Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे