Saturday, January 4, 2014

अस्वस्थता


दुपारची वेळ होती, मी मठातली OPD संपवून, हॉस्पिटलच्या emergency रूम मध्ये आलो, तशी काही जास्त गर्दी नव्हती २-३ पेशंट असतील जेमतेम, पण अख्या रूम मध्ये मलमूत्राची दुर्घंदी पसरली होती. मी पटकन कपडे बदलून आलो आणि मेडिकल ऑफिसर बसली होती. मी तिला विचारले कशाने हा वास येतोय तर तिने एका मुलाकडे बोट दाखवले.
एका बेडवर २० वर्षाचा मुलगा झोपला होता, त्याने कपड्यातच घाण केली होती आणि त्याचीच दुर्घंदी पसरली होती. तिथं त्याचा बाप उभा होता, रापलेली काळपट त्वचा, भेदरलेला चेहरा, पाणावलेले डोळे आणि केविलवाणी नजर; मी विचारले ‘काय झालं?’ तो म्हणाला ‘काय सांगू साहेब, एकूलत एक पोर बघा, लहानपणी पोलिओ झालता पर चालत हुता, २ वरसं माग पाठीच ऑपरेशन झाल्त बघा, ए भला फोड आलता, बरा हुता २ वरस, पर २ महिन्यापासून अन्थरुणाला चिकटलाय, पायात जोर नाही आणि चड्डीतच हागतोय मुततोय हो.’ एका दमातच त्यान सांगितल.
मी त्या पोराला तपासलं, त्याची अवस्था खूपच वाईट होती. तो जवळपास श्वास घेतच नव्हता. मी त्याच्या वडिलांना विचारलं ‘इतके दिवस काय करत होता?’ तो म्हणाला ‘अव् तिथल्या डॉक्टरास्नि दाखिवल पर काय उपेग झाला नाही, भगत-साधू समद्यासनी दाखिवला तरी ह्यो असाच, काल कळाल कि हित इलाज हुतो म्हणून, काय विचार केला न्हाई बघा सरळ ह्याला खांद्यावर घेतला आणि रेल्वेन हित आलो.’
मी त्याचे रक्त ऑक्सिजन व कार्बनडाय ऑक्साईड ची पातळी तपासायला पाठवलं, आणि त्याला ऑक्सिजन लावला आणि त्याच्या वडिलांना चॅरिटी ऑफिसकडे पाठवलं. ५ मिनिटात रिपोर्ट आला, ऑक्सिजन ची पातळी बरीच खालावली होती, शरीरातले आम्ल प्रमाणापेक्षा खूपच जास्त वाढले होते. बायकार्बोनेट हे त्या आम्लाचे प्रमाण नियंत्रित ठेवत असते ते अगदी नगण्य होते. त्यामुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड पण कमी होते, आपला मेंदूला श्वास घ्यायला हवे असे वाटण्यासाठी कार्बनडाय ऑक्साईडची ठराविक पातळी असणे गरजेचे असते, ती पातळी नसली तर श्वास घेता येत नाही आणि त्याचे हे प्रमाण ही खूपच कमी होतं.
मी पटकन त्याला बायकार्बोनेट चे इंजेक्शन दिले, ते दिल्यावर थोड्या वेळात तो काहीसा श्वास घेतोय असा जाणवायला लागला, काही वेळ ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याचा दम कमी झाला. खरतर त्याला असा का झाल व त्याच्या दोन्ही पायातली ताकत का कमी झाली? का त्याला शी-सू चा कंट्रोल नाही ह्याचा शोध घेण खूप गरजेचे होते. त्या साठी खूप खर्च येणार होता, इतका कि मध्यमवर्गिय माणसाला पण पेलला नसता. मेंदू आणि मज्जातंतू च्या सर्जन ची मदत घ्यावी लागणार होती, कदाचित त्याच्यावर शत्रक्रिया हि करावी लागणार होती. जाहीर होत कि त्याच्या वडिलांकडे एक दिवसाची औषधे आणण्यासाठी पैसे नव्हते तर तो इतका खर्च कसा करू शकेल, म्हणूनच मी त्याला चॅरिटी ऑफिस ला पाठवले होते. मला तिथून फोन आला, मी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली, ते त्याला मदत करायला तयार झाले पण त्यांनी एक नियम सांगितला कि जे डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील त्यांनी आम्हाला परवानगी दिली पाहिजे आणि त्याला अॅडमिट केला पाहिजे, मग मी एका प्रख्यात न्युरो-सर्जन ना कॉल केला त्यांना सर्व परिस्थिती कळवली पण ते  म्हणाले अजिबात अॅडमिट करू नकोस, त्याला सरकारी हॉस्पिटलला पाठवून दे आणि खाडकन फोन ठेऊन दिला. मला वाईट वाटले.
मी सर्व माहिती emergency इन्चार्ज ला सांगितली, त्या म्हणाल्या आता आपण काही करू शकत नाही. मग मी सिव्हील हॉस्पिटल ला फोन लावला आणि तिथ neurosurgery ची सोय आहे का ते बघितलं आणि त्याच्या वडिलांना तिथ घेऊन जायला सांगितलं, त्याला शहराची काहीच माहिती नव्हती तो फक्त आपला पोरगा बरा होईल याच आशेने इथ आला होता. मी इन्चार्ज कडे पाहिलं तर त्यांनी फुकट ambulance मधून नेण्याची व्यवस्था केली आणि त्याचे आत्तापर्यंतचे पूर्ण बिल माफ केले. त्याला आम्ही सिव्हील हॉस्पिटल ला सोडून आलो.
माझ्या मनातून तो पोरगा काही जाईना, खिश्यात एक दमडी नसताना फक्त उपचार होतील म्हणून तो माणूस आपल्या खांद्यावर घेऊन ३००-४०० किलोमीटर आला, फक्त आपल्याला त्या पोराच्या उपचाराचे पैसे मिळणार नाहीत म्हणून त्या सर्जनने त्याला नाकारले, इतके पेशंट बघितले असतील सर्जननी इतके पैसे कमावले असतील, एक पेशंटचा फुकट उपचार केला असता तर किती पुण्य कमावलं असत त्याने. या शहरात ज्ञान तर खूप आहे पण माणुसकी फार कमी आहे अशी भावना झाली माझी, त्या बरोबर सद्सत् विवेक बुध्दी असलेले काही लोकही आहेत हेही समजल नाहीतर त्याला सिव्हील हॉस्पिटल ला जायला १०००-१२०० रुपये लागले असते. पुढ त्या मुलाचं काय झालं हे कळाले नाही पण या घटनेने काही काळ मनात अस्वस्थता राहिली हे नक्की.
डॉ. सारंग कोकाटे
९४० ४९५ ४७४३

Post a Comment