Thursday, March 10, 2016

किंमत

सकाळचे १०-१०.३० वाजले होते, बाराची ड्युटी होती, घरी कुणी नव्हते, एकटेपणा मला खात होता, म्हटलं हॉस्पीटलला जाऊन बसावं, म्हणून आवरलं. इतक्यात माझा फोन वाजला, अनोळखी नंबर होता पण पलीकडून एक ओळखीचा आवाज आला “नमस्कार डॉक्टरसाहेब ओळखलंत का? संदीप (नाव बदललंय) बोलतोय कराडहून (गावही बदललंय)”. मी चमकलो हा संदीप म्हणजे लोकल राजकारणात उठबस असणारा कार्यकर्ता. “नमस्कार, तुम्हाला विसरून कसं चालेल, काय काम काढलं आज गरीबाकडे”. मी बोललो. “तुम्ही आणि गरीब?? गप्प बसा!!! बरं ते जाऊ द्या अहो आमचं एक पेशंट आहे, **** हॉस्पीटलला भरती केलीया, जरा आमच्याकरता बघून गेला असता तर बरं झालं असतं”. त्या हॉस्पिटल पासून मी फक्त १० मिनिटावर होतो. अनासाये माझ्याजवळ वेळही होता म्हटलं बघून येऊ. “१०-१५ मिनिटात येतो”, मी म्हणालो. “बरं बरं मग मी तिथल्या लोकास्नी तुमच्याबद्दल सांगून ठेवतो” एवढं बोलून त्याने मला पेशंटचे नाव गाव सांगितले.
***
थोड्याच वेळात मी तिथे पोहचलो. पेशंट एक पस्तीशीची बाई होती. तिचा नवरा, दीर आणि १०-१२ वर्षाच्या आसपास तिची २ मुलं, तिच्या भोवतीने उभे होते. २-३ दुसरे पेशंट, २ गुलाबी ड्रेस घातलेल्या नर्स आणि १ मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त तिथं कुणी नव्हतं. त्या बाईच्या एका पायाला भलं मोठं ड्रेसिंग केलं होतं. मी नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली. ते दोघे पुरुष लगबगीने माझ्याकडे सरकले आणि मला जरा बाजूला घेऊन तिच्या आजाराबद्दल सांगू लागले.
तिला एका पायाला गेल्या काही महिन्यापासून जखम झाली होती. त्याचं कारण असं होता कि तिच्या कमरेच्या मणक्यातील नसेवर दाब पडून ती खराब झाली होती, त्यामुळे त्या पायातली स्पर्श ओळखण्याची तिची क्षमताच गेली होती. त्यामुळे तिला लागलेले लवकर कळाले नाही आणि हळूहळू ती जखम खोल होत गेली आणि त्यात जंतुसंसर्ग झाला. तिचं एक महिन्यांपूर्वी मणक्याची याच कारणानिमित्त शस्त्रक्रियाही झाली होती. एका प्लास्टिक सर्जन कडे ती उपचार घेत होती त्या जखमेकरिता. त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था अगदीच बिकट होती, हातावरच पोट आणि मुलं सोडून सगळेच कष्टकरी, शेतात राबून दोन घास कसेबसे मिळवायचे. त्यात आधी झालेला उपचारांवर खर्च त्यामुळे ते दोघेही काकुळतीला आलेले. ते नेहमी ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होते त्यांनी सांगितले होते कि घोट्यापासून पाय काढावा लागेल कारण इन्फेक्शन अगदी घोट्याच्या हाडापर्यंत आत पसरलंय. पण ते बाहेरदेशी जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या प्लास्टिक सर्जनकडे त्यांना पाठवलं. त्या डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं कि पाय वाचवता येईल. थोडा वेळ लागेल आणि खर्चिकपण आहे. हा सगळा इतिहास सांगे पर्यंत तिथल्या वार्डमधल्या डॉक्टरने ड्रेसिंग उघडलं, आणि ती जखम मला बघायला मिळाली. ती जखम इतकी खोलवर होती अगदी तळपायातली हाडं दिसत होती, मास तर गायबच झालं होता, त्यातून पांढरा रंगाचा द्रव पाझरत होता शिवाय त्याची भयानक दुर्घंधी पसरली होती. क्षणभर त्या वासाने मला कसतरी झालं. तसं बघायला गेलं तर अश्या प्रकारच्या जखमा भरपूर बघितल्यात पण त्या दिवशी नको नको झालं, असो.
***
त्या सर्वांची, “पाय वाचावा” अशी भावना होती आणि ते साहजिकच होतं. मी स्वतःला काही प्रश्न केले, मनातल्या मनात. हा पाय पूर्ण बरा होण्याची शक्यता किती? बरा झालाच तर परत जखम होणार नाही याची शाश्वती किती? हे सर्व करण्यात किती खर्च होईल? किती वेळ ह्या उपचारासाठी लागेल? हे विचार मनात घोळत असतानाच पेशंटचा नवरा म्हणाला “डॉक्टर साहेब काय पण करा पण त्यो पाय वाचलं असा काही तरी मार्ग सांगा”.  मला त्याला कसं समजावून सांगावं हे कळेना? मी काही क्षण घेतले आणि मग बोलू लागलो, “हे बघा, पायाचा तळवा हा १५-२० छोट्या छोट्या हाडांनी एकमेकांमध्ये सांधलेला असतो, तिथं काही एकचं हाड नसतं. त्यावर मास, चरबी, इतर पेशी, त्वचा अश्या गुंतागुंतीची रचना असते. आता त्यांच्या तळपायाची त्वचा तर सोडाच पण मास पण नाहीये आणि जे इन्फेक्शन(जंतुसंसर्ग) झालंय ते फक्त वरवरचं नसून त्या हाडांच्या सांधलेल्या  कपारीत पण शिरलंय, त्यामुळे हे कितपत बरं होईल याच्याबद्द्ल जरा शंकाच आहे. ते डॉक्टर पाय वाचवायचा प्रयत्न करताहेत हे चांगलंच आहे पण त्यात ८०% अपयश येण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या उपचाराचा खर्च किती येईल हे पण सांगता येणं अवघड आहे.” “खर्चाची काय काळजी नाय साहेब, आमचं चॅरिटी मधून काम होईल”. तो मध्येच माझं बोलणं तोडून म्हणाला. “चांगलं आहे” मी म्हणालो “पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करायची आहे कि जरी खर्च केला तरी अपयश येण्याची शक्यता दाट आहे. या गोष्टीची मानसिक तयारी असू द्या. मला मान्य आहे कि मी सुरुवातीलाच निगेटिव्ह बोलतोय पण जी काही वस्तुस्थिती आहे त्याची खरी कल्पना देणं माझं कर्तव्य आहे.” यावर तो म्हणाला “साहेब जर का तिचा पाय काढला तर तिला घरी बसून ऱ्हाव लागल, आम्ही एक तर गरीब काम केलं तरच पोटाला मिळल, कस करायचं आम्ही वो?” “खर आहे तुमचं अश्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्य बदलते, पण त्यांना बसून रहाव काही लागणार नाही, कृत्रिम पायाच्या साह्याने त्या चालू शकतील, रोजची कामे करू शकतील आणि अशी बरीच उदाहरणे आहेत समाजात”. मी उत्तरलो. थोडा वेळ त्यांची समजूत घातली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो.
***
२-३ दिवस गेले असतील, मला परत फोन आला त्या पेशंटच्या दिराचा. “साहेब जरा वेळ आहे का?” मी “आहे की बोला”. “अहो तुम्ही जरा येता का, तुम्ही त्या डॉक्टरास्नी जरा सांगता का, कि आम्ही आमची जमीन विकू, पैका भरू, परंतु आमासनी चांगले उपचार द्या म्हणून”. तो काळकुतीला येऊन बोलला, मी विचारलं “का? काय झालं, ते काय बोलले काय?”. तो “ते काही नाय बोलले पर त्यांचे अशिस्टंट डॉक्टर बोलले, काय झालं आमचा भाऊ (पेशंटचा नवरा) त्यांना विचारत व्हता कि, अजून किती दिवस औषध द्यायची ते. तर ते म्हणाले सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे, चांगले उपचार कसे होणार म्हणून, ओपेरेशन लागल म्हणत्यात, पैका भरा म्हणत्यात ५००००, आता अचानक कुठनं आणणार व्हो, २-४ दिवसात कायतरी जुगाड करतो. पर उपचार मात्र चांगले करा म्हणावं.” मी चमकलो, म्हणालो “अरे, पण तुमचं तर चॅरिटीमधून होणार होतं ना? मग आता हे काय”. “कुठंच काय, शहरातल्या लोकांच काय बी खर न्हाय पयले म्हणाले हुईल म्हणून आता नाय म्हणत्यात” तो वैतागून बोलला. “ठीक आहे मी तिथल्या चॅरिटी मधल्या माणसाशी बोलतो” असं म्हणून मी फोन ठेवला.
काही वेळाने मी तिथल्या चॅरिटी ऑफिस मध्ये गेलो, तिथल्या एका मॅडमशी बोललो. ती म्हणाली “ आमच्या इकडे चॅरिटीमध्ये उपचार घेण्यासाठी २ महत्वाच्या गोष्टी लागतात, एक म्हणजे ते दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार आहेत त्यांची फुकट उपचार करण्याची तयारी हवी. त्यांच्याजवळ पुरावा आहे पण ते डॉक्टर याला तयार नाहीत, आम्ही काय करणार”. आता ह्यांना चॅरिटीतून सवलत द्यायची नाही म्हणून हे कारण सांगताहेत कि डॉक्टरला ती म्हणतेय त्या प्रमाणे फुकट उपचार करायचे नाहीत हे काही कळेना. गुंता असा कि जो कोणी डॉक्टर होता त्याने हे काही स्पष्ट नातेवाईकांना सांगितले नाही, जो कोणी बोलला तो रेसिडेंट डॉक्टर (शिकाऊ डॉक्टर) होता. मी तिला म्हणालो “ ते सगळं ठीक आहे पण कुणी रेसिडेंट डॉक्टरने अश्या पद्धतीने बोलणं चांगलं आहे का? हॉस्पिटलच्या Reputation ला हे शोभतंय का? मुळातच त्याला हे काही बोलायचा अधिकार नाहीये.” ती म्हणाली “बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही घेऊ त्यावर काहीतरी action”.  मी निघालो त्या पेशंटच्या नवऱ्याला बोलावलं आणि सांगितलं कि, तुम्ही सरळ तुमच्या डॉक्टरकडे जा, जे काही घडलं ते त्यांना स्पष्ट सांगा आणि फी मध्ये सवलत मागा”.
***
त्या दरम्यान हि केसवर मी एका अर्थोपेडीक मित्रासोबत चर्चा केली, त्याच मत असं पडलं कि पाय काढला तर त्यांना हे बर आहे, कारण आता जरी ती जखम भरली त्यावर कृत्रिम त्वचा चढवली तरी पण पुढे काही दिवसांनी १००% पुन्हा तशीच जखम त्यांना होणार आणि शेवटी हा पाय काढावाच लागणार, दुसरं म्हणजे आता फार थोडा भाग काढायला लागेल, घोट्यापासून कृत्रिम पाय बसवला कि त्यांना त्यांच्या कामात काहीच अडचण होणार नाही उलट नंतर पाय काढला तर तो थोडा जास्त काढावा लागेल, जास्त तडजोड करावी लागेल आणि खर्चही दुप्पट होईल.
दुसऱ्या दिवशी फोन आला, मी विचारलं काय झालं म्हणून, पलीकडून नवरा बोलला “काही नाही साहेब पैसे भरायचे ठरलंय आजच २०००० भरले, ४-५ दिवसात उरलेले भरणार आहे.” मी विचारलं “बरं पण डॉक्टर काय म्हणाले?”, “काही नाही जर पाय पाहिजे असेल तर फुकट होत नाही आणि चॅरिटी पाहिजे असेल तर पाय काढून टाकूयात” तो हताशपणे बोलला. मी काहीच बोललो नाही, काय बोलावं हेच कळेना; “ जाऊ द्या साहेब, तिचा पाय चांगला होणं महत्वाचं” तो म्हणाला. मी त्याला, माझी आणि माझ्या मित्राची काय चर्चा झाली ते सांगितली. योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं. परत मला त्यांचा फोन काही आला नाही, कि काही नवीन कळाल नाही.
***
काही आठवड्यांनी मला दुसऱ्या एका कामानिमित्त त्या हॉस्पिटलला जाण्याचा योग आला. जाता जाता सहज मला ती पेशंट आठवली. मी चॅरिटी ऑफिसला गेलो, तिथल्या त्या मुलीशी ह्या पेशंट बद्दल विचारलं. ती म्हणाली “अहो कसले ते नातेवाईक, १००००० बिल झालं फक्त २०००० भरले आणि ऑपरेशन झाल्यावर पळून गेले, पैसे न देता.” मी चमकलो “अरे बापरे! पण तिचा पाय वाचला का?”. ती “ते काय मला माहित नाही, तुमच्याजवळ त्यांचा पत्ता आहे का?” मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो. त्या पायाची काय किंमत हा प्रश्न मात्र अजून मनात घोळतोच आहे.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे