Thursday, November 21, 2019

‘पुरा’नुभव


४ ऑगस्ट २०१९, रविवार. पुण्याहून घरी येत होतो. घरच्यांचा फोन वर फोन, कधी येतोयस कधी येतोयस. का तर नदीला महापूर आलेला होता कोणत्याही क्षणी नरसोबावाडी-कुरुंदवाड चा पूल बंद होणार होता.  कुरुंदवाडमध्ये प्रवेश केल्या केल्या शिवाजी पुतळा आहे त्याच्या समोर जो रस्ता आहे त्यावर पाणी आले होते. त्याची पातळी अजून वाढली कि ते पाणी जोरदार वाहणार होतं, हा नेहमीचा अनुभव. याला आमच्या भागात पाण्याला धार पडली असं म्हणतात. एकदा का हि धार पडली कि मग तिथं गाडी तर सोडाचं चालताही येत नाही. प्रयत्न केला तर पुरात वाहून जाण्याची शक्यता दाट, म्हणून धार पडायच्या आधी मी घरी यावं अशी आमच्या घरच्यांची इच्छा. रात्री ११ वाजता शिरोली फाट्यावर पोहोचलो, वेड्यासारखा पाऊस पडत होता, समोरचं अजिबात दिसत नव्हतं. शिरोली पुलाच्या कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडला पाणी आलं होतं आणि असा अंदाज होता तासाभरात दुसऱ्या बाजुनेपण पाणी भरणार होतं. बऱ्याचश्या बसेस बंद केल्या होत्या. मला जयसिंगपूरला कोणत्याही परिस्थितीत पोहचायचं होतं, तिथं मला न्यायला वडील आणि एक मित्र येणार होते. बऱ्याच वेळाने मला कर्नाटकची एसटी मिळाली, गर्दी होती, कसाबसा  जयसिंगपूरला पोचलो. वडील कधीच येऊन थांबले होते. गाडीतून आम्ही घरी जायला निघालो. वाडी-कुरुंदवाड पुलावर १-२ इंच पाणी आलं होतं, तीच परिस्थिती शिवाजी पुतळ्यासमोर होती. रात्री १२.३०- १ च्या दरम्यान घरी पोचलो. सगळं गाव जागं होत. प्रत्येकाच्या तोंडात पुराचीच चर्चा. जोरदार पाऊस सुरूच होता.
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे OPD सुरु केली पण एकदमच शांत होती. २ व्हीलर वरून आख्या गावाची चक्कर मारली, रात्रीत वाडी-कुरुंदवाड रस्त्यावर ३-४ फूट पाणी आलं होतं, दुसऱ्या बाजूला तेरवाडचा रस्ता पण बंद झाला, शिरढोण मार्गे इचलकरंजी रोड  तर कधीच बंद झाला. आता फक्त एकच रस्ता उरला होता गावातून बाहेर पडायचा तो म्हणजे मजरेवाडी मार्गे, गुरुदत्त कारखाना तिथून हुपरी.
दुपारी साधारण ३ च्या दरम्यान, गावातले एक माझे डॉकटर मित्र होते गायनॅक त्यांचा फोन आला "अरे सारंग तुझ्या हॉस्पिटलला बेड आहे का रे?" मी "आहे कि, का?"; सर "अरे सकाळी मी एक सेक्शन केलं पण दुपारपर्यंत माझ्या हॉस्पिटलमध्ये पाणी आलंय, तुझ्याकडे शिफ्ट करायचं म्हणतोय, २००५ ला तुझ्या कडे पाणी आलं नसेल ना?". कुरुंदवाडच्या इतिहासात आजपर्यंत २००५ चा महापूर हा सगळ्यात मोठा होता, त्यावेळी जवळपास ८०% गाव बुडालं होतं. मी " नाही सर नव्हतं आलं, तुम्ही पाठवा पेशंट काही प्रॉब्लेम नाही". तासाभरानं पेशंट आला, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काही मिनिटात सर आले आमच्यात थोडं डिस्कशन झालं आणि तिला पुढची पोस्ट ऑपरेशन ची ट्रीटमेंट सुरु केली. इकडं पाणी गावात शिरत होत, शालिकाच्या शाळेत पाणी गेलं होत त्यामुळे तिला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ती घरीच होती. तिचा आणि संयुजांचा धुडकुस चाललेला त्यात भर म्हणजे त्या पेशंटचा २ वर्षांचा मुलगा होता राजवीर, तो पण त्या दंग्यात सामील झाला. इकडं सगळ्या गावात मात्र चिंता पसरत होती, पाणी झपाट्याने वाढत होतं, कोयना, राधानगरी धरणभागात पाऊस थांबत नव्हता त्यामुळं अजून पाणी वाढणार होती. मी न्यूज चॅनेल लावून बसलो. मीडिया नुसता मोदी आणि अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होता का तर काश्मीर प्रश्न सोडवला कलम ३७० रद्द केलं या साठी. मराठी न्यूज चॅनेलवर पण तेच. खाली बातम्यांच्या पट्या फिरतात त्यात मात्र पाऊस, पुणे, नाशिक, मुंबई मध्ये वाहतुकीची कोंडी, महालक्षमी एक्सप्रेस मधले प्रवासी असे वाचवले याची चर्चा. बाकी काहीच अपडेट नव्हते. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती असताना जलसंपदा मंत्री मात्र काश्मीर प्रश्न सोडवल्यामूळ आनंदात होते आणि रस्त्यावर डान्स चालला होता. असो.
बुधवारी पाणी घरापासून फक्त १०० फुटावर राहिले होते, उरला सुरला मजरेवाडी रस्ता एव्हाना बंद झाला होता. आमचं गाव आता ३ बेटांसारखं दिसत होतं. एक छोटा बेट राजवाडा, दुसरा सगळ्यात मोठा बेट म्हणजे माळभाग, इथं माझं घर आणि हॉस्पिटल होतं. तिसरा सगळ्यात लहान बेट म्हणजे दत्त कॉलेज परिसर. बहुतांश लोक गाव सोडून आधीच गेले होते. राजवाडा भागात काही लोकं निर्वासित झाली होती तिथं साधारण २०००-२५०० माणसं होती, आमच्या म्हणजे माळभागावर सगळ्यात जास्त १०-१५ हजार लोक निर्वासित झालेली आणि दत्त कॉलेज परिसरात हजारभर माणसं होती. या तिन्ही ठिकाणी जायचं एकचं साधन म्हणजे बोट. भैरेवाडी म्हणून एरिया पूर्ण बुडाला होता त्यांचे २ मजले पाण्याखाली होती. तिथं शेकडो माणसं अडकली होती, त्यांची जी दुभती जनावरं होती त्यांना तिथल्या उंच इमारतीच्या गच्चीवर बांधण्यात आलं होतं. त्यांना सांभाळण्यासाठी पुरुष मंडळी तिथं राहिले होते व लहान मुले, बायका यांना माळभागावर राहायला पाठवलं होतं. ३ त्यातली कुटुंबं माझ्या घरी राहायला होती, बाकीची आपापल्या ओळखीने राहत होती तर बरेच लोक रस्ता बंद व्हायच्या आधी गुरुदत्त कारखान्यावर गेली होती.
गावामध्ये जसजसं पाणी वाढत होतं  तसतसं त्या भागातली लाईट बंद करत होते. आईला २००५ च्या पुराचा अंदाज होता, पिण्याचा पाणी पुरवठा लवकरचं बंद होणार होता. सोमवारपासून आम्ही घरातली सगळी माणसं RO केलेले पाणी हळूहळू भरायला लागलो, दर तासादोन तासाला घरच्या RO फिल्टर मधनं फक्त १५ लिटर पाणी मिळायचं, आम्ही ते भरायचो आणि वरच्या मजल्यावर ४-५ पिंप ठेवले होते त्यात भरायचो. ते सर्व पिंप भरायला बुधवार उजाडला. बुधवारी संध्याकाळी आमच्या एरियाचा DP पाण्याखाली गेला आणि घर व हॉस्पिटल ची लाईट गेली. दरम्यानच्या काळात आईवडिलांनी गहू, तांदूळ व डाळी १५-२० दिवस पुरतील या हिशोबाने भरून ठेवलं होतं.
या काळात वैद्यकीय अनुभव तर तुफान आले. इन्व्हर्टरवर बुधवारची रात्र कशी बशी गेली, माझी ECG मशीन मी चार्ज करून घेतली होती. आता जवळपास ८० टक्के गाव पाण्यात होतं माझं आणि आणखी २-३ जणांचे दवाखाने फक्त चालू राहिले होते. आम्ही ठरवलं कि आता रस्ता मोकळा होईपर्यंत मोफत उपचार करायचे त्यामुळं दवाखान्याला भरपूर गर्दी. एक जण आला अति दारू प्यायल्याने बेशुद्ध होता त्याला फिट येत होत्या. त्याला ऍडमिट केलं, दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला त्याला समजावून घरी पाठवलं. संध्याकाळी भैरेवाडीतली ओळखीतले ३ कुटुंब राहायला आली. ती ८-१० जण, आम्ही घराचे ६ जण आणि बाळंतिणीचे ४-५ जण अशी घरात २० एक लोकं होती. त्या सगळ्यांचं जेवणखाणं वगैरे करण्यात आमची हि आणि आई लागली होती. जिन्याच्या पोर्च आमचं स्वयंपाक घर झालं होतं. गुरुवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान पाणी आमच्या घराच्या मागच्या बाजूला लागलं. पहाटे ४ ते सकाळी ११ वाजेपर्यंत आख्या तळमजल्यावरचं सामान ३ ऱ्या मजल्यावर शिफ्ट केलं होतं. गुरुवारी संध्याकाळी जवळपास ९५ टक्के कुरुंदवाड पाण्याखाली होतं. घरात मागच्या बाजूला पाणी चढलं. आता माझ्याकडे अस्वस्थ असलेले पेशंट यायला लागले होते. कुणाचं शेतीच नुकसान झालेलं, कुणाचं घर पडलेलं, कुणाचं सामान वाहून गेलेलं. माझ्याकडे औषधं होती तोपर्यंत मी ती दिली. समोरच्या मेडिकल वाल्याने मात्र तप्तर सेवा दिली. लोकांकडे हार्ड कॅश नव्हती. त्याने उधारीवर  ६०-७० हजाराचा माल वाटला. शुक्रवारी घराच्या पुढच्या साईडला म्हणजे हॉस्पिटलमध्ये पाणी आलं. जवळपास माझं घर रस्त्यापासून ३ फूट उंचावर आहे. माझ्या घरात १ फूट पाणी होतं. म्हणजे रस्त्यावर ४ फूट (म्हणजे कमरेच्या वर पाणी आलं होतं). त्या पाण्यातच माझी ओ . पि . डी  चालायची. एक गरीब कुटुंब आलं लहान बाळाला घेऊन, त्याला चांगलाच ताप आलेला आणि खूप खोकला होता. माझ्याजवळची औषधं  संपली होती. समोरच्या मेडिकल मध्ये पण संपली होती. अजून एक मेडिकल दुकान उघडं होतं  तिथं त्या पोराचा बाप जाऊन आला अर्थात कमरेएवढ्या पाण्यातनं, त्याला १०० रुपये कमी पडत होते. मी २०० रुपये दिले म्हणालो त्या पोराला कायतरी खायला पण दे. तो बापडा हात जोडून बघत राहिला, मी त्याला थोपटलं आणि जा म्हणालो. २ दिवसांनी तो परत आला २०० रुपये द्यायला. स्वाभिमानी होता. त्याला कसबस समजावलं आणि म्हणालो लेकरांसाठी दूध घे याच; १०० रुपये लिटरनं मिळतंय आजकाल. आशीर्वाद देत गेला.  दुसऱ्या एका गायनॅक डॉक्टरांचा मला फोन आला; त्यांच्याकडे ८ महिन्यांची प्रेग्नेंट बाई ऍडमिट होती, तिला न्यूमोनिया झाला होता. धाप लागत होती. डॉक्टरांनी मला कंसल्टेशन ला येशील का म्हणून विचारलं. त्यांचं हॉस्पिटल १ कि.मी. लांब आहे, तिथं जायला मला साधारण १००-२०० मीटर अंतर कमरेएवढ्या धार पडलेल्या पाण्यातून जावं लागणार होत . या दरम्यान माझा जरा जरी तोल गेला असता तर मी वाहून गेलो असतो. मी क्षणभर विचार केला आणि हो म्हणालो. ते १००-२०० मीटर अंतर पार करायला मला दीड तास लागला. मी पेशंट बघितला, ट्रीटमेंट प्लॅन दिला, परत जाताना मात्र माझ्या दिमतीला ४ माणसं आली त्यांनी मला परत सोडलं. पुढं २ दिवसांनी सरांचा निरोप मिळाला कि पेशंट आऊट ऑफ डेंजर आहे.
शुक्रवार-शनिवार पर्यंत कोणत्याच सरकारी खात्याची मदत आलेली नव्हती. लोकांकडे खायला अन्न कमी पडायला लागलं, गावातल्या काही पुढारी मंडळींनी एक लाकडी नाव घेतली आणि अडकलेल्या लोकांची सुटका करायला सुरु केलं. गावातल्या एका धान्य व्यापाऱ्याच्या गोडावून मध्ये पाणी शिरलेलं, जी चांगली धान्याची पोती होती ती त्याला पैसे देऊन मागत होती. त्याने नकार दिल्यावर त्याच्या समोर गावातल्या लोकांनी त्याचं आख्ख दुकान लुटलं आणि घराघरात धान्य वाटत सुटली. आम्हा डॉक्टरांना पण प्रश्न पडला होता आता करायचं काय, कारण लोकं पुराच्या घाण पाण्यानं अंघोळ करत होती, शौचालयं नसल्यानं कुठंही बसत होती, त्यामुळं साथीचे आजार पसरण्याची भीती होती. सर्दी-खोकला ताप, जुलाब-उलट्या, स्किन इन्फेक्शन यांनी ऊत आणला होता. ट्रीटमेंट द्यायला डॉकटर तर होते पण औषधं नव्हती. कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन ने जयसिंगपूर, इचलकरंजी असोसिएशन च्या मदतीने, बोटीतून जाऊन औषधं आणली. ती कुरुंदवाडच्या ३ टापूवरील डॉक्टरांकडे पोचली आणि दिवसरात्र वैद्यकीय सेवेचा घाणा फिरत होता. रोज कॅम्पवर कॅम्प होऊ लागले. ४ पोरं अशी सापडली ज्यांना मोठेमोठे गळू होते, त्यांना ड्रेन करणं गरजेचं होतं. त्यांना हॉस्पिटलला घेऊन येत होतो तोवर आमचे सर्जन मित्र भेटले. त्यांना घेतलं त्यांनी लीलया ते गळू फोडले ते पण बॅटरीच्या उजेडात. त्या पोरांना औषधं दिली आणि पाठवलं. असंच एका रात्री साडेअकरा-बारा च्या  एक पेशंट आली. तिच्या छातीत दुखत होतं. धाप लागत होती. ३ महिन्यापूर्वी तिची अँजिओ प्लास्टी झाली होती. माझी आई मेणबत्ती धरून उभी होती, लाईटच नव्हती. त्या पेशंट ची BP २४०/१२० होती. ECG मध्ये हृदयावर ताण पडतोय असं वाटत होतं (Unstable Angina). ऑक्सिजन होता तो तिला लावला. माझ्याकडे ना औषधं होती ना कुठली वैद्यकीय उपकरणं चालवू शकत होतो. हॉस्पिटलचं बरंच सामान हलवलं होतं, त्यामुळे कुठं काय ठेवलंय याचा पत्ता नव्हता. एकतर ती गाव सोडून बाहेर कुठे उपचार घ्यायला जाऊ शकत नव्हती आणि प्रयत्न केला असता तर तिला उपचार मिळायला ५-६ तास लागले असते. तोपर्यंत २४० BP मुळे तिला स्ट्रोक बसला असता किंवा डेथ झाली असती. जे काय व्हायचं होत ते फक्त इथंच होतं त्यामुळे मी ती मेणबत्ती घेतली आणि जिथं सामान ठेवले तिथं काय सापडतंय का बघितलं. ५-१० मिनिटं शोधल्यावर मला betaloc नावाचं इंजेक्शन सापडलं, त्यानं तिची BP कमी येणार होती पण छाती दुखणं बऱ्यापैकी कमी येईल का या बद्दल शंका होती. तिच्याबरोबर तिची मुलगी होती, तिला सगळं सांगितलं. ती म्हणाली तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. मी ते इंजेक्शन दिलं. तिच्याजवळ तिच्या रक्त पातळ करायच्या गोळ्या होत्या त्या दिल्या आणि आता सगळं देवावर सोपवलं. २ तासांनी तिची BP कमी झाली. छातीवरचा ताण पण कमी झाला. खरं हे २ तास माझी एवढी वाट लावतील असं वाटलं नव्हतं. त्या बोचऱ्या थंडीत मला घाम फुटला होता. मॉनिटर नसल्याने मी दर १०-१५ मिनिटाला तिची BP चेक करत असे. रात्रीची वेळ असल्याने पेशंट झोपली. त्यामुळे मी तिला दार १/२ तासानं उठवायचो अन विचारायचो कमी आहे का? खर तर ती जिवंत आहे का असली तर शुद्धीवर आहे का हे बघत होतो. २ तासांनी तिला बर वाटलं तोवर तिचा नवरा पण आला होता. तो म्हणाला साहेब तीला टेन्शन आलं कि तिची BP वाढते. मी तिला विचारलं कसलं टेन्शन आहे तर ती बया चक्क गायला लागली "दुष्मन न करे दोस्त ने ऐसा काम किया है.... ". मी म्हणालो छान आहे या परिस्थितीत पण गाणं सुचतंय. तिला घरी पाठवल, रात्री हॉस्पिटल ला ठेऊन फायदा नव्हता, चालूच नव्हतं काही, शिवाय आपल्या लोकांच्यासोबत असली कि मन शांत राहील हा हेतू. रात्री काही वाटलं  तर यायला सांगितलं नाहीतर सकाळी परत भेटायला सांगितलं. आता ती आहे व्यवस्थित. एक म्हाताऱ्याला संध्याकाळी काही लोकं घेऊन आली. त्या पेशंटला रोज दारू लागायची आता या परिस्थितीत त्याला मिळत नव्हती म्हणून त्याचे हातपाय थरथरायला लागले होते, असंबंध बरळत होता याला आमच्या भाषेत अल्कोहोल विड्रावल म्हणतात. त्या लोकांमध्ये एक लोकप्रतिनिधी होता त्याला म्हटलं "साहेब, ह्या पेशंटला आठवडाभर ऍडमिट ठेवावं लागेल, बांधून घालायला पाहिजे आणि उपचार करायला पाहिजे. याच्या उपचारासाठी जी औषधं लागणार आहेत ती आत्ता नाहीयेत आणि लवकर मिळणार पण नाहीत. एक काम करा त्याला दारू द्या प्यायला तासाभरात सरळ होईल नंतर पूर ओसरला कि मग आपण ट्रीटमेंट करू". तो लोकप्रतिनिधी माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला आणि हसायला लागला. त्याने पोरांना चपटी आणायला सांगितली. आई त्याला म्हणाली "साहेब त्याला हॉस्पिटलच्या बाहेर द्या नाहीतर लोकं रांग लावतील इथं दारू प्यायला सांगत्यात म्हणून". सगळी हसायला लागली. त्याला हॉस्पिटलच्या बाहेर नेलं चपटी पाजली १५ मिनिटात पेशंट एकदम टकाटक.
रोज कॅम्प व्हायचा, आम्ही १००-१२५ पेशंट बघायचो. सर्दी खोकला, जुलाब, पोटदुखी, फंगल इन्फेक्शन यांना ऊत आलेला. ६-७ दिवसानी सरकारी मदत यायला सुरु झालेली. त्यात औषधं यायची ती वाटायला लागायची. माळभागावर जी थोडी जमीन शिल्लक त्यात एस. पी. हायस्कुल होतं, तिथं मोठं ग्राउंड आहे, त्या शाळेत बरीच निर्वासित राहिले होते आणि तिथं बोर्डिंग स्कुलची चारपाचशे पोरं होती. तिथंच सरकारी यंत्रणा राबत होती. हेलिकॉप्टर तिथं उतरायचं त्यातनं सामान यायचं मग ते कुरुंदवाड सह आजूबाजूच्या खेडयांना बोटीतून पाठवत असे. त्याच चॉपरने आम्ही काही पेशंट शिफ्ट केले. एक हार्ट अटॅक, एक अवघडलेली बाई, २ अत्यवस्थ मुलं, एक ९५ वर्षाची मांडीचे हाड मोडलेली म्हातारी इत्यादी.
संपूर्ण गावातून पुराचं पाणी जायला चांगले १५-२० दिवस गेले होते. ८-१० दिवसांनी मजरेवाडी रोड खुला झाला त्यामुळं गावात मदत यायला सुरु झाली. आता पर्यंत TV वर कुरुंदवाडची बातमी गेली होती आणि अख्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ यायला सुरु झाला. जसं जसं पाणी कमी झालं तस तस त्याची भयानकता जाणवायला लागली. आख्या गावाला कचऱ्याकुंडीचं स्वरूप आलेलं, दुर्गंध आणि कचऱ्याने सगळे हैराण झालेले. प्रत्येकजण आपापल्या  घरात जात होता, कुणाचं घर पडलं होतं, कुणाची भांडी-कपडे वाहून गेलेले, कुणाचं फर्निचर खराब झालेलं, इलेकट्रॉनिक वस्तूंचा तर खुळखुळा झालेला. प्रत्येकजण डोक्याला हात लावून बसायचा. शेतातली पिकं तर विचारू नका. लाखो-करोडॊ रुपयांचं नुकसान झालेलं. आता प्रत्येक कुरुंदवाडकर पुढले काही दिवस सफाईचा मागे लागला. नगरपालिकेच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे दिवस रात्र राबून ते कचरा वाहून नेत होते. बऱ्याच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते संपूर्ण देशातून येत होते त्यांचाही हातभार लागत होता. वायरमन परत लाईट जोडत होते. ज्यांची घरं पडली होती ते लोकं पुढचे काही महिने राहण्यासाठी भाड्याच्या जागा शोधत फिरत होते. अख्या महाराष्ट्राने सर्व पूरग्रस्त भागाला मदतीचा हात दिला. २-२ महिन्याचं रेशन दिलं. स्टोव्ह, कपडे औषधं इत्यादी सामान दिलं गेलं. त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नाही हे खरं. बाहेरून बरीच वैद्यकीय मदत येत होती. कॅम्प घडत होते. बाहेरून डॉक्टर्स येत होते. पुढचे काही आठवडे असच चालू होतं त्यामुळं गावातल्या डॉक्टरांना थोडा आराम मिळाला. या पूर काळात मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे पहायला मिळाले. मदतीचे हात दिसले, परिस्थितीवर पोळ्या भाजणारे लोकं पण बघितली. मदतीच्या आलेल्या गाडयांना अडवून त्यातल्या सामानाची लुटालूट पण बघितली. त्याच सामानाची साठेबाजी करून विक्रीस काढलेलं पण बघितलं आणि आलेली मदत ढापून नंतर निवडणुकीत त्याचा वापर केला, स्वतःला दानशूर समाजसेवक असल्याचं भासवून मतं विकत घेणारे उमेदवार पण बघितले. या वर्षीच्या पुराने पुरा अनुभव दिला हे खरं .
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Sunday, January 27, 2019

सुचलेल्या शब्दातून अन् शब्दातून सुचलेले



***
आसवांची त्या कदर ठेऊन,
एक हात आला रुमाल घेऊन,
त्या दोघांचे प्रेम पाहून,
पाऊस आला जोरात धावून.
***
पहिल्यांदा तुला पाहिलं मी राणी,
तेंव्हा पावसात म्हणत होती तू गाणी,
तुझ्याशी नजरानजर झाली ज्या क्षणी,
काळजाचं झालं गं माझ्या पाणी पाणी
***
या शांततेत नेहमी काहीतरी घडत असते,
मात्र हे आतलं वादळ सर्वांना दिसत नसते,
हसर्‍या गालावरच्या रेषा नेहमी,
सुकलेले ओघळ झाकत असते.
***
बघ असं मला काही पण सुचतं,
सुचल्यावर मग ते शब्दात बसतं
***
आंबट-तिखटाशिवाय गोडाची चव कळत नाही,
रात्र असल्याखेरीज दिवसाचं मह्त्व कळत नाही,
पुसायचे असतात चरचरते अश्रु हसत कारण,
दु:ख असल्याशिवाय सुखाला अस्तित्व मिळत नाही.
***
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये,
नाही तिला दिशा, झालिये तिची दशा,
विचारांच्या भोवर्‍यात गरगरताना दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
बुडतही नाहीये, तरतही नाहीये,
भावनेंच्या कल्लोळांवर हिंदकळताना दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
तुटतही नाही, टिकतही नाही,
उदासिनतेच्या सागरात हरवलेली दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
किती व्हल्ले मारा, किती शिडं उभारा,
तर्क-वितर्काच्या वादळात अडकलेली दिसतिये,
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
आज माझ्या शब्दांची नाव कुठेतरी भरकटताना दिसतिये...
***
माझ मन आज जरा विचित्रपणा करायला लागलयं,
का कुणास ठाऊक सारखं इतिहासात बघायला लागलयं
कसली हुरहुर लागलिये कुणास ठाऊक,
आनंदात सुद्धा उदास करायला लागलयं
***
भावनांचा कारंजा मला शब्दातुन उडवायचा असतो,
मनातलं सारं माझ्या कवितेत सांडायचं असतं,
लिहायला घेतो काहीतरी सुचेल म्हणुन,
माझ्याकडचा शब्दकोष मात्र तेंव्हा आटला असतो.
***
विचारतेस मला तुझं माझ्यावर प्रेम किती,
किती विचारुन घालते प्रेमाला मर्यादा किती,
विचारतेस तर सांगतो माझं प्रेम किती,
मला सांग आहे विश्वाची मर्यादा तरी किती.
***
                               -डॉ. सारंग कोकाटे 

Saturday, September 29, 2018

प्रेम


दुपारचे 2 वाजले होते, आमच्या हिने डबा दिला नव्हता म्ह्णुन घरी जेवायला जात होतो. इतक्यात फ़ोन वाजला, पलिकडुन आवाज आलासर कुठं आहात? स्वामिजींनी अर्जंट बोलावलयं.’ मी तशीच गाडी वळवली. हॉस्पिटल च्या आयुर्वेदिक विभागामध्ये स्वामिजी बसले होते. तिथं न्युरोसर्जन आणी मठातील काही कार्यकर्ते बसले होते. तिथं पहील्यांदा त्या दोघांची आणी माझी भेट झाली. त्याला आधी बघितलं होतं खुपदा, अधुनमधुन मला स्माईल द्यायचा. तिला म्ह्णजे तिच्या बायकोला पहिल्यांदा बघतं होतो. दोघही तिशी पस्तिशीतली होती. स्वामींजींची ती मानसकन्या, आजारी होती आणी तिला तपासण्यासाठी मला बोलवलं होतं. 8-9 वर्षापुर्वी तिला स्तनाचा कॅन्सर झाला होता. रितसर तो कापण्यात आला केमो/रेडीयशन चा मारा करण्यात आला. 2-3 वर्षे बरी गेली नंतर उरलेल्या स्तनाने नंबर लावला. त्यालाही छाट्ण्यात आलं, पुन्हा एकदा केमो/रेडीयशन, पुढ़ं तो मेन्दुत पसरला, तिच्या दोन्ही पायांच्या आणी एका हाताच्या धमण्या कॅन्सरमुळे चोक झाल्या होत्या. त्या साठी सुद्धा सगळ्या आधुनिक उपचारपद्धती घेऊन झाल्या होत्या. आता फ़क्त वेदनामुक्त जगता यावं यासाठी औषधे होती. (अश्या दुखण्यात ती सुद्धा कमी पडतात) तिचं डोकं दुखत होतं, त्ती विव्ह्वळत होती. मी तपासलं, तिचा डावा डोळा बंद होता, सुजला होता, संपुर्ण अंगावर सुज होती, चेहरा काळवंडला होता. तो तिच्या डोक्यावर हात फ़िरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होता. नुकताच तिचा MRI Scan झाला होता त्यात मेंदुमधल्या गाठी(Brain Metstatic lesions) काही वाढलेल्या दिसत नव्ह्त्या, न्युरोसर्जन म्हणाला “अरे यार ब्रेन मे कुछ नही लगता”. “हा सर उसको left Maxillary sinusitis और left retro-orbiltal cellulitis है” (नाकाच्या बाजुला हवेच्या पोकळी असतात, त्या पोकळ्यांमध्ये आणी डोळ्यांच्या खोबणीमध्ये जंतूसंसर्ग झाला होता, सायनस चा त्रास आहे असं काही जण म्हणत असतात त्यातला गंभीर प्रकार) मी बोलत होतो “उसको हाय डोस मे स्टेरोइड चल रहा है तो इन्फ़ेक्शन के चान्सेस भी रेहते है”. “हा यार सही है पर इसका स्टेरोइड बंद नही कर सकते वरना ब्रेन मेट्स के बजेसे उसको बहुत पेन होगा और कोई रास्ता नही है”. सही है सर, उसको हाय डोस ॲटीबायोटीक्स देना पडेगा, ENT और Opthalmologist को भी involve करना होगा” मी. “सर सगळं करुया आपण” तो मध्येच बोलला. स्वामिजींनी पण नजरेने संमती दाखवली आणी त्याला म्हणाले “हे बघ जे काही करायचे ते इथंच करायचं, परत मुंबईला जायचं नाही, आधीच आपण भरपुर प्रयत्न केले आहेत. काय?” त्याने मान डोलावली. स्वामीजी माझ्याकडे बघुन म्हणाले “डॉक्टssर; तुम्हाला जे योग्य वाटते ते करा”.
ती रितसर ॲडमीट झाली, महागडी ॲटीबायोटीक्स आणी तिच्या बाकीच्या प्रोब्लेमसाठी बरीच जुनी नवी औषधे सुरु झाली. ENT surgeon नी बघीतले तिच्या सायनस ची एन्डोस्कोपी झाली. रिपोर्ट्स आले तिच्या सायनस मध्ये Mucormycosis नावाच्या बुरशीचा संसर्ग झाला होता. खुप चिवट आणी जिवघेण संसर्ग असतो हा. त्या साठी एक इन्जेक्शन असते ते महाग आणी रिस्की दोन्ही आहे. मी त्याला समजुन सांगितलं जर आपण इन्जेक्शन नाही दिलं तर त्या बुरशीचा संसर्ग वाढणार आणी 100% डेथ होणार. जर आपण औषधं दिलं तर एक म्हणजे तिच्या किडन्या खराब होऊन लघवी बंद होऊ शकते आणी डायलेसिस लागु शकते पण हे तिच्या बाबतीत होईल कि नाही या बद्दल काही सांगु शकत नाही. दुसरं म्हणजे एक इन्जेक्शन हे 3-4 हजार रुपयांना येते आणी दिवसाला आपल्याला 2-3 डोस द्यायचे आहेत तेही 2-3 आठवडे, म्हणजे दिवसाचा फ़क्त एका औषधाचा खर्च अंदाजे 10-12 ह्जार होणार आणी टोटल 2-2.5 लाख रुपयाचं फ़क्त एक औषध होणार, बाकीची औषधे, हॉस्पीटलचा खर्च, जर काही कॉम्पलिकेशन्स आले तर वेगळा खर्च होणार. एवढं सगळं करुन तिची वाचायची शक्यता 50-60% आणी तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी 100% जाणार.
त्याने 2 मिनिट पॉझ घेतला, मग हसला (तो चेहरा हसत होता पण डोळे रडत होते, मोठ्या प्रयत्नांनी त्याने डोळ्यातले पाणी आटवले आणी मला कर्टसी दाखवायला हसला) म्हणाला “सर आपण प्रयत्न करुयात पण एकदा मुंबईल्या डॉक्टरांशी आणी स्वामिजींशी एकदा बोलु का?”; मी “हो चालेल”.
मुंबईतल्या डॉक्टरची आणी माझी चर्चा झाली, स्वामिजींनी पण परवानगी दिली आणी ट्रिटमेंट सुरू झाली, 1 महिना ती ॲडमीट होती, कशीबशी त्या बुरशीविरुद्धची लढ़ाई ती जिंकली होती. अजुन पुढं लढ़ाया बाकी होत्या, त्याची कल्पना मला होती पण त्याचा डिसचार्ज दिवशीचा चेहरा बघितला आणि काही बोललो नाही. उगाच त्याच्या आनंदावर विरजण नको. “डॉक्टर, हिला पुढ़ं बरीच ट्रिटमेंट लागणार आहे हे माहितिये, तिला आता थोडी आयुर्वेदिक ट्रिट्मेंट करावी म्ह्णतोय तर तुमच्या ट्रिट्मेंट बरोबर ती चालु करु का?” मी “काही हरकत नाही फ़क्त आयुर्वेदिक डॉक्टरांना आपली सगळी औषधं दाखवा”. पुढ़ं ती आयुर्वेदिक विभागात होती.
पुढ़चे काही महीने ती तिथं होती. तो तिला रोज व्हीलचेयर वर फ़िरवायचा, कोवळ्या ऊन्हात बसवायचा, तिला रोज घास भरवायचा, अंघोळ घालायचा, तिचे शौचाचे कपडे बदलायचा, औषधं खायला घालायचा. अधुन मधुन मला बोलवायचा मी तिला तपासत असे औषधे देत असे, ति त्याच्यावर सगळ्या गोष्टींचा राग काढायची, डोकंदुखी वाढ़ली कि त्याला ओरडायची. तो मात्र हसत हसत तिची सेवा करायचा. खुप जास्त झालं कि लगेच मला बोलवायचा, मी काही सांगीतलं कि आतुन घाबरायचा पण मलाच म्हणायचा “होईल सर व्यवस्थीत”. मी काहीच न बोलता ट्रिट्मेंट द्यायचो.
हॉस्पिटलच्या लोकांकडुन त्याची माहिती मिळाली. ति त्याच्या मामाची मुलगी, त्यांच प्रेम जमलं, तिला तरुण वयातच स्तनाचा कॅंसर झाला, ट्रिट्मेंट झाली. त्या नंतर त्यांचं लग्न झालं. तिच्या आजाराबद्द्ल माहीत असुन त्याने लग्न केलं तेही घरच्यांचा विरोध पत्करुन. त्याला पुण्यात चांगली नोकरी होती, काही महीने त्यांचा सुखी संसार होता. नंतर दुसरा स्तन पण बिघडला, त्याने जिवाचं रान करुन ट्रिट्मेट केली, आता मात्र आजार पसरला होता. शेवटच्या स्टेजला होता. पण तो थकला न्हवता, लढत होता.
7-8 महिने गेले असतील, त्याचा मला फ़ोन आला “सर जरा येता का तिला त्रास होतोय”. मी बघीतलं, तिच्या फ़ुफ़ुसांना जंतुसंसर्ग झालेला, रोगप्रतिकारक शक्तिची आधीच वाट लागलेली, झालं परत ॲडमीट, व्हेन्टीलेटर, महागडी औषधं आणी लढ़ाई. आता मात्र तो खचलेला. त्याच्या एका नातेवाईकाला मी विचारलं “तो इतक्या पैशाची व्यवस्था कशी करतो? कारण गेले काही महीने हा इथंच आहे, दुसरं काही काम पण नाही करत”. “सर त्याच्या कंपनी ने त्याला पगारी सुट्टी दिलीये, त्याचं खुप चांगलं काम आहे म्हणुन, आणी तो कंपनी च्या प्रोजेक्टचं काम तो इथुनचं करायचा”. 3-4 दिवस गेले आता तिचं ब्लड प्रेशर कमी झालं होतं कितिही औषधे दिली तरी सुधारत नव्हतं, हळुहळु तिचा ऑक्सीजन पण कमी येत होता तेही व्हेंटीलेटरवर. मी त्याला म्ह्टलं आता आपण थांबुयात काही फ़ायदा नाही. त्याचा काही रिस्पॉस नाही. स्वामीजी आले त्यांनी तिला बघीतलं. मला म्हणाले “डॉक्टर काय करुयात?” मी “काही फ़ायदा होणार नाही प्रयत्न करुन”. स्वामीजी त्याला म्हणाले “आता थांबुया, तिला फ़ार त्रास देण्यात अर्थ नाही, कायss”. “तुम्ही म्हणालं तसं” तो जमिनीवर नजर खिळवुन बोलला. “डॉक्टर, व्हेंटीलेटर चालु राहु दे, नविन काय औषधं देऊ नका. जेंव्हा आपोआप होईल तेंव्हा होऊ दे”. पुढ़ं 2 तासातच तिची लढाई संपली आणी तो माझ्या गळ्यात पडुन ढसाढसा रडला.
असलं निरपेक्ष प्रेम मी या आधी कधी बघीतलं नव्हतं.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Sunday, July 15, 2018

डेंग्यूविषयी थोडंस....


डेंग्यू हा शब्द स्वाहिली भाषेतून घेण्यात आला, म्हणजेच break bone fever. तसा हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचे प्रमाण वाढत गेले. सुदैवाने मृत्युदर मात्र कमी झाला आहे. तरीसुद्धा भारतामधल्या प्रमुख संसर्गजन्य आजारात ह्याची गणना होते.

डेंग्यू व्हायचं काय कारण?

डेंग्यू व्हायचं कारण म्हणजे त्याच्या विषाणूंची लागण. डेंग्यूचे 4 प्रकारचे विषाणू सापडतात, हे चारही विषाणू भारतात आहेत पण प्रकार-१ आणि प्रकार-२ यांचा संसर्ग प्रामुख्याने आढळतो.

या विषाणूंची लागण माणसाला कशी होते?

डेंग्यूच्या विषाणूंची लागण हि “एडीस इगीप्ती” या प्रकारच्या डासांमुळे होते. हे डास मुख्यतः मानवाच्या वस्तीनजीक आढळतात, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात त्यामुळे त्यांना टायगर मॉस्किटो पण म्हणतात. हे डास स्वछ पाण्यात(भांड्यात, पत्र्याच्या डब्यात, टायरी, उघड्या टाक्या, बांधकामाची जागा, खड्डे अश्या ठिकाणी जिथे जास्त काळ पाणी साठून आहे) आपली अंडी घालतात. मुख्यतः पावसाळा हा त्यांचासाठी पोषक असतो. त्यामुळे डेंग्यूची साथ हि शक्यतो पावसाळ्यातच आढळते.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांची व्याप्ती अगदी किरकोळ तापापासून ते रक्तस्त्राव  व कोमा/मृत्यू पर्यंत असू शकतात, तीव्रतेनुसार ३ प्रकारच्या आजाराचे वर्णन वैद्यकीय पुस्तकात आढळतात. पहिला प्रकार आहे सौम्य डेंग्यूचा ताप, साधारणपणे थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लालसर गुलाबी चट्टे येणे अशी असतात. ७०% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात असतात. दुसरा प्रकार आहे त्यात वरच्या लक्षणांसोबत रक्तस्त्राव पण होतो, हा रक्तस्त्राव किरकोळ स्वरूपाचा असतो, खुपदा त्वचेच्या खाली, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होतो, पण हा कमी प्रमाणांत आणि लगेच थांबणारा असतो. साधारण २०-२५% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात येतात. उरलेल्या ५% रुग्णांमध्ये हा रक्तस्त्राव हा भरपूर प्रमाणात असू शकतो, संडासावाटे, लघवीतून, नाकातून, कोणत्याही ठिकाणाहून हा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हाच तिसरा प्रकार. भरपूर रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ शकतो, याला वैदकीय भाषेत Dengue Shock Syndrome असे म्हणतात. या प्रकारात मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

डेंग्यूमुळे शरीरात काय बदल घडतात?

डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरातील रोगप्रतिकार-शक्ती कार्यान्वयित होते, त्यामुळे शरीरात काही संप्रेरके आणि रसायने या विषाणूंना मारण्यासाठी तयार होतात. काही पांढऱ्या पेशी कार्यान्वयित होतात. एक प्रकारचं युद्ध सुरु होतं. यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यामधून पाणी पाझरायला लागतं, रक्तबिंबिका(Platelets) कमी होऊ लागतात. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. एकूणच शरीरात पाण्याची कमतरता भासते.

डेंग्यूवर उपचार आहेत का?

अजून तरी डेंग्यूच्या विषाणूंना मारण्यासाठी प्रभावी औषध उपलब्ध नाही पण भविष्यात ते नक्की येईल. सुदैवाने डेंग्यूचे विषाणू हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट करू शकते त्यामुळे, हा आजार नक्की बरा होतो. तापावर नियंत्रण, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे आणि क्वचित लालरक्तपेशी, रक्तबिंबिका देणे हि सध्याची उपचारपद्धती आहे.

डेंग्यू झाला तर काय करावे?

डेंग्यू झाला तर घाबरून न जाता, डॉक्टरांना भेटावे. शक्य तितकं तापावर नियंत्रण ठेवावे औषधे घेऊन, पाण्याने अंग पुसुन घेऊन. भरपूर प्रमाणात पातळ पदार्थ/पाणी प्यावे उदा: लिंबू पाणी, नारळपाणी, मोसंबी ज्यूस इत्यादी. आराम करणे. अंगावरच्या लाल चट्ट्यांवर लक्ष ठेवणे, कुठे रक्तस्त्राव होतोय का यावर लक्ष ठेवणे उदा. काळ्या रंगाची संडास, कॉफीच्या रंगाची उलटी, डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव, दात घासताना आलेलं रक्त इत्यादी. तस जर झालं तर लगेच रुग्णालयात जाणे. अॅडमिट होणे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसे, कॅन्सरचे रुग्ण, जे रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्यांवर आहेत(उदा. Warfarin)ते, हया लोकांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.

रक्तबिंबिका रुग्णाला कधी द्यावेत?

डेंग्यू मध्ये रक्तबिंबिका(platelets) कमी होतात, कारण शरीराच्या प्रतिकार शक्तीची ती एक reaction आहे. जरी आपण बाहेरून रक्तबिंबिका दिल्या तरी त्या शरीरात मारल्या जातात. त्या मुळे फारसा फायदा होत नाही, असे काही शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहेत. रक्तबिंबिकांचा आकडा हा १.५ ते ४.५ लाख/घनमीमी इतका असतो. तो डेंग्यू मध्ये अगदी काही हजारावर जाऊ शकतो. साधारणपणे २०००० च्या खाली रक्तबिंबिका कमी झाल्या कि रक्तस्त्राव होतो. पण डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये अगदी २००० च्या खाली आकडा गेलाय आणि तरीपण रक्तस्त्राव झालेला नाहीये असा काही अनुभवी डॉक्टरांचा अनुभव आहे. National vector borne disease control programme च्या २००८ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, रक्तस्त्राव नसताना रक्तबिंबिका चा आकडा १०००० च्या खाली गेला तरच प्रतिबंधक उपाय म्हणून रक्तबिंबिका देण्यास हरकत नाही असं सांगितलंय. बऱ्याच अनुभवी डॉक्टरांचं मत आहे कि जो पर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रक्तबिंबिका देणे टाळावे, कारण सौम्य आणि मध्यम प्रकारच्या डेंग्यूमध्ये रक्तस्त्राव फारसा होत नाही. रक्तबिंबिकाचा आकडा काही हजारावर येईपर्यंत रुग्णाचा ताप गेलेला असतो व तो बरा होण्याच्या मार्गावर असतो. काही न करता अश्या रुग्णांच्या रक्तबिंबिका २-३ दिवसात आपोआप वाढतात. गरज फक्त एका गोष्टीची असते ती म्हणजे हे रुग्ण रुग्णालयात दाखल असले पाहिजेत आणि त्यांचावर बारीक लक्ष असलं पाहिजे. तीव्र प्रकारच्या डेंग्यू मध्ये मात्र रक्तबिंबिका द्याव्या लागतात, इतकंच काय तर लाल पेशी, प्लास्मा सारख्या गोष्टीसुद्धा गरजेनुसार द्याव्या लागतात.

रक्तबिंबिका देणे जिथं शक्य आहे तिथं टाळायचा आग्रह का?

कारण आधीच आपल्या देशातील रक्तपेढ्यातील रक्त पुरत नाही नेहमी रक्ताचा तुटवडा भासतो. दुसरं म्हणजे रक्तबिंबिकाचे आयुष्य फक्त ४-५ दिवस असते त्यामुळे ते फार काळ साठवून ठेवता येत नाही, मग त्याचा तुटवडा जास्त भासायला लागतो. आपल्याकडे २ प्रकारे रक्तबिंबिका साठवतात, पहिला आहे तो RDP(Random donor platelets) ह्यात एखाद्या व्यक्तीचे रक्त घेतले जाते त्यातले सर्व घटक वेगवेगळे केले जातात आणि त्यातून काही रक्तबिंबिका मिळतात. दुसरं म्हणजे SDP(Single donor platelets) यात एकाच व्यक्तीचे मशीनद्वारे फक्त रक्तबिंबिका काढतात ह्या रक्तबिंबिकाचे प्रमाण जास्त असते. ४-५ RDP पिशव्या = १ SDP ची पिशवी असं एक ढोबळ गणित आहे. एका RDP ची किंमत साधारण ८००-१५०० अशी असते तर SDP ची १२०००-१५००० असते. विनाकारण जर रक्तबिंबिका चढवल्या तर रुग्णाच्या खिश्याला कात्री लागतेच शिवाय रक्तबिंबिकाचा तुटवडा भासतो आणि ज्याला खरोखर गरज आहे त्याला त्या मिळत नाहीत. त्यामुळे गरजेप्रमाणे ह्याचे विनिमय होणे गरजेचे आहे.

भविष्यात डेंग्यूच्या विषाणूं नष्ट करण्यासाठी औषध किंवा लस निघेल. तसे प्रयोग सुरु आहेत. तोपर्यंत ह्या डेंग्यू विरुध्द आपल्याला लढायला लागणार आहे. त्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांवर नियंत्रण. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवला, साठवलेले पाणी झाकून ठेवलं, असा कचरा किंवा पसारा काढला जिथे डास वाढू शकतात तर नक्कीच आपण डेंग्यूवर मात करू शकू.

-          डॉ. सारंग कोकाटे