Thursday, September 3, 2026

प्लास्टर

 

एका ओर्थोपेडीक मित्राने सांगितलेला किस्सा आहे. त्याचाकडे एक जोडपं आलं. त्यांना १२ वर्षाचा एकूलता एक मुलगा होता. मुलाचा ३ महिन्यापूर्वी हात मोडला होता. तेंव्हा गावातल्या x-ray काढणाऱ्या माणसाकडे ते गेले होते. हाताचे कोपर आणि मनगट या मध्ये २ लांब हाडे असतात रेडीयस आणि अल्ना ती हाडे मधोमध तुटली होती. “हाडाच्या डॉक्टर कडे गेले तर ऑपरेशन करावे लागेल, ऑपरेशन चा खर्च जास्त येईल आणि मी स्वस्तात प्लास्टर घालून देतो” असे त्या x-ray काढणाऱ्या माणसाने त्या जोडप्याला सुचवलं आणि ते तयार झाले. त्याने प्लास्टर घातलं पण त्या मुलाचे दुर्दैव असं कि ते नीट घातलं नसल्याने दोन्ही हाडे वाकडी जुळली, ती इतकी वाकडी जुळली कि तो हात ७०-८० डिग्री कोनातून बाहेर झुकला होता, त्यामुळे त्या मुलाला काहीच करता येईना. ते काही दुरुस्त करता येते का म्हणून ते माझ्या डॉक्टर मित्राकडे गेले होते. डॉक्टर मित्राने त्यांना विचारलं “तुम्हाला माहिती आहे कि तो व्यक्ती डॉक्टर नाही तरी तुम्ही असं का केलं?” त्यावर ते जोडपं म्हणालं “पैसे वाचतील म्हणून केलं.” “किती पैसे घेतले त्याने?” डॉक्टरने विचारले. “५०००” त्या मुलाचे वडील बोलले. “अहो आम्ही एवढे डॉक्टर असून ३००० च्या आसपास घेतो आणि ऑपरेशन लागले असते तर ते शासकीय योजनेत फुकट झाले असते.” दोघांनी अपराधी भावनेने मान खाली घातली. आता तो हात दुरुस्त करण्यासठी गुंतागुतीच्या २-३ शस्त्रक्रिया लागणार होत्या आणि त्याचा खर्च खूप जास्त होता. त्यांना तो पेलवणारा नव्हता म्हणून मुंबईला KEM हॉस्पीटल ला जाण्याचा सल्ला माझ्या मित्राने दिला. शेवटी त्याने विचारलं “तुम्ही त्याच्या विरुद्ध तक्रार का करत नाहीये.” तो म्हणाला “आता आमची चुकी झाली साहेब त्याला दोष देऊन काय होणार”. डॉक्टर मित्र “अहो त्याच्यामुळे त्याच्या अश्या बेकायदेशीर उपचारामुळे दुसऱ्या कुणाचे नुकसान तरी नाही होणार, तुम्ही ऐका माझं पोलीसात तक्रार नोंदवा त्याची”. “नको डॉक्टर ते आम्हाला काय झेपायचं नाही” तो माणूस उत्तरला. माझ्या मित्राने त्यांना समजण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही तक्रार देण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी ते निघून गेले. नंतर त्या मित्राने तिथल्या लोकल डॉक्टर असोसिएशन शी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने त्या x-ray Technician च्या विरुद्ध तक्रार दाखल केली. शेवटी त्या मनुष्याने लाच देऊन सर्व अधिकाऱ्यांना गप्प केलं. काही महिने त्याचा हा धंदा बंद केला गेला आणि परत हळूच पुन्हा त्याचा x-ray च्या नावाखाली दवाखाना सुरु केला. त्याला परत विरोध केल्यावर स्थानिक पुढार्यांनी हस्तक्षेप करून त्याला अभय दिलं. “सिस्टीम, काय करणार?” असं म्हणत माझ्या मित्राने हा किस्सा संपवला. अजून किती निष्पाप लोक त्याला बळी पडणार या विचारात मी पडलो.

No comments: