Wednesday, February 12, 2014

VIPसकाळी ९ वाजता सरांसोबत राउंड संपला होता इतक्यात एक नवीन पेशंट भरती झाल्याचा मेसेज आला, मग मी आणि सर ७ व्या मजल्यावर पेशंट तपासायला गेलो. त्याला जुलाब झाले होते, २ दिवसात तो २ हॉस्पिटल फिरला होता, तिथे त्याला काही फरक पडला नव्हता म्हणून इथं आला होता. सरांनी तपासलं काही विशेष नव्हतं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, एकंदरीत viral वाटत होतं. त्याला फक्त सलाईन लावलं तरी पुरेसं होतं २ दिवसात त्याचे जुलाब आपोआप थांबणार होते. आम्ही सिस्टरला सूचना दिल्या आणि तिथून बाहेर पडलो, २ मिनिटात सरांचा फोन वाजला, बोलण झाल्यावर मला म्हणाले मंत्रालयातून फोन होता तो पेशंट अमुक-अमुक मंत्र्याचा खास आहे म्हणे लक्ष ठेव. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी माझा युनिट चा उरलेला राउंड घेत होतो. जेमतेम १५ मिनिट झाली आणि मला फोन आला, पलीकडून "मी अमुक अमुक मंत्र्याचा PA बोलतोय, तुमच्याकडे आमचा एक पेशंट आहे तुम्ही काय लक्ष देत नाही राव आमच्या पेशंट कडे, त्याचं रक्त वाहतंय म्हणे." मी बघतो म्हणालो आणि तिथ गेलो. तर त्या पेशंटने त्याचा सलाईन लावलेला हात उठताना हलवला होता आणि त्यामुळे सलाईन त्याच्या शिरेतून जायच्या ऐवजी शिरेतून रक्त सलाईन च्या नळीत आल होत, ते फक्त हात सरळ ठेवलं कि व्यवस्थित होणार होत पण तिथ त्याने अख्खा वार्ड डोक्यावर घेतला होता, मी त्याला समजावलं आणि परत माझ्या कामाला लागलो, १/२ तासाने त्याचा एक माणूस मला भेटायला आला म्हणाला चला त्यांचे जुलाब काही थांबेनात, आमच्या डॉक्टरांना चांगलं जालीम औषधं द्या बघू, मी म्हणालो डॉक्टर? ते डॉक्टर आहेत? तो म्हणाला हो आम्ही सगळे त्यांना डॉक्टर म्हणतो, मी त्याला समजावलं कि जुलाब थांबायला थोडं वेळ लागेल, एका दिवसात ते थांबणार नाहीत थोडा वेळ लागेल. कसबसा १/२ तास झाला परत मला पेशंटचा फोन आला तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मी गेलो, तो मला म्हणाला “मी २ हॉस्पिटल एवढ्यासाठी बदलले कारण त्यांच्या औषधाने माझं जुलाब थांबले नाहीत तुम्ही मला चांगलं औषधं द्या माझे जुलाब लगेच थांबले पाहिजेत”. मी त्याला म्हणालो “तुम्ही कशाचे डॉक्टर आहात?”. तो म्हणाला तस मी डॉक्टर नाही पण माझं उठन बसन डॉक्टरांच्यात असत आणि मला त्यातल सगळ कळत. मी परत त्याला सांगितलं तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे जे जुलाब आहेत ते कदाचित viral इन्फेक्शन मुळे असू शकते किंवा बाहेरच खाल्यामुळे आतड्याला irritation झाल्यामुळे झालेलं आहे आणि ते १-२ दिवसात आपोआप थांबेल, एका तासात ते थांबणार नाही. मग त्याने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावला पलीकडून त्या डॉक्टरने मी काही बोलायच्या आतच मला बोलले “तू काय करतोस ते बरोबर आहे पण तो माणूस तुला शांत बसू देणार गपचूप त्याला लोमोटील सारखी एखादी गोळी दे आणि सोडून दे”. मी सरांना फोन लावला सर म्हणाले बर ठीक आहे त्यांच्या डॉक्टराप्रमाणे कर, मी ठीक आहे म्हणालो आणि त्याला तस सांगण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेलो तर तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्या. मी लगेच डिस्चार्ज फोर्मालीटी सुरु केल्या आणि सरांना फोन केला म्हणालो सर तो डिस्चार्ज मागतोय, सर पण क्षणाचा विलंब न करता म्हणाले पटकन देऊन टाक. पुढच्या तासाभरात तो हॉस्पिटलच्या बाहेर होता. दुसऱ्या दिवशी सर म्हणाले बर झालं त्याला डिस्चार्ज केलंस ते, त्याच्यासाठी मला काल OPD मध्ये कमीतकमी १०-१५ वेळा फोन आले. मी मनातल्या मनात म्हटले सुंठा वाचून खोकला गेला. आधीच्या २ हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्याने असंच केलं असाव. ही VIP माणस कधीच समाधानी नसतात म्हणूनच मंत्रालयाला त्यांच्या जुलाबाची दखल घ्यावीशी वाटते.
Post a Comment