम १५ मिनिट झाली आणि मला फोन आला, पलीकडून "मी अमुक अमुक मंत्र्याचा PA बोलतोय, तुमच्याकडे आमचा एक पेशंट आहे तुम्ही काय लक्ष देत नाही राव आमच्या पेशंट कडे, त्याचं रक्त वाहतंय म्हणे." मी बघतो म्हणालो आणि तिथ गेलो. तर त्या पेशंटने त्याचा सलाईन लावलेला हात उठताना हलवला होता आणि त्यामुळे सलाईन त्याच्या शिरेतून जायच्या ऐवजी शिरेतून रक्त सलाईन च्या नळीत आल होत, ते फक्त हात सरळ ठेवलं कि व्यवस्थित होणार होत पण तिथ त्याने अख्खा वार्ड डोक्यावर घेतला होता, मी त्याला समजावलं आणि परत माझ्या कामाला लागलो, १/२ तासाने त्याचा एक माणूस मला भेटायला आला म्हणाला चला त्यांचे जुलाब काही थांबेनात, आमच्या डॉक्टरांना चांगलं जालीम औषधं द्या बघू, मी म्हणालो डॉक्टर? ते डॉक्टर आहेत? तो म्हणाला हो आम्ही सगळे त्यांना डॉक्टर म्हणतो, मी त्याला समजावलं कि जुलाब थांबायला थोडं वेळ लागेल, एका दिवसात ते थांबणार नाहीत थोडा वेळ लागेल. कसबसा १/२ तास झाला परत मला पेशंटचा फोन आला तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मी गेलो, तो मला म्हणाला “मी २ हॉस्पिटल एवढ्यासाठी बदलले कारण त्यांच्या औषधाने माझं जुलाब थांबले नाहीत तुम्ही मला चांगलं औषधं द्या माझे जुलाब लगेच थांबले पाहिजेत”. मी त्याला म्हणालो “तुम्ही कशाचे डॉक्टर आहात?”. तो म्हणाला तस मी डॉक्टर नाही पण माझं उठन बसन डॉक्टरांच्यात असत आणि मला त्यातल सगळ कळत. मी परत त्याला सांगितलं तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे जे जुलाब आहेत ते कदाचित viral इन्फेक्शन मुळे असू शकते किंवा बाहेरच खाल्यामुळे आतड्याला irritation झाल्यामुळे झालेलं आहे आणि ते १-२ दिवसात आपोआप थांबेल, एका तासात ते थांबणार नाही. मग त्याने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावला पलीकडून त्या डॉक्टरने मी काही बोलायच्या आतच मला बोलले “तू काय करतोस ते बरोबर आहे पण तो माणूस तुला शांत बसू देणार गपचूप त्याला लोमोटील सारखी एखादी गोळी दे आणि सोडून दे”. मी सरांना फोन लावला सर म्हणाले बर ठीक आहे त्यांच्या डॉक्टराप्रमाणे कर, मी ठीक आहे म्हणालो आणि त्याला तस सांगण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेलो तर तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्या. मी लगेच डिस्चार्ज फोर्मालीटी सुरु केल्या आणि सरांना फोन केला म्हणालो सर तो डिस्चार्ज मागतोय, सर पण क्षणाचा विलंब न करता म्हणाले पटकन देऊन टाक. पुढच्या तासाभरात तो हॉस्पिटलच्या बाहेर होता. दुसऱ्या दिवशी सर म्हणाले बर झालं त्याला डिस्चार्ज केलंस ते, त्याच्यासाठी मला काल OPD मध्ये कमीतकमी १०-१५ वेळा फोन आले. मी मनातल्या मनात म्हटले सुंठा वाचून खोकला गेला. आधीच्या २ हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्याने असंच केलं असाव. ही VIP माणस कधीच समाधानी नसतात म्हणूनच मंत्रालयाला त्यांच्या जुलाबाची दखल घ्यावीशी वाटते.

Monday, January 27, 2014

नशीबसकाळचा राउंड संपवून मी आणि माझा मित्र बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बँकेचे काम आटोपून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि पार्किंग कडे गाडी लावायला जात होतो इतक्यात आमच्यासमोर एक माणूस भोवळ येऊन पडला, मी उतरलो आणि त्याच्याकडे धावलो मित्राला सांगितलं गाडी पार्क करून ये, जवळच हॉस्पिटलच कॅन्टीन होतं तिथून कोणीतरी कांदा घेऊन त्याच्या नाकाला लावत होतं. तो पर्यंत मी तिथे पोचलो, त्याला बघितलं त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मी लागलीच त्याला कार्डियाक मसाज द्यायला लागलो(कार्डियाक मसाज मध्ये पिक्चर मध्ये दाखवतात तस छातीवर बुक्क्या मारत नाहीत तर चेस्ट बोन वर जोर देऊन मेंदूचा रक्त प्रवाह सुरु ठेवायचा  असतो). एकाला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि त्या माणसाला तातडीच्या सेवेच्या ठिकाणी आणलं. मग त्याला भराभरा इन्जेक्शनस दिली आणि त्याला ७-८ शॉकचे झटके दिले, श्वासाची नळी घातली. सर्व लोकं म्हणाले काही फायदा नाही, तरी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले १/२ तासाने त्याच हृद्य सुरु झालं. त्याला आम्ही अतिदक्षता विभागात ठेवले, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं. त्याला असा अचानक का झालं याचा शोध घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच्या हृदयाच्या तिन्ही मुख्य वाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या त्यातली १ १००% ब्लॉक होती आणि २ ९०% पेक्षा जास्त ब्लॉक होती. ५-६ दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि १०-१२ दिवसांनी त्याला वार्डमध्ये शिफ्ट केला. योगायोगाने तो आमच्याच युनिटमध्ये अॅडमिट होता त्यामुळे मी त्याला दररोज तपासणार होतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहित नव्हतं कि त्याला अॅडमिट करणारा मीच होतो ते, तो आता इतका चांगला झाला होता कि तो आता फिरायला लागला होता, मी त्याला विचारलं “आता कस वाटतय?” तो म्हणाला “सगळ चांगलं आहे पण डॉक्टरांनी माझ्या छातीवर एवढ दाबलय कि माझ्या २ फासळ्या तुटल्यात, लई दुखतंय बघा” मी त्याला पेनकिलर चा औषध दिलं आणि काही मलम लावायला दिलं आणि म्हणालो “जाऊदे काका जीव वाचला ते चांगलं, ते फ्रॅक्चर काय ३-4 आठवड्यात भरेल”.  त्याला बायपास ऑपरेशन सांगितलं होत, पण त्याच्याकडे पैसे नव्हते चॅरिटी ऑफिस ने त्याचा आत्तापर्यंत पूर्ण खर्च केला होता, ते त्याच्या ऑपरेशन चा निम्मा खर्च उचलायला तयार होते, पण तो नाही म्हनाला म्हणून त्याला औषधांवर घरी पाठवला. त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
आणखी एक अशीच घटना पुढे काही महिन्यांनी घडली, १ पन्नाशीचा माणूस त्याला १ वर्षापूर्वी सौम्य अर्धांगवायूचा झटका आला होता व तो मधुमेही आहे हे तेंव्हा समजलं होतं. तो वर्षभर काही हॉस्पिटलला फिरकला नाही, त्याची बहिण डॉक्टर होती आणि ती त्याला मधुमेहासाठी उपचार करत होती, त्याला २ दिवस धाप लागत होती आणि त्याची शुगर कंट्रोल मध्ये अजिबात नसायची, २ दिवस बहिणीने फोन वरून काही औषधं सांगितली पण त्याने काही फरक पडला नाही. घरच्यांनी त्याला हॉस्पिटल आणायचं ठरवलं आणि हॉस्पिटल ला येतानाच घरच्या जिन्यावर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले, घरच्यांना काहीच कळाल नाही आणि त्याला रिक्षात घालून हॉस्पिटलला आणेपर्यंत अर्धा-पावून तास झाला होता. हृदयाचे ठोके बंद झाल्यावर जर १० मिनिटाच्या आत कार्डियाक मसाज सुरु केला नाही तर ती व्यक्ती १००% दगावते, तरी आम्ही १/२ तास प्रयत्न केला पण या वेळी मात्र काळही आला होता आणि वेळही. काही वेळाने तिची डॉक्टर बहिण आली तिला आम्ही त्याचा मृत्यूची बातमी दिली, ती म्हणाली “असा कस शक्य आहे”. मी म्हणालो “जर मधुमेह कंट्रोल मध्ये नसेल तर बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही आणि अश्या वेळी फक्त दम लागतो, ते जर काल आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती”. खिन्न मनाने तिच्या भावाचा देह ती घेऊन गेली.
या दोन्ही घटना तश्या सारख्याच आहेत फक्त पहिला हॉस्पिटलच्या आवारात पडला म्हणून वाचला आणि दुसरा हॉस्पिटलच्या बाहेर पडला म्हणून गेला. दोघांचही नशिबच म्हणायचं.