Tuesday, June 30, 2026

Freedom of failure

 

सध्या OTT वर टायटन स्टोरी खूप गाजतीये, त्यातील एक प्रसंग आहे, टायटन चे MD देसाई हे सगळ्यात पहिले बनवलेले स्वदेशी घड्याळ JRD TATA यांना भेट म्हणून देतात, त्यावर खुश होऊन JRD सर्व टीम ला सकाळी नाष्ट्याचे आमंत्रण देतात, त्याच दिवशी संध्याकाळी एका पार्टीत; JRD अभिमानाने काही विदेशी उद्योजकांना घड्याळ दाखवीत असताना लक्ष्यात येत कि ते घड्याळ बंद पडलंय, त्यांना अपमानित झाल्याची भावना होते. दुसऱ्या दिवशी ते सगळ्या टीमची खरडपट्टी काढतात. त्यानंतर कॅन्टीन मध्ये देसाई आणि त्यांची टीम मन खट्टू करून बसलेले असतात. त्यावेळेस देसाई मिठाई मागवतात आणि म्हणतात कि आपल्याला आपल्या अपयशाचे सेलेब्रेशन करायला पाहिजे. असं केलं तर आपण आपलं अपयश स्वीकारून त्यातून शिकून, पुढे जाऊ शकतो. ते म्हणतात “Do we deserve to have freedom of failure?”, म्हणजे आपल्याला अपयशी होण्याचे स्वातंत्र्य आहे ना? हे वाक्य फार घर करून गेलं माझ्या मनात. कारण एक डॉक्टर सतत Fear of failure मध्ये जगत असतो. या विषयावर बरेच शोध निबंध लिहिले आहेत, त्यात डॉक्टरांमध्ये या Fear of failure मुळे stress hormones (संप्रेरके) जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे त्यांना लवकर शारीरिक व्याधी जडतात आणि समाजाच्या तुलनेत डॉक्टरांचे अकाली मृत्यू चे प्रमाणही जास्त आहे. Fear of failure म्हणजे उदा. अमुक अमुक पेशंटचा उपचारांना प्रतिसाद योग्य मिळेल का? दिलेल्या इंजेक्शन ला काही साईड इफेक्ट होणार नाही ना? ऑपरेशन दरम्यान काही प्रोब्लेम होणार नाही ना? एखादा सिरीयस पेशंट दगावला तर नातेवाईक कसे वागतील? असे ना ना प्रकारचे विचार प्रत्येक पेशंटच्या उपचारा दरम्यान येतात, त्याने मानसिक ताण वाढत असतो. मग ते कायदेशीर नियम; त्यांचे पालन करणे, संमती घेणे, MLC पाठवणे इत्यादी बऱ्याच गोष्टीमुळे आपल काही चुकलं तर? हि कल्पना कायम Fear of failure ची टांगती तलवार म्हणून लटकत असते. कित्येक घटना बघायला मिळतात.  डॉक्टरांवर हल्ले होतात. त्यातून हि Fear of failure ची भीती आणखी वाढत जाते. आजची नवीन डॉक्टर पिढी बघा बहुतांश जण स्वतःचे हॉस्पीटल टाकण्याची भानगडी करत बसत नाहीत, सरळ कॉर्पोरेट हॉस्पीटल मध्ये नोकरी करतात. डोक्याला त्रास नको म्हणतात. याने झाले काय बहुतेक डॉक्टर शहरातच राहतात, गावांकडे तज्ञ डॉक्टरांची वानवा असते, जे कोणी सध्या आहेत ते सुद्धा एका ठराविक पातळीच्या वर सिरीयस पेशंट बघणे टाळतात. रुग्णसेवा कोलमडते.

एक माझे सिनियर MD डॉक्टर मित्र होते ते एका गावात वैद्यकीय व्यवसाय करायचे. त्यांच्याकडे एक पेशंटला छातीत दुखत होतं म्हणून आणलं. तो आल्या आल्या तपासायच्या आधीच बाहेर कोसळला आणि गत प्राण झाला. त्या पेशंटचा मुलगा माझ्या वडिलांना लवकर का बघितले नाही म्हणून डॉक्टरला मारायला लागला त्याच्याबरोबर आणखी २-४ मुलांनी पण मारहाण केली. कसाबसा त्यातून बाकीच्यांनी डॉक्टरांना सोडवलं. नंतर डॉक्टरांनी पोलीस केस केली. पुढच्या काही दिवसात लोकल नेत्यांनी डॉक्टरला गप्प बसायला भाग पाडले. या सगळ्याला कंटाळून त्यांनी ते गाव सोडलं आणि जवळच्या शहरात एका मोठ्या हॉस्पीटल ला नोकरी पकडली. काही महिन्यांनी तेच पुढारी डॉक्टरांकडे गेले. विनवण्या करत होते कि गावात परत या म्हणून, झालं असं कि पुढच्या काही महिन्यात गावात डॉक्टर नसल्याने १० - १५ मृत्यू झालेले, गावकरी त्या नेत्यांना म्हणत होते. डॉक्टरांना त्या वेळी त्रास दिलं नसता तर बर झालं असतं. आपली सोय गेली. डॉक्टर काही गेले नाहीत. पुढे काही दिवसांनी मी माझ्या गावी जाणार आहे कळल्यावर ते मला समजावत होते. जाऊ नको लेका इथंच बरं आहे. लोकं आपली चूक असो वा नसो आपल्यालाच दोषी ठरवतात. इथं आपल्या चुकीला माफी नाही.

मला एक प्रश्न पडला Do the doctor's deserves freedom of failure?

No comments: