Thursday, January 9, 2014

दुखणं



Emergency मध्ये बरीच शांतता होती, संध्याकाळचे ५ वाजले होते, इतक्यात एक गाडी जोरात गेट मध्ये आली आणि २-३ लोकांनी एका मुलीला आणले. ती विव्हळत होती, मी त्यांना विचारलं काय झाल तर ते म्हणाले कालच हि आमच्या ऑफिसमध्ये झाडूपोच्यासाठी कामाला लागली आज तिला त्रास व्हायला लागला म्हणून घेऊन आलो. ती १६-१७ वर्षाची मुलगी होती, सावला रंग, चेहऱ्यावर भरपूर पावडर लावलेली, लाल लिपस्टिक, डोळ्यात काजळ घातलेलं, (ह्या पोरी इतकं काजळ का घालतात कळत नाही, मग त्या रांजणवाडी घेऊन येतात हॉस्पिटल मध्ये), लाल भडक नेल पॉलिश लावलेलं. मी तिला विचारलं काय होतंय तर ती विव्हळत म्हणाली पोट दुखतंय, छातीत दुखतंय, पाठ दुखतीये आणि दम पण लागलाय. ती तळमळत होती आणि तिच्या आजूबाजूला गर्दी खूप झाली होती. मी सर्वाना बाहेर काढलं. मी तिला तपासलं तिचे नाडीचे ठोके व्यवस्थित होते, ब्लड प्रेशर पण चांगलं होता कुठंच काही अब्नोर्मल नव्हतं. माझ्या लक्षात आलं कि हिला दुखतंय कमी पण ती खूप दुखतंय अस भासवत होती, पण मला त्याची खात्री करून घ्यायची होती म्हणून मी ECG आणि पोटाची सोनोग्राफी करायला सांगितलं, तिला एक पेनकिलरच इन्जेक्शन दिलं. ECG नॉर्मल होता सोनोग्राफीला थोडा वेळ लागणार होता. तिच्या ऑफिसमधल्या दोन बायका तिला धीर देत होत्या, १०-१५ मिनिटे गेली पण तिचं विव्हळण सुरूच होतं उलट ती जास्तच करत होती. तिच्या जवळची एक बाई आली आणि म्हणाली डॉक्टर जरा बघता का ती जास्तच विव्हळतिये, मी त्या बायकांना बाहेर बसवलं आणि त्या पोरीला विचारलं “कितवीला तू?”, ती “दहावीला”. विव्हळण सुरूच होतं. मी “ तुझ्या बॉयफ्रेंडच तुझ्याशी भांडण झालय का?”. जस मी अस विचारलं तस ती विव्हळायची थांबली (मी मनातल्या मनात म्हटलं आता औषध लागू पडलं.) आणि व्यवस्थित बोलायला लागली “नाही तस काय नाय”, मी म्हटल खर सांग नाहीतर तुझ्या आईवडिलांना सांगीन. ती मग पोपटासारखी बोलायला लागली “व्हय, माझं हाय पर दोन दिवस झालं त्यो माझ्याशी बोलना, कुणाला सांगू नका बर”. मी म्हणालो “ प्रेग्नेंट वैगेरे आहेस काय?”. ती परत “तस काय न्हाई”. मी म्हणालो खर सांग तुझी सोनोग्राफी होणार आहे त्यात मला समजेलं सगळ. ती म्हणाली “आमच्यात झालय पण तस काय न्हाई”. तिच्या सोनोग्राफीत तस काय नव्हतं, तिचे आईवडील आलेले त्यांना सांगितल काही घाबरण्यासारखं नाहीये आणि विटामिन च्या गोळ्या देऊन घरी पाठवलं. माझ्या सोबत CMO होता तो म्हणाला “ऐसा क्या बताया उसको बे कि वो चूप हो गयी”. मी म्हणालो “कूछ नही रे मैने सिर्फ उसके बॉयफ्रेंड को याद किया” आणि emergency मध्ये हशा पिकला.

No comments: