Showing posts with label Medical. Show all posts
Showing posts with label Medical. Show all posts

Wednesday, May 2, 2018

डायलेसिस



दुपारचे ३ – ३.३० वाजले असतील कणेरीमठातल्या हॉस्पिटलमध्ये येऊन मला एक आठवडाच झाला होता. नुकतंच जेवण करून मी उरलेली OPD संपवत होतो. अचानक एक बाई, एक तरुण मुलगा आणि हॉस्पिटल मधला वार्डबॉय स्ट्रेचरवर एका माणसाला घेऊन आले. “डॉक्टर ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा” असं ती बाई ओरडत होती. मी पेशंट बघितला अर्धवट शुद्धीत होत, डाव्या पायाला गुडघ्यापासून खाली भलंमोठ ड्रेसिंग होतं. नाडीचे ठोके चालू होते, BP पण ठीक होतं, शरीरात पाणी आणि क्षारांची बरीच कमतरता भासत होती. मी त्यांना तपासत तपासत त्यांची माहिती त्यांच्या बायकोकडून घेत होतो. पन्नाशीच्या आसपास वय, एका संस्थेच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, शाळेच्या मैदानावर गवत काढत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावलं. त्यावेळी त्याला काही वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा पाय सुजला, दुखायला लागला, ताप यायला लागला म्हणून त्यांनी गावतल्या एका सर्जन कडे त्याला   अॅडमिट केलं. पायला भरपूर सूज येऊन त्यामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. सूज उतरायला आणि पायातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायला मासावर एक आवरण असते त्याला चिरा द्यावा लागतो त्याला fasciotomy म्हणतात तसा चिरा त्या सर्जनने दिला होता आणि त्याला काही अँटीबायोटिक्स चालू केले होते. दुर्दैवाने ती जखम अजूनच चिघळली आणि शिवाय पेशंटच्या लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्याच्या रक्तात लघवीवाटे जे विषारी पदार्थ (युरिया आणि क्रीयाटेनीन) बाहेर टाकले जातात त्याचं प्रमाण वाढायला लागलं. याला वैद्यकीय भाषेत Acute kidney failure म्हणतात. सर्जनने त्याच्या परीने उपचार चालू ठेवले, पुढच्या ४ दिवसात त्याचं क्रीयाटेनीन ७ पटीने वाढलं आणि त्याची शुद्ध हरपायला लागली. तसं त्या सर्जनने यांना तातडीने डायलेसिस लागेल असं सांगून पाठवलं होतं. मी त्याचे सगळे जुने पेपर तपासले त्यात ३ वेगवेगळी अँटीबायोटिक्स होती ते तिन्ही किडनीला इजा करू शकत होते. मी त्या सगळ्या औषधांवर खाट मारली, केसपेपरवर उपचारांचा प्लान लिहिला आणि त्याला अॅडमिट करायला सांगितलं. पेशंटची बायको मला विचारायला लागली डायलेसिस कधी करणार म्हणून, मी तिला म्हटलं यांना डायलेसिसची गरज नाहीये मला थोडा वेळ द्या होईल सगळं व्यवस्थित. तिचा माझ्यावर काही विश्वास बसला नाही पण माझा आत्मविश्वास बघून ती काही बोलली नाही. तो पेशंट अॅडमिट झाला. मी माझे उरलेले पेशंट संपवत होतो. १५-२० मिनिटांनी मेडिकल ऑफिसरचा मला फोन आला “सर डायलेसिस ला कधी घ्यायचं?” मी “त्याची गरज नाहीये मी जस लिहिलंय तसं उपचार चालू कर.” “पण सर एवढं क्रीयाटेनीन आहे डायलेसिस लागणारच न त्याला” तो म्हणाला; “मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही, मी सांगतो तेवढं कर” मी त्याला दम भरला. अर्धा तास गेला असेल माझा शेवटचा पेशंट संपवत होतो तेंव्हा एक सिनियर ब्रदर आणि एक हॉस्पिटलचा सिनियर स्टाफ माझ्याकडे आला डायलेसिस बद्दल विचारायला लागला, मी त्यांना थांबवलं, पेशंट तपासला आणि त्यांना घेऊन पेशंटकडे घेऊन गेलो. त्याच्या सर्व नातेवाईक आणि माझ्या सर्व स्टाफला या म्हणालो आणि एका खोलीत त्यांना बसायला सांगितलं. एकतर मी तिथे नवीन आणि मी काहीतरी आगळावेगळा प्रयोग करतोय असं त्यांना वाटत होतं, माझ्यावर त्यांचा विश्वास कसा काय बसेल? मला त्यांना समजवायचं होतं कि डायलेसिस का लागणार नाही ते.
मी त्यांना Acute renal failure(ARF) आणि chronic renal failure(CRF) मध्ये फरक सांगितला, CRF च्या बहुतांश लोकांना डायलेसिस हे लागतेच आणि ते करावेच त्यात काही दुमत नाही. ARF मध्ये आपणास त्याच्या कारणांचा शोध घ्यायचा असतो. ह्या पेशंटला किडनीला इजा होण्याची ३ कारणे होती. पाहिलं म्हणजे जो काय जंतुसंसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या पायाच्या मांसल भागाला इजा झाली होती आणि त्याचे विषारी घटक रक्तात मिसळून किडनीला इजा करत होते, दुसरं म्हणजे त्या सर्जनने सर्वच्या सर्व अँटीबायोटिक्स किडनीला इजा होतील अशी वापरली होती आणि तिसरं म्हणजे त्या पेशंटचं क्रीयाटेनीन एवढं वाढतंय म्हटल्यावर त्या सर्जनने त्याच्या पाणी पिण्यावर आणि सलाईनवर जवळपास बंदी घातली होती, उलट यांना जास्त प्रमाणात सलाईन द्यावं लागतं जेणेकरून विषारी घटक dilute होऊन किडनीला होणारी इजा थांबली असती. CRF मध्ये पाणी पिण्यास आणि सलाईन ला मनाई असते. या सगळ्या गोष्टी मी एका कागदावर चित्र काढून त्यांना समजावून सांगितल्या माझा पूर्ण प्लान काय आहे ते समजावून सांगितलं. आता थोडा थोडा त्यांचा विश्वास माझ्यावर बसायला लागला. तो पर्यंत त्या पेशंटला जवळ जवळ २ लिटर सलाईन गेलं होतं आणि तो एकदम खणखणीत शुद्धीवर आला होता आणि उठून बसला होता, त्याला जवळपास २००ml लघवी पण झाली होती. (शक्यतो अश्या पेशंटला लघवीला नळी बसवतात आणि त्यांच्या लघवीच प्रमाण मोजतात) ते बघून पेशंटच्या बायकोने माझ्यासमोर हात जोडले तिच्या डोळ्यातून  घळघळा पाणी व्हायला लागलं; म्हणाली “४ दिवसांनी माझा नवरा जागा झाला”. मी म्हटलं “ चालायचं मावशी खायला द्या त्यांना.”
पुढे त्या पायाच्या चिघळलेल्या जखमा साफ करायला पाहिजे होती नाहीतर जंतुसंसर्ग आटोक्यात आला नसता, अश्या जखमा भूलेखाली साफ करतात (debridement म्हणतात याला). मी आमच्या हॉस्पिटलच्या सर्जनला कॉंल दिला. तोही म्हणाला “debridement लागेल याला पण एवढ्या क्रीयाटेनीनला कसं करणार, काय प्रोब्लेम झाला तर”. मी म्हणालो “सर ARF आहे काही होणार नाही तुम्ही करा”. तो “एकदा नेफ्रोलॉंजिस्ट(किडनी चा डॉक्टर) ला विचारा”. मी लगेच जवळच्या नेफ्रोलॉंजिस्टला फोन लावला, त्याने हिरवा कंदील दिला. debridment झालं. जखम हळू हळू भरायला लागली, त्याला चालता पण येऊ लागले, विशेष म्हणजे त्याला जवळजवळ दिवसाला २-२.५ लिटर लघवी होऊ लागली आणि क्रीयाटेनीन लेवल पण अर्ध्यापेक्षा कमी झाली, १५-२० दिवसांनी पेशंट घरी गेला. ३ महिन्यांनी त्याचं क्रीयाटेनीन लेवल नॉर्मल झालं तेही एकही डायलेसिस न करता. गेले दीड वर्ष हा पेशंट माझ्याकडे येतोय अजूनतरी त्याच्या किडन्या शाबूत आहेत. 
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, March 10, 2016

किंमत

सकाळचे १०-१०.३० वाजले होते, बाराची ड्युटी होती, घरी कुणी नव्हते, एकटेपणा मला खात होता, म्हटलं हॉस्पीटलला जाऊन बसावं, म्हणून आवरलं. इतक्यात माझा फोन वाजला, अनोळखी नंबर होता पण पलीकडून एक ओळखीचा आवाज आला “नमस्कार डॉक्टरसाहेब ओळखलंत का? संदीप (नाव बदललंय) बोलतोय कराडहून (गावही बदललंय)”. मी चमकलो हा संदीप म्हणजे लोकल राजकारणात उठबस असणारा कार्यकर्ता. “नमस्कार, तुम्हाला विसरून कसं चालेल, काय काम काढलं आज गरीबाकडे”. मी बोललो. “तुम्ही आणि गरीब?? गप्प बसा!!! बरं ते जाऊ द्या अहो आमचं एक पेशंट आहे, **** हॉस्पीटलला भरती केलीया, जरा आमच्याकरता बघून गेला असता तर बरं झालं असतं”. त्या हॉस्पिटल पासून मी फक्त १० मिनिटावर होतो. अनासाये माझ्याजवळ वेळही होता म्हटलं बघून येऊ. “१०-१५ मिनिटात येतो”, मी म्हणालो. “बरं बरं मग मी तिथल्या लोकास्नी तुमच्याबद्दल सांगून ठेवतो” एवढं बोलून त्याने मला पेशंटचे नाव गाव सांगितले.
***
थोड्याच वेळात मी तिथे पोहचलो. पेशंट एक पस्तीशीची बाई होती. तिचा नवरा, दीर आणि १०-१२ वर्षाच्या आसपास तिची २ मुलं, तिच्या भोवतीने उभे होते. २-३ दुसरे पेशंट, २ गुलाबी ड्रेस घातलेल्या नर्स आणि १ मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त तिथं कुणी नव्हतं. त्या बाईच्या एका पायाला भलं मोठं ड्रेसिंग केलं होतं. मी नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली. ते दोघे पुरुष लगबगीने माझ्याकडे सरकले आणि मला जरा बाजूला घेऊन तिच्या आजाराबद्दल सांगू लागले.
तिला एका पायाला गेल्या काही महिन्यापासून जखम झाली होती. त्याचं कारण असं होता कि तिच्या कमरेच्या मणक्यातील नसेवर दाब पडून ती खराब झाली होती, त्यामुळे त्या पायातली स्पर्श ओळखण्याची तिची क्षमताच गेली होती. त्यामुळे तिला लागलेले लवकर कळाले नाही आणि हळूहळू ती जखम खोल होत गेली आणि त्यात जंतुसंसर्ग झाला. तिचं एक महिन्यांपूर्वी मणक्याची याच कारणानिमित्त शस्त्रक्रियाही झाली होती. एका प्लास्टिक सर्जन कडे ती उपचार घेत होती त्या जखमेकरिता. त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था अगदीच बिकट होती, हातावरच पोट आणि मुलं सोडून सगळेच कष्टकरी, शेतात राबून दोन घास कसेबसे मिळवायचे. त्यात आधी झालेला उपचारांवर खर्च त्यामुळे ते दोघेही काकुळतीला आलेले. ते नेहमी ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होते त्यांनी सांगितले होते कि घोट्यापासून पाय काढावा लागेल कारण इन्फेक्शन अगदी घोट्याच्या हाडापर्यंत आत पसरलंय. पण ते बाहेरदेशी जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या प्लास्टिक सर्जनकडे त्यांना पाठवलं. त्या डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं कि पाय वाचवता येईल. थोडा वेळ लागेल आणि खर्चिकपण आहे. हा सगळा इतिहास सांगे पर्यंत तिथल्या वार्डमधल्या डॉक्टरने ड्रेसिंग उघडलं, आणि ती जखम मला बघायला मिळाली. ती जखम इतकी खोलवर होती अगदी तळपायातली हाडं दिसत होती, मास तर गायबच झालं होता, त्यातून पांढरा रंगाचा द्रव पाझरत होता शिवाय त्याची भयानक दुर्घंधी पसरली होती. क्षणभर त्या वासाने मला कसतरी झालं. तसं बघायला गेलं तर अश्या प्रकारच्या जखमा भरपूर बघितल्यात पण त्या दिवशी नको नको झालं, असो.
***
त्या सर्वांची, “पाय वाचावा” अशी भावना होती आणि ते साहजिकच होतं. मी स्वतःला काही प्रश्न केले, मनातल्या मनात. हा पाय पूर्ण बरा होण्याची शक्यता किती? बरा झालाच तर परत जखम होणार नाही याची शाश्वती किती? हे सर्व करण्यात किती खर्च होईल? किती वेळ ह्या उपचारासाठी लागेल? हे विचार मनात घोळत असतानाच पेशंटचा नवरा म्हणाला “डॉक्टर साहेब काय पण करा पण त्यो पाय वाचलं असा काही तरी मार्ग सांगा”.  मला त्याला कसं समजावून सांगावं हे कळेना? मी काही क्षण घेतले आणि मग बोलू लागलो, “हे बघा, पायाचा तळवा हा १५-२० छोट्या छोट्या हाडांनी एकमेकांमध्ये सांधलेला असतो, तिथं काही एकचं हाड नसतं. त्यावर मास, चरबी, इतर पेशी, त्वचा अश्या गुंतागुंतीची रचना असते. आता त्यांच्या तळपायाची त्वचा तर सोडाच पण मास पण नाहीये आणि जे इन्फेक्शन(जंतुसंसर्ग) झालंय ते फक्त वरवरचं नसून त्या हाडांच्या सांधलेल्या  कपारीत पण शिरलंय, त्यामुळे हे कितपत बरं होईल याच्याबद्द्ल जरा शंकाच आहे. ते डॉक्टर पाय वाचवायचा प्रयत्न करताहेत हे चांगलंच आहे पण त्यात ८०% अपयश येण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या उपचाराचा खर्च किती येईल हे पण सांगता येणं अवघड आहे.” “खर्चाची काय काळजी नाय साहेब, आमचं चॅरिटी मधून काम होईल”. तो मध्येच माझं बोलणं तोडून म्हणाला. “चांगलं आहे” मी म्हणालो “पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करायची आहे कि जरी खर्च केला तरी अपयश येण्याची शक्यता दाट आहे. या गोष्टीची मानसिक तयारी असू द्या. मला मान्य आहे कि मी सुरुवातीलाच निगेटिव्ह बोलतोय पण जी काही वस्तुस्थिती आहे त्याची खरी कल्पना देणं माझं कर्तव्य आहे.” यावर तो म्हणाला “साहेब जर का तिचा पाय काढला तर तिला घरी बसून ऱ्हाव लागल, आम्ही एक तर गरीब काम केलं तरच पोटाला मिळल, कस करायचं आम्ही वो?” “खर आहे तुमचं अश्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्य बदलते, पण त्यांना बसून रहाव काही लागणार नाही, कृत्रिम पायाच्या साह्याने त्या चालू शकतील, रोजची कामे करू शकतील आणि अशी बरीच उदाहरणे आहेत समाजात”. मी उत्तरलो. थोडा वेळ त्यांची समजूत घातली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो.
***
२-३ दिवस गेले असतील, मला परत फोन आला त्या पेशंटच्या दिराचा. “साहेब जरा वेळ आहे का?” मी “आहे की बोला”. “अहो तुम्ही जरा येता का, तुम्ही त्या डॉक्टरास्नी जरा सांगता का, कि आम्ही आमची जमीन विकू, पैका भरू, परंतु आमासनी चांगले उपचार द्या म्हणून”. तो काळकुतीला येऊन बोलला, मी विचारलं “का? काय झालं, ते काय बोलले काय?”. तो “ते काही नाय बोलले पर त्यांचे अशिस्टंट डॉक्टर बोलले, काय झालं आमचा भाऊ (पेशंटचा नवरा) त्यांना विचारत व्हता कि, अजून किती दिवस औषध द्यायची ते. तर ते म्हणाले सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे, चांगले उपचार कसे होणार म्हणून, ओपेरेशन लागल म्हणत्यात, पैका भरा म्हणत्यात ५००००, आता अचानक कुठनं आणणार व्हो, २-४ दिवसात कायतरी जुगाड करतो. पर उपचार मात्र चांगले करा म्हणावं.” मी चमकलो, म्हणालो “अरे, पण तुमचं तर चॅरिटीमधून होणार होतं ना? मग आता हे काय”. “कुठंच काय, शहरातल्या लोकांच काय बी खर न्हाय पयले म्हणाले हुईल म्हणून आता नाय म्हणत्यात” तो वैतागून बोलला. “ठीक आहे मी तिथल्या चॅरिटी मधल्या माणसाशी बोलतो” असं म्हणून मी फोन ठेवला.
काही वेळाने मी तिथल्या चॅरिटी ऑफिस मध्ये गेलो, तिथल्या एका मॅडमशी बोललो. ती म्हणाली “ आमच्या इकडे चॅरिटीमध्ये उपचार घेण्यासाठी २ महत्वाच्या गोष्टी लागतात, एक म्हणजे ते दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार आहेत त्यांची फुकट उपचार करण्याची तयारी हवी. त्यांच्याजवळ पुरावा आहे पण ते डॉक्टर याला तयार नाहीत, आम्ही काय करणार”. आता ह्यांना चॅरिटीतून सवलत द्यायची नाही म्हणून हे कारण सांगताहेत कि डॉक्टरला ती म्हणतेय त्या प्रमाणे फुकट उपचार करायचे नाहीत हे काही कळेना. गुंता असा कि जो कोणी डॉक्टर होता त्याने हे काही स्पष्ट नातेवाईकांना सांगितले नाही, जो कोणी बोलला तो रेसिडेंट डॉक्टर (शिकाऊ डॉक्टर) होता. मी तिला म्हणालो “ ते सगळं ठीक आहे पण कुणी रेसिडेंट डॉक्टरने अश्या पद्धतीने बोलणं चांगलं आहे का? हॉस्पिटलच्या Reputation ला हे शोभतंय का? मुळातच त्याला हे काही बोलायचा अधिकार नाहीये.” ती म्हणाली “बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही घेऊ त्यावर काहीतरी action”.  मी निघालो त्या पेशंटच्या नवऱ्याला बोलावलं आणि सांगितलं कि, तुम्ही सरळ तुमच्या डॉक्टरकडे जा, जे काही घडलं ते त्यांना स्पष्ट सांगा आणि फी मध्ये सवलत मागा”.
***
त्या दरम्यान हि केसवर मी एका अर्थोपेडीक मित्रासोबत चर्चा केली, त्याच मत असं पडलं कि पाय काढला तर त्यांना हे बर आहे, कारण आता जरी ती जखम भरली त्यावर कृत्रिम त्वचा चढवली तरी पण पुढे काही दिवसांनी १००% पुन्हा तशीच जखम त्यांना होणार आणि शेवटी हा पाय काढावाच लागणार, दुसरं म्हणजे आता फार थोडा भाग काढायला लागेल, घोट्यापासून कृत्रिम पाय बसवला कि त्यांना त्यांच्या कामात काहीच अडचण होणार नाही उलट नंतर पाय काढला तर तो थोडा जास्त काढावा लागेल, जास्त तडजोड करावी लागेल आणि खर्चही दुप्पट होईल.
दुसऱ्या दिवशी फोन आला, मी विचारलं काय झालं म्हणून, पलीकडून नवरा बोलला “काही नाही साहेब पैसे भरायचे ठरलंय आजच २०००० भरले, ४-५ दिवसात उरलेले भरणार आहे.” मी विचारलं “बरं पण डॉक्टर काय म्हणाले?”, “काही नाही जर पाय पाहिजे असेल तर फुकट होत नाही आणि चॅरिटी पाहिजे असेल तर पाय काढून टाकूयात” तो हताशपणे बोलला. मी काहीच बोललो नाही, काय बोलावं हेच कळेना; “ जाऊ द्या साहेब, तिचा पाय चांगला होणं महत्वाचं” तो म्हणाला. मी त्याला, माझी आणि माझ्या मित्राची काय चर्चा झाली ते सांगितली. योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं. परत मला त्यांचा फोन काही आला नाही, कि काही नवीन कळाल नाही.
***
काही आठवड्यांनी मला दुसऱ्या एका कामानिमित्त त्या हॉस्पिटलला जाण्याचा योग आला. जाता जाता सहज मला ती पेशंट आठवली. मी चॅरिटी ऑफिसला गेलो, तिथल्या त्या मुलीशी ह्या पेशंट बद्दल विचारलं. ती म्हणाली “अहो कसले ते नातेवाईक, १००००० बिल झालं फक्त २०००० भरले आणि ऑपरेशन झाल्यावर पळून गेले, पैसे न देता.” मी चमकलो “अरे बापरे! पण तिचा पाय वाचला का?”. ती “ते काय मला माहित नाही, तुमच्याजवळ त्यांचा पत्ता आहे का?” मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो. त्या पायाची काय किंमत हा प्रश्न मात्र अजून मनात घोळतोच आहे.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Saturday, July 5, 2014

प्रेग्नंसी

स्त्रीरोग व प्रस्तृतीशास्त्र या विभागात पोस्टिंग होती तेंव्हाची गोष्ट. मला या विषयात अजिबात रस नव्हता म्हणून मी ही पोस्टिंग शक्य तेवढं टाळत होतो. कधी न कधी मला ती करावी लागणारच होती. जाहीर होतं कि ती पोस्टिंग मी काही मन लावून केली नाही. मी फ़क़्त ओ. पि. डी. करत होतो. या ओ. पि. डी. मधलाच हा एक किस्सा.
सकाळची वेळ होती भरपूर पेशंट होते त्यामुळे आमच्या मॅडम दोन खोल्यात पेशंट बघत होत्या. मी एका खोलीत आणि दुसरी रेसिडेंट दुसऱ्या खोलीत असे पेशंट्स ची माहिती आधी घेऊन ठेवत होतो. तिशीच्या आसपास असलेली एक मध्यमवर्गीय बाई आत आली. रंग सावळा, नजरेत अस्वस्थता इकडे तिकडे बघायला लागली. मी तिला बसायला सांगितले आणि विचारलं काय झाल. बहुतांश स्त्रिया एका पुरुषाला त्यांचे प्रोब्लेम सांगायला कचरतात, अशा वेळी आम्हालाच कोंडी फोडावी लागते, इथंही असचं झाल, मग विचारलं “काही पाळीचा त्रास वैगेरे आहे का ताई?” ती म्हणाली “हो, मॅडम नाहीयेत का?”; मी “आहेत, येतील त्या तुम्ही मला सांगा, काही प्रोब्लेम नाही”. ती म्हणाली “माझी पाळी चुकालीये आणि मला ह्या डॉक्टरांनी इथं पाठवलयं” माझ्या समोर तिने चिट्ठी धरली. मी चिठ्ठी वाचली, तिला एड्स होता साधारण ७-८ वर्षापासून. तिला दोन मुली होत्या त्यातली धाकटी एड्सनी वारली होती, मोठीला आजार नव्हता. इतक्यात मॅडम आल्या, मी त्यांना माहिती सांगितली, डॉक्टरांची चिठ्ठी पण दाखवली. तिला आम्ही युरीन प्रेग्नंसी टेस्ट करून यायला सांगितले. १० मिनिटांनी ती टेस्ट करून आली. ती टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजे ती प्रेग्नंट होती. तिला तिच्या या आजारपणामुळे आता मुल नको होतं म्हणून MTP साठी तिला काही औषधं, कायद्याची सोपस्कार पार पाडून तिला दिली. आता परत असं काही होऊ नये म्हणून FAMILY PLANNING चा सल्ला मॅडमांना द्यायचा होता त्याआधी त्यांनी तिच्या नवऱ्याची चौकशी केली. ती म्हणाली वर्ष झालं आम्ही एकत्र राहत नाही. “मग हे कसं?” मॅडमांनी विचारलं. ती म्हणाली “ते मी डान्स करते ना म्हणून झालंय”. आम्ही दोघं “म्हणजे?”. ती चिक असा आवाज करत म्हणाली “अहो मी कलानिकेतनात असते ना.” आमच्या डोक्यात प्रकाश पडला कि ही तमाशातली आहे ते (इतका वेळ आम्हाला असं वाटत होतं कि नवराच दोषी आहे). “कुणामुळे झालंय हे माहितीये का?” मॅडम. ती “नाही”. “अग तुझ्यामुळे त्याला आजार होईल कि, माहिती आहे का” मॅडम जवळजवळ ओरडल्याच “काळजी नाही का घ्यायची”. तिला मात्र या गोष्टीचं काहीच देणघेण नव्हतं. तिला आपल्यामुळं समाजातल्या कितीतरी कुटुंबाचं नुकसान होतंय याची जाणीवच नव्हती. मॅडम वैतागल्या होत्या त्यांनी खुणेनेच तिला जायला सांगितलं. ती गेली, आम्ही दोघं एकमेकांकडे बघायला लागलो. कसं होणार या समाजाचं हा प्रश्न आमच्या दोघांच्याही मनाला भिडलेला होता. 
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Tuesday, May 6, 2014

संवाद


संध्याकाळची वेळ होती, मी आणि ती (बायको) सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल बघून सारस बागेजवळून जात होतो. तिला पावभाजी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे गेलो. नेहमीप्रमाणे गर्दीतून गाडी काढत तिथे पोचलो. तिथं पावभाजीच्या दुकानदारांची खूप मोठी कॉम्पिटिशन चालू असते. प्रत्येकजण इकडे-इकडे म्हणून गिऱ्हाईकांना ओढत असतात. आम्ही विचार करत होतो कुठल्या दुकानावर जाऊन बसाव; इतक्यात एक मुलगा माझ्या गाडीच्या समोर आला, “साहेब इथं लावा गाडी आणि या बसा”. मी गाडी लावली आणि आम्ही दोघं टेबल खुर्ची लावली होती तिथं बसलो. काही सेकंद गेले. “काय खाणार पोरांनो” असा एक गावरान आवाज कानावर पडला. आमच्या शेजारी एक ७०री गाठलेला एक माणूस उभा होता. घोगरा आवाज, गावरान लहेजा (बहुतेक खानापूर, पानशेत भागातला असावा, मी अंदाज बांधत होतो), पांढरी खुंट वाढलेली दाढी, तिरकी मळकट गांधी टोपी, पांढरा कुर्ता (तोही मळलेला), सुरकुतलेला काळपट पण हसरा चेहरा आमच्याकडे बघत होता. मी विचारलं काय काय आहे. इतक्यात ती म्हणाली “मला फक्त पावभाजी पाहिजे”. (बहुतेक पावभाजी खायचा पक्का निर्णय केला असावा)
एक पावभाजी मी ऑर्डर दिली, तो “तुम्हासनी काय द्यायचं”. मला काही भूक नव्हती, मी ज्यूस मागवला. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आणली. न सांगता त्याने बटर मध्ये भाजलेले २ जास्तीचे पाव त्याने मुद्दाम ठेवले, “लागले तेव्हढे खा म्हणाला”.(जास्तीचे पाव खपवायची चांगली कल्पना होती) काही वेळ गेला मी त्याला विचारले “कुठं राहता तुम्ही? कुठल्या गावचे?” तो म्हणाला “इथंच राहतो पर्वतीच्या पायथ्याला, लहान होतो तवाच आईबाप गेले. अनाथ झालो, इकडची तिकडची कामं करून पोट भरायचो, गेल्या ३० वर्षांपासून इथ कामाला हाय, आधी ह्या मालकाचा बा होता त्यान रहायला एक खोपी दिली, पोटा पाण्यापुरता पगार हाय हो साहेब.” त्याची टेप सुरु झाली “एवढा म्हातारा झालो तरी बी एकदा सुदिक दवाखान्याची पायरी चढलो न्हाय बघा; बॉडी एकदम टकाटक. इथंन पुढं बी न्हाई चडणार. मेलो तरी चालल”. मी विचारलं असं का? तो म्हणाला “मग काय, हि डॉक्टर लोकं नुस्त लुटत्यात, अवं शेजारच्या अमक्या अमक्याच्या बा च्या छातीत दुखायला लागलं तवा त्याला अॅडमीट केलता, त्याच्या नाकातोंडात नळ्या घातल्या, चार ठिकाणी सुया घातल्या आणि  नुसती औषधं चालू पर काय फायदा तो जायचा तसा गेला. त्याच्या मुलान ४ लाखांचं कर्ज काढलं आता बसलाय आयुष्यभर फेडत. त्या डॉक्टरांनी आधीच सांगितलं असतं कि त्यो न्हाई वाचणार म्हणून तर एवढा खर्च झाला असता का त्याचा. डॉक्टर काय आपली तिजोरी भरेपर्यंत सांगतोय बघू, होईल, प्रयत्न चालू आहेत म्हणून, जवा तिजोरी भरली तवा सांगतोय काय होणार न्हाय म्हणून. त्याचा बाप तर गेलाच पर पैसा बी गेला. ह्या डॉक्टर माणसाचं काय खर नसतंय त्यांच्या नादी न लागलेलं बर.” मला त्याने एक सणसणीत कानफटीत मारल्याची भावना झाली. त्याच्या मनावर डॉक्टर म्हणजे पैसे लुटणारा माणूस हि संकल्पना ठासून भरली होती. हे ऐकताना मी तिच्याकडे(बायकोकडे) बघितले, ती माझ्याकडेच बघत होती कि आता माझा काय रिप्लाय असेल. मी एक डॉक्टर आहे हे त्याला सांगायची माझी हिम्मत झाली नाही. मी त्याच्या बोलण्यावर फक्त हसलो आणि त्याला बिल दिले सोबत ५० रुपये टीप पण दिली. कदाचित त्याला एका डॉक्टरकडून खुश करायचा एक छोटासा प्रयत्न असावा तो. ती मात्र माझ्यावर चिडली तुला काय कळतं का? असो टीप घेऊन तो मात्र खुश झाला म्हणाला इथनं पुढ कधी बी इकडं आलात कि इथच यायचं, ह्यो म्हातारा तुमच्या सेवेला इथंच सापडल.
ती घटना माझ्या मनातून काही जाईना. मी विचारात पडलो का बर ह्याला डॉक्टर बद्दल एवढी चीड निर्माण झाली? खरंच त्या डॉक्टर ने तिजोरी भरेपर्यंत त्या मुलाला लुटलं असेल का? नक्की काय झालं असाव? कुठं चुकलं असावं?
मला असं वाटत कि चुकतो तो संवाद. एखादा पेशंट अतव्यस्थ असतो, मरणाच्या दारावर असतो तर त्या पेशंट्स च्या नातेवाईकांशी डॉक्टरने पुरेसा वेळ देऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना पेशंट्स च्या प्रकृतीबद्दल स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. ते त्या पेशंट बद्दल काय निदान करतात, काय तपासण्या करतात आणि नेमकी काय उपचार पद्धती अवलंबतात या बद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. विशेष म्हणजे या सर्व प्रयत्नात किती खर्च येऊ शकतो, किती प्रमाणात अपयश येण्याची शक्यता असते हे पण सांगण गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हंजे आपला जवळचा कुणी मृत्यूमुखी पडू शकतो ही कल्पनाच कुणी करू शकत नाही, त्यापेक्षा हे सत्य सहजासहजी स्वीकारले जात नाही. बहुतांश लोकांचा आता समज असतो कि आता हॉस्पिटल ला घेऊन आलोय तर होईल सगळे व्यवस्थित. खरी गोष्ट अशी आहे कि मृत्यू हा अटळ आहे. कधी ना कधी तो येणारच आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, जगातल्या सर्वात भारी दवाखाने फिरा किंवा भारी डॉक्टरांचा उपचार अवलंबवा त्या पासून काही सुटका नाही. जेंव्हा केंव्हा गंभीर रुग्णावर डॉक्टर उपचार करत असतो तेंव्हा तेंव्हा त्याने/तिने त्या रुग्णाच्या एकंदरीत परिस्थितीची कल्पना स्पष्टपणे नातेवाईकांना देणे गरजेचे आहे. कोणत्या उपचारपद्धती मुळे रुग्णाला फायदा होईल, बरा होण्याची शक्यता किती आणि त्यातून त्याचा खर्च किती या सगळ्या बाबी विचारात घेऊन उपचार केले पाहिजे. त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले पाहिजे. थोडासा संवाद अश्या संवेदनशील गोष्टीसाठी आवश्यक असतो, नाही का?
                                                -डॉ. सारंग कोकाटे 

Sunday, March 30, 2014

हेतू


माझी नाईट ड्यूटी होती, रात्रीचे १२-१२.३० झाले असतील, मला सिस्टर चा फोन आला ‘सर अमुक अमुक रूम मधल्या आजींची शुद्ध हरपलीये आणि दरदरून घाम फुटलाय तुम्ही लवकर या’. मी तिला फोनवरच रक्तशर्करा (नेहमीच्या भाषेत रक्तातली साखर) तपासायला सांगितली आणि तडक तिथे गेलो. तिथे पोहोचेपर्यंत सिस्टरने रक्तशर्करा तपासली होती मला ती म्हणाली ‘सर शुगर फक्त ३० आहे’. मी म्हणालो ‘२५% डेक्स्रोज लाव’ म्हणजे सलाईन मधून साखर द्यायला सांगितली. दुर्देवाने तिची शिरेतली सुई औट गेली होती म्हणजे नवीन सुई लावावी लागणार होती. तिच्या शिरा सहजासहजी दिसत नव्हत्या. मग मी तिच्या एका हातावर आणि सिस्टर दुसऱ्या हातावर शिरेमध्ये सुई लावायचा प्रयत्न करू लागलो. या सगळ्या गोंधळात मी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होत ते म्हणजे रूम मध्ये त्या आजीचा मुलगा उभा होता आणि तो ते सर्व बघत होता. त्याला काय सुरु आहे याची कल्पना देणे गरजेचे होते. मी माझं काम सुरु ठेवतच त्याला बोललो ‘आजींची साखर खूप कमी झालीये आणि त्या हे इंजेक्शन दिले कि व्यवस्थित होतील.’ नॉर्मली नातेवाईक असं काही सांगितलं कि बर म्हणतात आणि गप्प बसतात. हा मात्र बोलायला लागला ‘जाऊदे डॉक्टर साहेब तुम्ही सर्व खूप प्रयत्न करताय, पण ती तर मरणारच आहे तर तिला शांतपणे मरु द्या. मी तुम्हाला काही नाही बोलणार किंवा हॉस्पिटलवर केस नाही करणार.’ सुरुवातीला मला वाटलं कि याचा धीर खचलाय आणि म्हणून हा असा बोलतोय म्हणून मी त्याला आपला धीर देत म्हणालो ‘घाबरू नका आजी ठणठणीत होतील १० मिनिटात फक्त हे इंजेक्शन जाऊदे, तुम्ही धीर धरा.’ आणि मी आपलं माझं काम सुरूच ठेवलं तर तो मात्र म्हणायला लागला ‘मी आणि माझ्या भावाने मनाची तयारी केली आहे, गेली तर जाऊदे कशाला तुम्ही प्रयत्न करताय, काही करू नका.’ या वेळी मात्र मला विचित्र वाटलं, असं वाटलं कि हा मनुष्य या आजीच्या मरणाची वाटच बघतोय मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य केलं आणि सुई घालायला लागलो. तेवढ्यात माझा जुनिअर तिथ आला आणि तो त्याला समजावयला लागला पण तो काही ऐकायला तयार होईना मग मी वैतागून म्हणालो ‘तुम्ही तस लिहून द्या कि काही करू नका आम्ही आमचे प्रयत्न थांबवतो.’ तो लिहून तर देईनच पण उलट त्याने माझा हात पकडला आणि खेचला त्यामुळे मी महत प्रयत्नाने लावलेली सुई बाहेर पडली. आता माझं डोक फिरलं आणि मी त्याच्यावर उखडलो आणि त्याला २-३ शिव्या हासडल्या आणि जुनिअर ला त्याला बाहेर काढायला सांगितलं. जुनिअर ने त्याला रुमच्या बाहेर खेचून नेलं. मी शांतपणे सुई लावली आणि इंजेक्शन दिल. १०-१५ मिनिटात आजी जाग्या झाल्या, व्यवस्थित बोलायला लागल्या, ते बघून खुश व्हायचं सोडून तो माझ्याकडे रागाने बघायला लागला. मग मी त्याला सज्जड कोल्हापुरी दम भरला. सिस्टरला सुचना दिल्या आणि झोपायला गेलो. पुढच्या २-३ दिवसात आजी बऱ्या झाल्या आणि चालत घरी गेल्या. नंतर आम्हाला समजलं कि त्याला ती जिवंत नकोच होती कारण तिचे लाईफ इन्शुरन्सचे पैसे त्याला हवे होते.
मी त्याला शिव्या हासडल्या होत्या हे जर मॅनेजमेंटला समजलं असत तर अक्षरशः माझी खरडपट्टी झाली असती आणि मला १०००-१२०० रुपये दंड पण झाला असता. मी जर तस केलं नसतं त्या आजीच्या मुलाचा वाईट हेतू तर साध्य झालाच असता शिवाय हॉस्पिटलवर केस करून नुकसान भरपाई साठी त्याने नक्की दावा केला असता. महत्वाच म्हणजे त्या आजी हकनाक गेल्या असत्या. असो पण कधी कधी शिव्या घालण पण फायद्याच ठरतं.

                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Wednesday, February 12, 2014

VIP



सकाळी ९ वाजता सरांसोबत राउंड संपला होता इतक्यात एक नवीन पेशंट भरती झाल्याचा मेसेज आला, मग मी आणि सर ७ व्या मजल्यावर पेशंट तपासायला गेलो. त्याला जुलाब झाले होते, २ दिवसात तो २ हॉस्पिटल फिरला होता, तिथे त्याला काही फरक पडला नव्हता म्हणून इथं आला होता. सरांनी तपासलं काही विशेष नव्हतं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, एकंदरीत viral वाटत होतं. त्याला फक्त सलाईन लावलं तरी पुरेसं होतं २ दिवसात त्याचे जुलाब आपोआप थांबणार होते. आम्ही सिस्टरला सूचना दिल्या आणि तिथून बाहेर पडलो, २ मिनिटात सरांचा फोन वाजला, बोलण झाल्यावर मला म्हणाले मंत्रालयातून फोन होता तो पेशंट अमुक-अमुक मंत्र्याचा खास आहे म्हणे लक्ष ठेव. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी माझा युनिट चा उरलेला राउंड घेत होतो. जेमतेम १५ मिनिट झाली आणि मला फोन आला, पलीकडून "मी अमुक अमुक मंत्र्याचा PA बोलतोय, तुमच्याकडे आमचा एक पेशंट आहे तुम्ही काय लक्ष देत नाही राव आमच्या पेशंट कडे, त्याचं रक्त वाहतंय म्हणे." मी बघतो म्हणालो आणि तिथ गेलो. तर त्या पेशंटने त्याचा सलाईन लावलेला हात उठताना हलवला होता आणि त्यामुळे सलाईन त्याच्या शिरेतून जायच्या ऐवजी शिरेतून रक्त सलाईन च्या नळीत आल होत, ते फक्त हात सरळ ठेवलं कि व्यवस्थित होणार होत पण तिथ त्याने अख्खा वार्ड डोक्यावर घेतला होता, मी त्याला समजावलं आणि परत माझ्या कामाला लागलो, १/२ तासाने त्याचा एक माणूस मला भेटायला आला म्हणाला चला त्यांचे जुलाब काही थांबेनात, आमच्या डॉक्टरांना चांगलं जालीम औषधं द्या बघू, मी म्हणालो डॉक्टर? ते डॉक्टर आहेत? तो म्हणाला हो आम्ही सगळे त्यांना डॉक्टर म्हणतो, मी त्याला समजावलं कि जुलाब थांबायला थोडं वेळ लागेल, एका दिवसात ते थांबणार नाहीत थोडा वेळ लागेल. कसबसा १/२ तास झाला परत मला पेशंटचा फोन आला तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मी गेलो, तो मला म्हणाला “मी २ हॉस्पिटल एवढ्यासाठी बदलले कारण त्यांच्या औषधाने माझं जुलाब थांबले नाहीत तुम्ही मला चांगलं औषधं द्या माझे जुलाब लगेच थांबले पाहिजेत”. मी त्याला म्हणालो “तुम्ही कशाचे डॉक्टर आहात?”. तो म्हणाला तस मी डॉक्टर नाही पण माझं उठन बसन डॉक्टरांच्यात असत आणि मला त्यातल सगळ कळत. मी परत त्याला सांगितलं तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे जे जुलाब आहेत ते कदाचित viral इन्फेक्शन मुळे असू शकते किंवा बाहेरच खाल्यामुळे आतड्याला irritation झाल्यामुळे झालेलं आहे आणि ते १-२ दिवसात आपोआप थांबेल, एका तासात ते थांबणार नाही. मग त्याने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावला पलीकडून त्या डॉक्टरने मी काही बोलायच्या आतच मला बोलले “तू काय करतोस ते बरोबर आहे पण तो माणूस तुला शांत बसू देणार गपचूप त्याला लोमोटील सारखी एखादी गोळी दे आणि सोडून दे”. मी सरांना फोन लावला सर म्हणाले बर ठीक आहे त्यांच्या डॉक्टराप्रमाणे कर, मी ठीक आहे म्हणालो आणि त्याला तस सांगण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेलो तर तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्या. मी लगेच डिस्चार्ज फोर्मालीटी सुरु केल्या आणि सरांना फोन केला म्हणालो सर तो डिस्चार्ज मागतोय, सर पण क्षणाचा विलंब न करता म्हणाले पटकन देऊन टाक. पुढच्या तासाभरात तो हॉस्पिटलच्या बाहेर होता. दुसऱ्या दिवशी सर म्हणाले बर झालं त्याला डिस्चार्ज केलंस ते, त्याच्यासाठी मला काल OPD मध्ये कमीतकमी १०-१५ वेळा फोन आले. मी मनातल्या मनात म्हटले सुंठा वाचून खोकला गेला. आधीच्या २ हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्याने असंच केलं असाव. ही VIP माणस कधीच समाधानी नसतात म्हणूनच मंत्रालयाला त्यांच्या जुलाबाची दखल घ्यावीशी वाटते.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

Monday, January 27, 2014

नशीब



सकाळचा राउंड संपवून मी आणि माझा मित्र बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बँकेचे काम आटोपून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि पार्किंग कडे गाडी लावायला जात होतो इतक्यात आमच्यासमोर एक माणूस भोवळ येऊन पडला, मी उतरलो आणि त्याच्याकडे धावलो मित्राला सांगितलं गाडी पार्क करून ये, जवळच हॉस्पिटलच कॅन्टीन होतं तिथून कोणीतरी कांदा घेऊन त्याच्या नाकाला लावत होतं. तो पर्यंत मी तिथे पोचलो, त्याला बघितलं त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मी लागलीच त्याला कार्डियाक मसाज द्यायला लागलो(कार्डियाक मसाज मध्ये पिक्चर मध्ये दाखवतात तस छातीवर बुक्क्या मारत नाहीत तर चेस्ट बोन वर जोर देऊन मेंदूचा रक्त प्रवाह सुरु ठेवायचा  असतो). एकाला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि त्या माणसाला तातडीच्या सेवेच्या ठिकाणी आणलं. मग त्याला भराभरा इन्जेक्शनस दिली आणि त्याला ७-८ शॉकचे झटके दिले, श्वासाची नळी घातली. सर्व लोकं म्हणाले काही फायदा नाही, तरी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले १/२ तासाने त्याच हृद्य सुरु झालं. त्याला आम्ही अतिदक्षता विभागात ठेवले, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं. त्याला असा अचानक का झालं याचा शोध घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच्या हृदयाच्या तिन्ही मुख्य वाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या त्यातली १ १००% ब्लॉक होती आणि २ ९०% पेक्षा जास्त ब्लॉक होती. ५-६ दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि १०-१२ दिवसांनी त्याला वार्डमध्ये शिफ्ट केला. योगायोगाने तो आमच्याच युनिटमध्ये अॅडमिट होता त्यामुळे मी त्याला दररोज तपासणार होतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहित नव्हतं कि त्याला अॅडमिट करणारा मीच होतो ते, तो आता इतका चांगला झाला होता कि तो आता फिरायला लागला होता, मी त्याला विचारलं “आता कस वाटतय?” तो म्हणाला “सगळ चांगलं आहे पण डॉक्टरांनी माझ्या छातीवर एवढ दाबलय कि माझ्या २ फासळ्या तुटल्यात, लई दुखतंय बघा” मी त्याला पेनकिलर चा औषध दिलं आणि काही मलम लावायला दिलं आणि म्हणालो “जाऊदे काका जीव वाचला ते चांगलं, ते फ्रॅक्चर काय ३-4 आठवड्यात भरेल”.  त्याला बायपास ऑपरेशन सांगितलं होत, पण त्याच्याकडे पैसे नव्हते चॅरिटी ऑफिस ने त्याचा आत्तापर्यंत पूर्ण खर्च केला होता, ते त्याच्या ऑपरेशन चा निम्मा खर्च उचलायला तयार होते, पण तो नाही म्हनाला म्हणून त्याला औषधांवर घरी पाठवला. त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
आणखी एक अशीच घटना पुढे काही महिन्यांनी घडली, १ पन्नाशीचा माणूस त्याला १ वर्षापूर्वी सौम्य अर्धांगवायूचा झटका आला होता व तो मधुमेही आहे हे तेंव्हा समजलं होतं. तो वर्षभर काही हॉस्पिटलला फिरकला नाही, त्याची बहिण डॉक्टर होती आणि ती त्याला मधुमेहासाठी उपचार करत होती, त्याला २ दिवस धाप लागत होती आणि त्याची शुगर कंट्रोल मध्ये अजिबात नसायची, २ दिवस बहिणीने फोन वरून काही औषधं सांगितली पण त्याने काही फरक पडला नाही. घरच्यांनी त्याला हॉस्पिटल आणायचं ठरवलं आणि हॉस्पिटल ला येतानाच घरच्या जिन्यावर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले, घरच्यांना काहीच कळाल नाही आणि त्याला रिक्षात घालून हॉस्पिटलला आणेपर्यंत अर्धा-पावून तास झाला होता. हृदयाचे ठोके बंद झाल्यावर जर १० मिनिटाच्या आत कार्डियाक मसाज सुरु केला नाही तर ती व्यक्ती १००% दगावते, तरी आम्ही १/२ तास प्रयत्न केला पण या वेळी मात्र काळही आला होता आणि वेळही. काही वेळाने तिची डॉक्टर बहिण आली तिला आम्ही त्याचा मृत्यूची बातमी दिली, ती म्हणाली “असा कस शक्य आहे”. मी म्हणालो “जर मधुमेह कंट्रोल मध्ये नसेल तर बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही आणि अश्या वेळी फक्त दम लागतो, ते जर काल आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती”. खिन्न मनाने तिच्या भावाचा देह ती घेऊन गेली.
या दोन्ही घटना तश्या सारख्याच आहेत फक्त पहिला हॉस्पिटलच्या आवारात पडला म्हणून वाचला आणि दुसरा हॉस्पिटलच्या बाहेर पडला म्हणून गेला. दोघांचही नशिबच म्हणायचं.
                                                                                                                          -डॉ. सारंग कोकाटे