Wednesday, February 19, 2014

प्रेम



Valentine’s Day निमित्त भरपूर मेसेजेस येत होते, काही शुभेछ्या होत्या, काही प्रेम म्हणजे काय यावर होते तर काही फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यात प्रेम नसून आईवडील, भाऊ, बहिण, मित्र यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असते अश्या आशयाचे मेसेजेस होते, मग माझ्या मनात प्रेमाबद्दल लिहाव असा विचार आला आणि लिहित सुटलो.
या विषयावर तसं भरपूर साहित्य लिहिलं आहे. लेख, कथा-कादंबऱ्या, काव्यांमध्ये प्रेमाविषयी भरभरून लिहिलं आहे. प्रेमावर चित्रपट, गाणी, संगीत, नाटकं हि आहेत. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? आणि त्यावर प्रत्येकाची आपापली मतं असतात.
माझ्या मनाने प्रश्न विचारला प्रेमाची सुरुवात कशी होते?(अर्थात मी प्रियकर आणि प्रेयसी च्या प्रेमाविषयी लिहितोय). प्रेम होण्याआधी एखाद्याला समोरची व्यक्ती किंवा व्यक्तीमधील एखादी गोष्ट आवडायला पाहिजे. मग ती आवड इतकी तीव्र होत जाते आणि आकर्षणात बदलते. इथं बरेच लोक फसतात या आवडीला किंवा आकर्षणाला प्रेम समजतात. म्हणजे लव अॅट फर्स्ट साईट हे फक्त उत्कट आकर्षण असते. मग सुरु होतो प्रवास सहवासाचा गाठी-भेटी होतात, हिंडणे, फिरणे, हॉटेल्स, पिझ्झा वैगेरे वगैरे सुरु होतं, थोडक्यात डेटिंग सुरु होते. गुलाबी दिवस असतात हे, आनंदी-आनंद गडे सारखं. जोडीदाराच्या सर्व गोष्टी आवडायला लागतात. तो आणखी हवाहवासा वाटतो. काही काळ जातो, एकमेकांची सवय झाली असते, त्याच्या/तिच्या व्यक्तीमत्वातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात. काही निगेटिव्ह गोष्टी समोर यायला लागतात. याशिवाय अपेक्षा वाढायला लागतात, अॅडजेस्टमेंट करावी लागते. इथं खरी कसोटी असते, जरी निगेटिव्ह गोष्टी असतील, तरी तो व्यक्ती हवाहवासा वाटत असेल आणि त्याच्यासाठी वाट्टेल ते अॅडजेस्ट करायची तयारी असेल तर खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात व्हायला लागते. जर दोघांना निगेटिव्ह गोष्टी खटकत असतील तर लवकरच ब्रेक-अप होतं. एक जण अॅडजेस्ट करायला लागला/लागली तर त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो आणि मग एकतर्फी प्रेम सुरु होतं. जर दोघांना एकमेकांचे निगेटिव्ह पाँइंट मान्य आहेत पण ते परिस्थितीशी अॅडजेस्ट करू शकत नाहीत तरी ब्रेक-अप होतं. खर प्रेम तेंव्हा सुरु होतं जेंव्हा दोघांनाही निगेटिव्ह गोष्टी मान्य असतात आणि ते दोघेही अॅडजेस्टमेंटची तयारी ठेवतात. बरेचसे प्रेमविवाह फेल होतात ते याच कारणामुळे, म्हणून जेंव्हा केंव्हा कोणाला वाटलं कि आपण प्रेमात पडलोय तर त्याने/तिने त्या व्यक्तीला जाणून घ्यायला थोडा वेळ घेतला पाहिजे.
प्रेम हि खूप गुंतागुतीची भावना आहे, ते व्यक्त करण्याच्या पद्धती पण निराळ्या असतात. काहीजण प्रेम शब्दात व्यक्त करतात, चांगल्या गुणांचं कौतुक करतात, स्तुती करतात. काही जण भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. काहीजण काळजीतून प्रेम व्यक्त करतात, काहीजण आपल्या प्रेमीच्या सहवासात राहणे पसंत करतात. काही जण स्पर्शातून प्रेम व्यक्त करतात. बऱ्याचवेळा ह्या व्यक्त करण्याच्या पद्धतीलाच प्रेम समजले जाते आणि गोंधळ होतो. उदा. एकजण समजा भेटवस्तू देऊन प्रेम करतोय आणि त्याची प्रेयसी मात्र काळजी व्यक्त करून प्रेम करतीये आणि ती त्याला काहीच भेटवस्तू देत नसेल तर त्याला असा वाटू शकते कि ती माझ्यावर प्रेम करत नाही. बरेच जण स्पर्शालाच प्रेम समजतात आणि गफलत होते. प्रत्येक स्पर्श हा प्रेमाचा असतो असं नाहीये. एकमेकांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती जर समजून घेतल्या तर ५०% जोडप्यांचा संसार आणखी सुखी होईल असं मला वाटत.
प्रेम दुसऱ्यांदा होतं का हो? बऱ्याच लोकांना प्रेमभंग अथवा दुसऱ्या कारणामुळे अपेक्षित जोडीदार मिळत नाही. त्यावेळी त्याचं मन खिन्न झालेले असते, अश्या लोकांना मला नेहमी सांगू वाटत घाबरू नको तुला परत प्रेम होईल ह्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. मनाच्या जखमा कितीपण खोलवर असू द्या, कालांतराने त्या भरतात आणि मन परत फुलू शकते.
एकतर्फी प्रेमवीरांना सांगू वाटतं, ते तुझ्यासाठी मृगजळ आहे त्याच्या मागे कधी धावशील तर हातात काहीच लागणार नाही, उलट त्याच्या मागे न धावता बाकीच्या गोष्टीत लक्ष घाल आयुष्यात प्रगती तर होईलच पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती सुद्धा येऊ शकते.
मला वाटतंय खूप लिहिलंय प्रेमाबद्दल, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना हा.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

Wednesday, February 12, 2014

VIP



सकाळी ९ वाजता सरांसोबत राउंड संपला होता इतक्यात एक नवीन पेशंट भरती झाल्याचा मेसेज आला, मग मी आणि सर ७ व्या मजल्यावर पेशंट तपासायला गेलो. त्याला जुलाब झाले होते, २ दिवसात तो २ हॉस्पिटल फिरला होता, तिथे त्याला काही फरक पडला नव्हता म्हणून इथं आला होता. सरांनी तपासलं काही विशेष नव्हतं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, एकंदरीत viral वाटत होतं. त्याला फक्त सलाईन लावलं तरी पुरेसं होतं २ दिवसात त्याचे जुलाब आपोआप थांबणार होते. आम्ही सिस्टरला सूचना दिल्या आणि तिथून बाहेर पडलो, २ मिनिटात सरांचा फोन वाजला, बोलण झाल्यावर मला म्हणाले मंत्रालयातून फोन होता तो पेशंट अमुक-अमुक मंत्र्याचा खास आहे म्हणे लक्ष ठेव. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी माझा युनिट चा उरलेला राउंड घेत होतो. जेमतेम १५ मिनिट झाली आणि मला फोन आला, पलीकडून "मी अमुक अमुक मंत्र्याचा PA बोलतोय, तुमच्याकडे आमचा एक पेशंट आहे तुम्ही काय लक्ष देत नाही राव आमच्या पेशंट कडे, त्याचं रक्त वाहतंय म्हणे." मी बघतो म्हणालो आणि तिथ गेलो. तर त्या पेशंटने त्याचा सलाईन लावलेला हात उठताना हलवला होता आणि त्यामुळे सलाईन त्याच्या शिरेतून जायच्या ऐवजी शिरेतून रक्त सलाईन च्या नळीत आल होत, ते फक्त हात सरळ ठेवलं कि व्यवस्थित होणार होत पण तिथ त्याने अख्खा वार्ड डोक्यावर घेतला होता, मी त्याला समजावलं आणि परत माझ्या कामाला लागलो, १/२ तासाने त्याचा एक माणूस मला भेटायला आला म्हणाला चला त्यांचे जुलाब काही थांबेनात, आमच्या डॉक्टरांना चांगलं जालीम औषधं द्या बघू, मी म्हणालो डॉक्टर? ते डॉक्टर आहेत? तो म्हणाला हो आम्ही सगळे त्यांना डॉक्टर म्हणतो, मी त्याला समजावलं कि जुलाब थांबायला थोडं वेळ लागेल, एका दिवसात ते थांबणार नाहीत थोडा वेळ लागेल. कसबसा १/२ तास झाला परत मला पेशंटचा फोन आला तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मी गेलो, तो मला म्हणाला “मी २ हॉस्पिटल एवढ्यासाठी बदलले कारण त्यांच्या औषधाने माझं जुलाब थांबले नाहीत तुम्ही मला चांगलं औषधं द्या माझे जुलाब लगेच थांबले पाहिजेत”. मी त्याला म्हणालो “तुम्ही कशाचे डॉक्टर आहात?”. तो म्हणाला तस मी डॉक्टर नाही पण माझं उठन बसन डॉक्टरांच्यात असत आणि मला त्यातल सगळ कळत. मी परत त्याला सांगितलं तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे जे जुलाब आहेत ते कदाचित viral इन्फेक्शन मुळे असू शकते किंवा बाहेरच खाल्यामुळे आतड्याला irritation झाल्यामुळे झालेलं आहे आणि ते १-२ दिवसात आपोआप थांबेल, एका तासात ते थांबणार नाही. मग त्याने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावला पलीकडून त्या डॉक्टरने मी काही बोलायच्या आतच मला बोलले “तू काय करतोस ते बरोबर आहे पण तो माणूस तुला शांत बसू देणार गपचूप त्याला लोमोटील सारखी एखादी गोळी दे आणि सोडून दे”. मी सरांना फोन लावला सर म्हणाले बर ठीक आहे त्यांच्या डॉक्टराप्रमाणे कर, मी ठीक आहे म्हणालो आणि त्याला तस सांगण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेलो तर तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्या. मी लगेच डिस्चार्ज फोर्मालीटी सुरु केल्या आणि सरांना फोन केला म्हणालो सर तो डिस्चार्ज मागतोय, सर पण क्षणाचा विलंब न करता म्हणाले पटकन देऊन टाक. पुढच्या तासाभरात तो हॉस्पिटलच्या बाहेर होता. दुसऱ्या दिवशी सर म्हणाले बर झालं त्याला डिस्चार्ज केलंस ते, त्याच्यासाठी मला काल OPD मध्ये कमीतकमी १०-१५ वेळा फोन आले. मी मनातल्या मनात म्हटले सुंठा वाचून खोकला गेला. आधीच्या २ हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्याने असंच केलं असाव. ही VIP माणस कधीच समाधानी नसतात म्हणूनच मंत्रालयाला त्यांच्या जुलाबाची दखल घ्यावीशी वाटते.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

Monday, January 27, 2014

नशीब



सकाळचा राउंड संपवून मी आणि माझा मित्र बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बँकेचे काम आटोपून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि पार्किंग कडे गाडी लावायला जात होतो इतक्यात आमच्यासमोर एक माणूस भोवळ येऊन पडला, मी उतरलो आणि त्याच्याकडे धावलो मित्राला सांगितलं गाडी पार्क करून ये, जवळच हॉस्पिटलच कॅन्टीन होतं तिथून कोणीतरी कांदा घेऊन त्याच्या नाकाला लावत होतं. तो पर्यंत मी तिथे पोचलो, त्याला बघितलं त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मी लागलीच त्याला कार्डियाक मसाज द्यायला लागलो(कार्डियाक मसाज मध्ये पिक्चर मध्ये दाखवतात तस छातीवर बुक्क्या मारत नाहीत तर चेस्ट बोन वर जोर देऊन मेंदूचा रक्त प्रवाह सुरु ठेवायचा  असतो). एकाला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि त्या माणसाला तातडीच्या सेवेच्या ठिकाणी आणलं. मग त्याला भराभरा इन्जेक्शनस दिली आणि त्याला ७-८ शॉकचे झटके दिले, श्वासाची नळी घातली. सर्व लोकं म्हणाले काही फायदा नाही, तरी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले १/२ तासाने त्याच हृद्य सुरु झालं. त्याला आम्ही अतिदक्षता विभागात ठेवले, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं. त्याला असा अचानक का झालं याचा शोध घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच्या हृदयाच्या तिन्ही मुख्य वाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या त्यातली १ १००% ब्लॉक होती आणि २ ९०% पेक्षा जास्त ब्लॉक होती. ५-६ दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि १०-१२ दिवसांनी त्याला वार्डमध्ये शिफ्ट केला. योगायोगाने तो आमच्याच युनिटमध्ये अॅडमिट होता त्यामुळे मी त्याला दररोज तपासणार होतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहित नव्हतं कि त्याला अॅडमिट करणारा मीच होतो ते, तो आता इतका चांगला झाला होता कि तो आता फिरायला लागला होता, मी त्याला विचारलं “आता कस वाटतय?” तो म्हणाला “सगळ चांगलं आहे पण डॉक्टरांनी माझ्या छातीवर एवढ दाबलय कि माझ्या २ फासळ्या तुटल्यात, लई दुखतंय बघा” मी त्याला पेनकिलर चा औषध दिलं आणि काही मलम लावायला दिलं आणि म्हणालो “जाऊदे काका जीव वाचला ते चांगलं, ते फ्रॅक्चर काय ३-4 आठवड्यात भरेल”.  त्याला बायपास ऑपरेशन सांगितलं होत, पण त्याच्याकडे पैसे नव्हते चॅरिटी ऑफिस ने त्याचा आत्तापर्यंत पूर्ण खर्च केला होता, ते त्याच्या ऑपरेशन चा निम्मा खर्च उचलायला तयार होते, पण तो नाही म्हनाला म्हणून त्याला औषधांवर घरी पाठवला. त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
आणखी एक अशीच घटना पुढे काही महिन्यांनी घडली, १ पन्नाशीचा माणूस त्याला १ वर्षापूर्वी सौम्य अर्धांगवायूचा झटका आला होता व तो मधुमेही आहे हे तेंव्हा समजलं होतं. तो वर्षभर काही हॉस्पिटलला फिरकला नाही, त्याची बहिण डॉक्टर होती आणि ती त्याला मधुमेहासाठी उपचार करत होती, त्याला २ दिवस धाप लागत होती आणि त्याची शुगर कंट्रोल मध्ये अजिबात नसायची, २ दिवस बहिणीने फोन वरून काही औषधं सांगितली पण त्याने काही फरक पडला नाही. घरच्यांनी त्याला हॉस्पिटल आणायचं ठरवलं आणि हॉस्पिटल ला येतानाच घरच्या जिन्यावर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले, घरच्यांना काहीच कळाल नाही आणि त्याला रिक्षात घालून हॉस्पिटलला आणेपर्यंत अर्धा-पावून तास झाला होता. हृदयाचे ठोके बंद झाल्यावर जर १० मिनिटाच्या आत कार्डियाक मसाज सुरु केला नाही तर ती व्यक्ती १००% दगावते, तरी आम्ही १/२ तास प्रयत्न केला पण या वेळी मात्र काळही आला होता आणि वेळही. काही वेळाने तिची डॉक्टर बहिण आली तिला आम्ही त्याचा मृत्यूची बातमी दिली, ती म्हणाली “असा कस शक्य आहे”. मी म्हणालो “जर मधुमेह कंट्रोल मध्ये नसेल तर बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही आणि अश्या वेळी फक्त दम लागतो, ते जर काल आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती”. खिन्न मनाने तिच्या भावाचा देह ती घेऊन गेली.
या दोन्ही घटना तश्या सारख्याच आहेत फक्त पहिला हॉस्पिटलच्या आवारात पडला म्हणून वाचला आणि दुसरा हॉस्पिटलच्या बाहेर पडला म्हणून गेला. दोघांचही नशिबच म्हणायचं.
                                                                                                                          -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, January 23, 2014

डॉक्टर



घरी मेहुणा आणि सासरे आले होते, गप्पागोष्टी मध्ये डॉक्टरची लाईफ हा विषय निघाला, डॉक्टरला पर्सनल लाईफ कमी असते, मरमर काम कराव लागत आणि डॉक्टर भावनाशुन्य आणि अरसिक असतो असं माझ्या मेहुण्याच मत होतं. मी त्याला थोडा विरोध केला म्हणालो गिरीश ओक, श्रीराम लागू, हे सर्व डॉक्टर आहेतच पण ते नावजलेले अॅक्टर पण आहेत मग तू अरसिक कस काय म्हणू शकतो वगैरे वगैरे. त्या विषयावर फार काही चर्चा झाली नाही पण माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला कि जे वैद्यकीय शास्त्राशी निगडीत नाहीत अशा लोकांच्या मध्ये डॉक्टर बद्दल काय संकल्पना असाव्यात? डॉक्टरांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काय वाटत असाव?
आदर्श डॉक्टर कसा असावा याच बऱ्याच ठिकाणी वर्णन केलय आणि आम्हाला आमच्या गुरूंकडून बऱ्याचदा सांगण्यात येत. डॉक्टर नेहमी निट-नेटका असावा, त्याला/तिला वैद्यकीय ज्ञान असाव व त्याने/तिने त्याचे/तिचे ज्ञान काळाप्रमाणे अपडेट ठेवावे, पेशंटशी बोलताना त्याने/तिने सौम्य भाषा वापरावी, तो/ती चारित्र्यवान असावा/असावी. असे काही ठळक मुद्दे आहेत. बरेच जण या मुद्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात.
डॉक्टरांचं मुख्य काम असत ते आजारचे निदान करणे आणि त्याच्यावर उपचार करणे. वैद्यकीय शास्त्रात निदान करण्यावर खूप भर दिला जातो कारण बहुतांश उपचारामध्ये फारसा बदल होत नाही आणि योग्य निदान केल्यास पटकन उपचारही करता येते. आणखी एक महत्वाच काम असतं ते म्हणजे आजाराच प्रोग्नोसीस करणे म्हणजे आजार बरा होणार आहे कि बळकावत जाणार आहे, त्या पासून जीवाला धोका आहे कि नाही, बरा होण्यास किती काळ लागेल वगैरे. हे अत्यंत अवघड काम असतं कारण कोणती व्यक्ती/आजार कसा/कशी रियाक्ट करेल हे अनिश्चित असतं. या व्यतिरिक्त डॉक्टर ला पेशंटचं आणि नातेवाईकांच सांत्वन कराव लागत. काही कठोर निर्णयही घ्यायला लागतात. हे सर्व करायला डॉक्टरला स्वतःला भावनाशुन्य रहाव लागत पण तो शेवटी एक माणूसच आहे त्यामुळे मी असा म्हणतो कि त्याला स्वतःच्या भावनेवर्ती नियंत्रण ठेवावे लागते. बहुतांश डॉक्टर हे करत असतात, असं करताना बऱ्याच वेळा असा वाटता कि डॉक्टर मंडळी हे भावनाशुन्य व अरसिक असतात पण असं नसतं. त्याने/तिने बरेच दुखी चेहरे बघितलेले असतात, प्रत्यक्षात मृत्यूला बघितलेलं असतं, जीवनातले कटुसत्य त्याने जवळून बघितलेलं असत आणि त्याने/तिने हे सत्य स्वीकारलेलं असतं.
बऱ्याच डॉक्टरांना मी त्यांचे छंद जोपासताना पाहिलं आहे, कुणी चित्रकलेत आवड असते, कुणी पहाटे ४ ला उठून सतार वाजवतं, कुणी उठून जंगलात फोटो काढायला जातं, काही जण बायकामुलांना घेऊन फिरायला जातात, काही सिनेमा नाटक बघतात तर काही त्यात कामही करतात, असे बरेच छंद डॉक्टरांना असतात आणि कामाच्या व्यापातून ते ह्यासाठी वेळ काढतात.
सलग ७२-७२ तास काम करण्याची क्षमता कित्येक डॉक्टरांमध्ये असते. कस काय ही लोक तहानभूक विसरून असा काम करू शकतात, खूप पैसे मिळतात म्हणून? तस नाहीये त्याच कारण अस आहे कि त्यांच्यासाठी हे फक्त काम नसतं ते त्याचं एक PASSION असत, एखादा व्यक्ती आपल्यामुळे बरा होतोय, त्याच दुखण आपण कमी करतोय हि भावना, तो आनंद त्याला काम करण्यास प्रवृत्त करते आणि त्याच्या रुग्णांनी दिलेल्या अशिर्वादामधून त्याला काम करण्याची ताकद येत असते. एखाद्या गणिताचे कोडे सुटल्यावर जसा आनंद होतो तसा एका पेशंटच्या आजाराचे निदान झाल्यावर डॉक्टरला आनंद होतो. तो आनंद मी कित्येकदा आमच्या सरांच्या चेहऱ्यावर बघितलाय, जर का कोड सुटलं नाही तर अस्वस्थता पण बघितालीये.
खासगी आयुष्य डॉक्टरांना कमी मिळते हे थोड खरं आहे, इतर प्रोफेशनच्या व्यक्तींपेक्षा डॉक्टरांना सुट्टी कमी मिळते हेही खर आहे पण जी मिळते ती सुट्टी पूर्णपणे डॉक्टर आनंदाने लुटतो, जितकं शक्य असेल तितकं तो कुटुंबियांना वेळ द्यायचा प्रयत्न करत असतो. मी विचार केला कि इतर लोकांना किती वेळ मिळतो उदा; एखादा आय टी चा माणूस घ्या, तो आपल्या आपली गाडी किंवा कंपनीची गाडीतून २५-३० किमी रोज प्रवास करत कंपनीत जातो ८-१० तास काम करतो, जाण्या येण्यात आणि कामात दिवसाचे १२-१५ तास जातात, घरी आल्यानंतर तो किती वेळ देतो २-३ तास फार फार तर, उरलेल्या वेळात जेवणे, झोपणे आणि त्याचे प्रोजेक्ट चे काम सुरूच असते, कधी ओवर टाइम, तर कधी प्रोजेक्ट निमित्त प्रवास ह्या गोष्टी सुरूच असतात. असच डॉक्टरांचं असतं.
एक मात्र खर आहे कुठलही काम करताना त्या कामाची आवड लागते, डॉक्टरकी साठी तर ती अत्यंत गरजेची आहे. या प्रोफेशन मध्ये पैसे तर चिक्कार मिळतात पण त्या सोबत दुसऱ्याच दुखः कमी केल्याच समाधान ही मिळतं. या प्रोफेशन चा मी एक भाग आहे याचं मला समाधान आणि अभिमान आहे.
                                                -डॉ. सारंग कोकाटे