Sunday, July 15, 2018

डेंग्यूविषयी थोडंस....


डेंग्यू हा शब्द स्वाहिली भाषेतून घेण्यात आला, म्हणजेच break bone fever. तसा हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचे प्रमाण वाढत गेले. सुदैवाने मृत्युदर मात्र कमी झाला आहे. तरीसुद्धा भारतामधल्या प्रमुख संसर्गजन्य आजारात ह्याची गणना होते.

डेंग्यू व्हायचं काय कारण?

डेंग्यू व्हायचं कारण म्हणजे त्याच्या विषाणूंची लागण. डेंग्यूचे 4 प्रकारचे विषाणू सापडतात, हे चारही विषाणू भारतात आहेत पण प्रकार-१ आणि प्रकार-२ यांचा संसर्ग प्रामुख्याने आढळतो.

या विषाणूंची लागण माणसाला कशी होते?

डेंग्यूच्या विषाणूंची लागण हि “एडीस इगीप्ती” या प्रकारच्या डासांमुळे होते. हे डास मुख्यतः मानवाच्या वस्तीनजीक आढळतात, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात त्यामुळे त्यांना टायगर मॉस्किटो पण म्हणतात. हे डास स्वछ पाण्यात(भांड्यात, पत्र्याच्या डब्यात, टायरी, उघड्या टाक्या, बांधकामाची जागा, खड्डे अश्या ठिकाणी जिथे जास्त काळ पाणी साठून आहे) आपली अंडी घालतात. मुख्यतः पावसाळा हा त्यांचासाठी पोषक असतो. त्यामुळे डेंग्यूची साथ हि शक्यतो पावसाळ्यातच आढळते.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांची व्याप्ती अगदी किरकोळ तापापासून ते रक्तस्त्राव  व कोमा/मृत्यू पर्यंत असू शकतात, तीव्रतेनुसार ३ प्रकारच्या आजाराचे वर्णन वैद्यकीय पुस्तकात आढळतात. पहिला प्रकार आहे सौम्य डेंग्यूचा ताप, साधारणपणे थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लालसर गुलाबी चट्टे येणे अशी असतात. ७०% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात असतात. दुसरा प्रकार आहे त्यात वरच्या लक्षणांसोबत रक्तस्त्राव पण होतो, हा रक्तस्त्राव किरकोळ स्वरूपाचा असतो, खुपदा त्वचेच्या खाली, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होतो, पण हा कमी प्रमाणांत आणि लगेच थांबणारा असतो. साधारण २०-२५% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात येतात. उरलेल्या ५% रुग्णांमध्ये हा रक्तस्त्राव हा भरपूर प्रमाणात असू शकतो, संडासावाटे, लघवीतून, नाकातून, कोणत्याही ठिकाणाहून हा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हाच तिसरा प्रकार. भरपूर रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ शकतो, याला वैदकीय भाषेत Dengue Shock Syndrome असे म्हणतात. या प्रकारात मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

डेंग्यूमुळे शरीरात काय बदल घडतात?

डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरातील रोगप्रतिकार-शक्ती कार्यान्वयित होते, त्यामुळे शरीरात काही संप्रेरके आणि रसायने या विषाणूंना मारण्यासाठी तयार होतात. काही पांढऱ्या पेशी कार्यान्वयित होतात. एक प्रकारचं युद्ध सुरु होतं. यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यामधून पाणी पाझरायला लागतं, रक्तबिंबिका(Platelets) कमी होऊ लागतात. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. एकूणच शरीरात पाण्याची कमतरता भासते.

डेंग्यूवर उपचार आहेत का?

अजून तरी डेंग्यूच्या विषाणूंना मारण्यासाठी प्रभावी औषध उपलब्ध नाही पण भविष्यात ते नक्की येईल. सुदैवाने डेंग्यूचे विषाणू हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट करू शकते त्यामुळे, हा आजार नक्की बरा होतो. तापावर नियंत्रण, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे आणि क्वचित लालरक्तपेशी, रक्तबिंबिका देणे हि सध्याची उपचारपद्धती आहे.

डेंग्यू झाला तर काय करावे?

डेंग्यू झाला तर घाबरून न जाता, डॉक्टरांना भेटावे. शक्य तितकं तापावर नियंत्रण ठेवावे औषधे घेऊन, पाण्याने अंग पुसुन घेऊन. भरपूर प्रमाणात पातळ पदार्थ/पाणी प्यावे उदा: लिंबू पाणी, नारळपाणी, मोसंबी ज्यूस इत्यादी. आराम करणे. अंगावरच्या लाल चट्ट्यांवर लक्ष ठेवणे, कुठे रक्तस्त्राव होतोय का यावर लक्ष ठेवणे उदा. काळ्या रंगाची संडास, कॉफीच्या रंगाची उलटी, डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव, दात घासताना आलेलं रक्त इत्यादी. तस जर झालं तर लगेच रुग्णालयात जाणे. अॅडमिट होणे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसे, कॅन्सरचे रुग्ण, जे रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्यांवर आहेत(उदा. Warfarin)ते, हया लोकांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.

रक्तबिंबिका रुग्णाला कधी द्यावेत?

डेंग्यू मध्ये रक्तबिंबिका(platelets) कमी होतात, कारण शरीराच्या प्रतिकार शक्तीची ती एक reaction आहे. जरी आपण बाहेरून रक्तबिंबिका दिल्या तरी त्या शरीरात मारल्या जातात. त्या मुळे फारसा फायदा होत नाही, असे काही शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहेत. रक्तबिंबिकांचा आकडा हा १.५ ते ४.५ लाख/घनमीमी इतका असतो. तो डेंग्यू मध्ये अगदी काही हजारावर जाऊ शकतो. साधारणपणे २०००० च्या खाली रक्तबिंबिका कमी झाल्या कि रक्तस्त्राव होतो. पण डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये अगदी २००० च्या खाली आकडा गेलाय आणि तरीपण रक्तस्त्राव झालेला नाहीये असा काही अनुभवी डॉक्टरांचा अनुभव आहे. National vector borne disease control programme च्या २००८ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, रक्तस्त्राव नसताना रक्तबिंबिका चा आकडा १०००० च्या खाली गेला तरच प्रतिबंधक उपाय म्हणून रक्तबिंबिका देण्यास हरकत नाही असं सांगितलंय. बऱ्याच अनुभवी डॉक्टरांचं मत आहे कि जो पर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रक्तबिंबिका देणे टाळावे, कारण सौम्य आणि मध्यम प्रकारच्या डेंग्यूमध्ये रक्तस्त्राव फारसा होत नाही. रक्तबिंबिकाचा आकडा काही हजारावर येईपर्यंत रुग्णाचा ताप गेलेला असतो व तो बरा होण्याच्या मार्गावर असतो. काही न करता अश्या रुग्णांच्या रक्तबिंबिका २-३ दिवसात आपोआप वाढतात. गरज फक्त एका गोष्टीची असते ती म्हणजे हे रुग्ण रुग्णालयात दाखल असले पाहिजेत आणि त्यांचावर बारीक लक्ष असलं पाहिजे. तीव्र प्रकारच्या डेंग्यू मध्ये मात्र रक्तबिंबिका द्याव्या लागतात, इतकंच काय तर लाल पेशी, प्लास्मा सारख्या गोष्टीसुद्धा गरजेनुसार द्याव्या लागतात.

रक्तबिंबिका देणे जिथं शक्य आहे तिथं टाळायचा आग्रह का?

कारण आधीच आपल्या देशातील रक्तपेढ्यातील रक्त पुरत नाही नेहमी रक्ताचा तुटवडा भासतो. दुसरं म्हणजे रक्तबिंबिकाचे आयुष्य फक्त ४-५ दिवस असते त्यामुळे ते फार काळ साठवून ठेवता येत नाही, मग त्याचा तुटवडा जास्त भासायला लागतो. आपल्याकडे २ प्रकारे रक्तबिंबिका साठवतात, पहिला आहे तो RDP(Random donor platelets) ह्यात एखाद्या व्यक्तीचे रक्त घेतले जाते त्यातले सर्व घटक वेगवेगळे केले जातात आणि त्यातून काही रक्तबिंबिका मिळतात. दुसरं म्हणजे SDP(Single donor platelets) यात एकाच व्यक्तीचे मशीनद्वारे फक्त रक्तबिंबिका काढतात ह्या रक्तबिंबिकाचे प्रमाण जास्त असते. ४-५ RDP पिशव्या = १ SDP ची पिशवी असं एक ढोबळ गणित आहे. एका RDP ची किंमत साधारण ८००-१५०० अशी असते तर SDP ची १२०००-१५००० असते. विनाकारण जर रक्तबिंबिका चढवल्या तर रुग्णाच्या खिश्याला कात्री लागतेच शिवाय रक्तबिंबिकाचा तुटवडा भासतो आणि ज्याला खरोखर गरज आहे त्याला त्या मिळत नाहीत. त्यामुळे गरजेप्रमाणे ह्याचे विनिमय होणे गरजेचे आहे.

भविष्यात डेंग्यूच्या विषाणूं नष्ट करण्यासाठी औषध किंवा लस निघेल. तसे प्रयोग सुरु आहेत. तोपर्यंत ह्या डेंग्यू विरुध्द आपल्याला लढायला लागणार आहे. त्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांवर नियंत्रण. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवला, साठवलेले पाणी झाकून ठेवलं, असा कचरा किंवा पसारा काढला जिथे डास वाढू शकतात तर नक्कीच आपण डेंग्यूवर मात करू शकू.

-          डॉ. सारंग कोकाटे

Wednesday, May 2, 2018

डायलेसिस



दुपारचे ३ – ३.३० वाजले असतील कणेरीमठातल्या हॉस्पिटलमध्ये येऊन मला एक आठवडाच झाला होता. नुकतंच जेवण करून मी उरलेली OPD संपवत होतो. अचानक एक बाई, एक तरुण मुलगा आणि हॉस्पिटल मधला वार्डबॉय स्ट्रेचरवर एका माणसाला घेऊन आले. “डॉक्टर ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा” असं ती बाई ओरडत होती. मी पेशंट बघितला अर्धवट शुद्धीत होत, डाव्या पायाला गुडघ्यापासून खाली भलंमोठ ड्रेसिंग होतं. नाडीचे ठोके चालू होते, BP पण ठीक होतं, शरीरात पाणी आणि क्षारांची बरीच कमतरता भासत होती. मी त्यांना तपासत तपासत त्यांची माहिती त्यांच्या बायकोकडून घेत होतो. पन्नाशीच्या आसपास वय, एका संस्थेच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, शाळेच्या मैदानावर गवत काढत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावलं. त्यावेळी त्याला काही वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा पाय सुजला, दुखायला लागला, ताप यायला लागला म्हणून त्यांनी गावतल्या एका सर्जन कडे त्याला   अॅडमिट केलं. पायला भरपूर सूज येऊन त्यामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. सूज उतरायला आणि पायातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायला मासावर एक आवरण असते त्याला चिरा द्यावा लागतो त्याला fasciotomy म्हणतात तसा चिरा त्या सर्जनने दिला होता आणि त्याला काही अँटीबायोटिक्स चालू केले होते. दुर्दैवाने ती जखम अजूनच चिघळली आणि शिवाय पेशंटच्या लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्याच्या रक्तात लघवीवाटे जे विषारी पदार्थ (युरिया आणि क्रीयाटेनीन) बाहेर टाकले जातात त्याचं प्रमाण वाढायला लागलं. याला वैद्यकीय भाषेत Acute kidney failure म्हणतात. सर्जनने त्याच्या परीने उपचार चालू ठेवले, पुढच्या ४ दिवसात त्याचं क्रीयाटेनीन ७ पटीने वाढलं आणि त्याची शुद्ध हरपायला लागली. तसं त्या सर्जनने यांना तातडीने डायलेसिस लागेल असं सांगून पाठवलं होतं. मी त्याचे सगळे जुने पेपर तपासले त्यात ३ वेगवेगळी अँटीबायोटिक्स होती ते तिन्ही किडनीला इजा करू शकत होते. मी त्या सगळ्या औषधांवर खाट मारली, केसपेपरवर उपचारांचा प्लान लिहिला आणि त्याला अॅडमिट करायला सांगितलं. पेशंटची बायको मला विचारायला लागली डायलेसिस कधी करणार म्हणून, मी तिला म्हटलं यांना डायलेसिसची गरज नाहीये मला थोडा वेळ द्या होईल सगळं व्यवस्थित. तिचा माझ्यावर काही विश्वास बसला नाही पण माझा आत्मविश्वास बघून ती काही बोलली नाही. तो पेशंट अॅडमिट झाला. मी माझे उरलेले पेशंट संपवत होतो. १५-२० मिनिटांनी मेडिकल ऑफिसरचा मला फोन आला “सर डायलेसिस ला कधी घ्यायचं?” मी “त्याची गरज नाहीये मी जस लिहिलंय तसं उपचार चालू कर.” “पण सर एवढं क्रीयाटेनीन आहे डायलेसिस लागणारच न त्याला” तो म्हणाला; “मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही, मी सांगतो तेवढं कर” मी त्याला दम भरला. अर्धा तास गेला असेल माझा शेवटचा पेशंट संपवत होतो तेंव्हा एक सिनियर ब्रदर आणि एक हॉस्पिटलचा सिनियर स्टाफ माझ्याकडे आला डायलेसिस बद्दल विचारायला लागला, मी त्यांना थांबवलं, पेशंट तपासला आणि त्यांना घेऊन पेशंटकडे घेऊन गेलो. त्याच्या सर्व नातेवाईक आणि माझ्या सर्व स्टाफला या म्हणालो आणि एका खोलीत त्यांना बसायला सांगितलं. एकतर मी तिथे नवीन आणि मी काहीतरी आगळावेगळा प्रयोग करतोय असं त्यांना वाटत होतं, माझ्यावर त्यांचा विश्वास कसा काय बसेल? मला त्यांना समजवायचं होतं कि डायलेसिस का लागणार नाही ते.
मी त्यांना Acute renal failure(ARF) आणि chronic renal failure(CRF) मध्ये फरक सांगितला, CRF च्या बहुतांश लोकांना डायलेसिस हे लागतेच आणि ते करावेच त्यात काही दुमत नाही. ARF मध्ये आपणास त्याच्या कारणांचा शोध घ्यायचा असतो. ह्या पेशंटला किडनीला इजा होण्याची ३ कारणे होती. पाहिलं म्हणजे जो काय जंतुसंसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या पायाच्या मांसल भागाला इजा झाली होती आणि त्याचे विषारी घटक रक्तात मिसळून किडनीला इजा करत होते, दुसरं म्हणजे त्या सर्जनने सर्वच्या सर्व अँटीबायोटिक्स किडनीला इजा होतील अशी वापरली होती आणि तिसरं म्हणजे त्या पेशंटचं क्रीयाटेनीन एवढं वाढतंय म्हटल्यावर त्या सर्जनने त्याच्या पाणी पिण्यावर आणि सलाईनवर जवळपास बंदी घातली होती, उलट यांना जास्त प्रमाणात सलाईन द्यावं लागतं जेणेकरून विषारी घटक dilute होऊन किडनीला होणारी इजा थांबली असती. CRF मध्ये पाणी पिण्यास आणि सलाईन ला मनाई असते. या सगळ्या गोष्टी मी एका कागदावर चित्र काढून त्यांना समजावून सांगितल्या माझा पूर्ण प्लान काय आहे ते समजावून सांगितलं. आता थोडा थोडा त्यांचा विश्वास माझ्यावर बसायला लागला. तो पर्यंत त्या पेशंटला जवळ जवळ २ लिटर सलाईन गेलं होतं आणि तो एकदम खणखणीत शुद्धीवर आला होता आणि उठून बसला होता, त्याला जवळपास २००ml लघवी पण झाली होती. (शक्यतो अश्या पेशंटला लघवीला नळी बसवतात आणि त्यांच्या लघवीच प्रमाण मोजतात) ते बघून पेशंटच्या बायकोने माझ्यासमोर हात जोडले तिच्या डोळ्यातून  घळघळा पाणी व्हायला लागलं; म्हणाली “४ दिवसांनी माझा नवरा जागा झाला”. मी म्हटलं “ चालायचं मावशी खायला द्या त्यांना.”
पुढे त्या पायाच्या चिघळलेल्या जखमा साफ करायला पाहिजे होती नाहीतर जंतुसंसर्ग आटोक्यात आला नसता, अश्या जखमा भूलेखाली साफ करतात (debridement म्हणतात याला). मी आमच्या हॉस्पिटलच्या सर्जनला कॉंल दिला. तोही म्हणाला “debridement लागेल याला पण एवढ्या क्रीयाटेनीनला कसं करणार, काय प्रोब्लेम झाला तर”. मी म्हणालो “सर ARF आहे काही होणार नाही तुम्ही करा”. तो “एकदा नेफ्रोलॉंजिस्ट(किडनी चा डॉक्टर) ला विचारा”. मी लगेच जवळच्या नेफ्रोलॉंजिस्टला फोन लावला, त्याने हिरवा कंदील दिला. debridment झालं. जखम हळू हळू भरायला लागली, त्याला चालता पण येऊ लागले, विशेष म्हणजे त्याला जवळजवळ दिवसाला २-२.५ लिटर लघवी होऊ लागली आणि क्रीयाटेनीन लेवल पण अर्ध्यापेक्षा कमी झाली, १५-२० दिवसांनी पेशंट घरी गेला. ३ महिन्यांनी त्याचं क्रीयाटेनीन लेवल नॉर्मल झालं तेही एकही डायलेसिस न करता. गेले दीड वर्ष हा पेशंट माझ्याकडे येतोय अजूनतरी त्याच्या किडन्या शाबूत आहेत. 
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, March 10, 2016

किंमत

सकाळचे १०-१०.३० वाजले होते, बाराची ड्युटी होती, घरी कुणी नव्हते, एकटेपणा मला खात होता, म्हटलं हॉस्पीटलला जाऊन बसावं, म्हणून आवरलं. इतक्यात माझा फोन वाजला, अनोळखी नंबर होता पण पलीकडून एक ओळखीचा आवाज आला “नमस्कार डॉक्टरसाहेब ओळखलंत का? संदीप (नाव बदललंय) बोलतोय कराडहून (गावही बदललंय)”. मी चमकलो हा संदीप म्हणजे लोकल राजकारणात उठबस असणारा कार्यकर्ता. “नमस्कार, तुम्हाला विसरून कसं चालेल, काय काम काढलं आज गरीबाकडे”. मी बोललो. “तुम्ही आणि गरीब?? गप्प बसा!!! बरं ते जाऊ द्या अहो आमचं एक पेशंट आहे, **** हॉस्पीटलला भरती केलीया, जरा आमच्याकरता बघून गेला असता तर बरं झालं असतं”. त्या हॉस्पिटल पासून मी फक्त १० मिनिटावर होतो. अनासाये माझ्याजवळ वेळही होता म्हटलं बघून येऊ. “१०-१५ मिनिटात येतो”, मी म्हणालो. “बरं बरं मग मी तिथल्या लोकास्नी तुमच्याबद्दल सांगून ठेवतो” एवढं बोलून त्याने मला पेशंटचे नाव गाव सांगितले.
***
थोड्याच वेळात मी तिथे पोहचलो. पेशंट एक पस्तीशीची बाई होती. तिचा नवरा, दीर आणि १०-१२ वर्षाच्या आसपास तिची २ मुलं, तिच्या भोवतीने उभे होते. २-३ दुसरे पेशंट, २ गुलाबी ड्रेस घातलेल्या नर्स आणि १ मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त तिथं कुणी नव्हतं. त्या बाईच्या एका पायाला भलं मोठं ड्रेसिंग केलं होतं. मी नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली. ते दोघे पुरुष लगबगीने माझ्याकडे सरकले आणि मला जरा बाजूला घेऊन तिच्या आजाराबद्दल सांगू लागले.
तिला एका पायाला गेल्या काही महिन्यापासून जखम झाली होती. त्याचं कारण असं होता कि तिच्या कमरेच्या मणक्यातील नसेवर दाब पडून ती खराब झाली होती, त्यामुळे त्या पायातली स्पर्श ओळखण्याची तिची क्षमताच गेली होती. त्यामुळे तिला लागलेले लवकर कळाले नाही आणि हळूहळू ती जखम खोल होत गेली आणि त्यात जंतुसंसर्ग झाला. तिचं एक महिन्यांपूर्वी मणक्याची याच कारणानिमित्त शस्त्रक्रियाही झाली होती. एका प्लास्टिक सर्जन कडे ती उपचार घेत होती त्या जखमेकरिता. त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था अगदीच बिकट होती, हातावरच पोट आणि मुलं सोडून सगळेच कष्टकरी, शेतात राबून दोन घास कसेबसे मिळवायचे. त्यात आधी झालेला उपचारांवर खर्च त्यामुळे ते दोघेही काकुळतीला आलेले. ते नेहमी ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होते त्यांनी सांगितले होते कि घोट्यापासून पाय काढावा लागेल कारण इन्फेक्शन अगदी घोट्याच्या हाडापर्यंत आत पसरलंय. पण ते बाहेरदेशी जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या प्लास्टिक सर्जनकडे त्यांना पाठवलं. त्या डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं कि पाय वाचवता येईल. थोडा वेळ लागेल आणि खर्चिकपण आहे. हा सगळा इतिहास सांगे पर्यंत तिथल्या वार्डमधल्या डॉक्टरने ड्रेसिंग उघडलं, आणि ती जखम मला बघायला मिळाली. ती जखम इतकी खोलवर होती अगदी तळपायातली हाडं दिसत होती, मास तर गायबच झालं होता, त्यातून पांढरा रंगाचा द्रव पाझरत होता शिवाय त्याची भयानक दुर्घंधी पसरली होती. क्षणभर त्या वासाने मला कसतरी झालं. तसं बघायला गेलं तर अश्या प्रकारच्या जखमा भरपूर बघितल्यात पण त्या दिवशी नको नको झालं, असो.
***
त्या सर्वांची, “पाय वाचावा” अशी भावना होती आणि ते साहजिकच होतं. मी स्वतःला काही प्रश्न केले, मनातल्या मनात. हा पाय पूर्ण बरा होण्याची शक्यता किती? बरा झालाच तर परत जखम होणार नाही याची शाश्वती किती? हे सर्व करण्यात किती खर्च होईल? किती वेळ ह्या उपचारासाठी लागेल? हे विचार मनात घोळत असतानाच पेशंटचा नवरा म्हणाला “डॉक्टर साहेब काय पण करा पण त्यो पाय वाचलं असा काही तरी मार्ग सांगा”.  मला त्याला कसं समजावून सांगावं हे कळेना? मी काही क्षण घेतले आणि मग बोलू लागलो, “हे बघा, पायाचा तळवा हा १५-२० छोट्या छोट्या हाडांनी एकमेकांमध्ये सांधलेला असतो, तिथं काही एकचं हाड नसतं. त्यावर मास, चरबी, इतर पेशी, त्वचा अश्या गुंतागुंतीची रचना असते. आता त्यांच्या तळपायाची त्वचा तर सोडाच पण मास पण नाहीये आणि जे इन्फेक्शन(जंतुसंसर्ग) झालंय ते फक्त वरवरचं नसून त्या हाडांच्या सांधलेल्या  कपारीत पण शिरलंय, त्यामुळे हे कितपत बरं होईल याच्याबद्द्ल जरा शंकाच आहे. ते डॉक्टर पाय वाचवायचा प्रयत्न करताहेत हे चांगलंच आहे पण त्यात ८०% अपयश येण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या उपचाराचा खर्च किती येईल हे पण सांगता येणं अवघड आहे.” “खर्चाची काय काळजी नाय साहेब, आमचं चॅरिटी मधून काम होईल”. तो मध्येच माझं बोलणं तोडून म्हणाला. “चांगलं आहे” मी म्हणालो “पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करायची आहे कि जरी खर्च केला तरी अपयश येण्याची शक्यता दाट आहे. या गोष्टीची मानसिक तयारी असू द्या. मला मान्य आहे कि मी सुरुवातीलाच निगेटिव्ह बोलतोय पण जी काही वस्तुस्थिती आहे त्याची खरी कल्पना देणं माझं कर्तव्य आहे.” यावर तो म्हणाला “साहेब जर का तिचा पाय काढला तर तिला घरी बसून ऱ्हाव लागल, आम्ही एक तर गरीब काम केलं तरच पोटाला मिळल, कस करायचं आम्ही वो?” “खर आहे तुमचं अश्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्य बदलते, पण त्यांना बसून रहाव काही लागणार नाही, कृत्रिम पायाच्या साह्याने त्या चालू शकतील, रोजची कामे करू शकतील आणि अशी बरीच उदाहरणे आहेत समाजात”. मी उत्तरलो. थोडा वेळ त्यांची समजूत घातली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो.
***
२-३ दिवस गेले असतील, मला परत फोन आला त्या पेशंटच्या दिराचा. “साहेब जरा वेळ आहे का?” मी “आहे की बोला”. “अहो तुम्ही जरा येता का, तुम्ही त्या डॉक्टरास्नी जरा सांगता का, कि आम्ही आमची जमीन विकू, पैका भरू, परंतु आमासनी चांगले उपचार द्या म्हणून”. तो काळकुतीला येऊन बोलला, मी विचारलं “का? काय झालं, ते काय बोलले काय?”. तो “ते काही नाय बोलले पर त्यांचे अशिस्टंट डॉक्टर बोलले, काय झालं आमचा भाऊ (पेशंटचा नवरा) त्यांना विचारत व्हता कि, अजून किती दिवस औषध द्यायची ते. तर ते म्हणाले सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे, चांगले उपचार कसे होणार म्हणून, ओपेरेशन लागल म्हणत्यात, पैका भरा म्हणत्यात ५००००, आता अचानक कुठनं आणणार व्हो, २-४ दिवसात कायतरी जुगाड करतो. पर उपचार मात्र चांगले करा म्हणावं.” मी चमकलो, म्हणालो “अरे, पण तुमचं तर चॅरिटीमधून होणार होतं ना? मग आता हे काय”. “कुठंच काय, शहरातल्या लोकांच काय बी खर न्हाय पयले म्हणाले हुईल म्हणून आता नाय म्हणत्यात” तो वैतागून बोलला. “ठीक आहे मी तिथल्या चॅरिटी मधल्या माणसाशी बोलतो” असं म्हणून मी फोन ठेवला.
काही वेळाने मी तिथल्या चॅरिटी ऑफिस मध्ये गेलो, तिथल्या एका मॅडमशी बोललो. ती म्हणाली “ आमच्या इकडे चॅरिटीमध्ये उपचार घेण्यासाठी २ महत्वाच्या गोष्टी लागतात, एक म्हणजे ते दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार आहेत त्यांची फुकट उपचार करण्याची तयारी हवी. त्यांच्याजवळ पुरावा आहे पण ते डॉक्टर याला तयार नाहीत, आम्ही काय करणार”. आता ह्यांना चॅरिटीतून सवलत द्यायची नाही म्हणून हे कारण सांगताहेत कि डॉक्टरला ती म्हणतेय त्या प्रमाणे फुकट उपचार करायचे नाहीत हे काही कळेना. गुंता असा कि जो कोणी डॉक्टर होता त्याने हे काही स्पष्ट नातेवाईकांना सांगितले नाही, जो कोणी बोलला तो रेसिडेंट डॉक्टर (शिकाऊ डॉक्टर) होता. मी तिला म्हणालो “ ते सगळं ठीक आहे पण कुणी रेसिडेंट डॉक्टरने अश्या पद्धतीने बोलणं चांगलं आहे का? हॉस्पिटलच्या Reputation ला हे शोभतंय का? मुळातच त्याला हे काही बोलायचा अधिकार नाहीये.” ती म्हणाली “बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही घेऊ त्यावर काहीतरी action”.  मी निघालो त्या पेशंटच्या नवऱ्याला बोलावलं आणि सांगितलं कि, तुम्ही सरळ तुमच्या डॉक्टरकडे जा, जे काही घडलं ते त्यांना स्पष्ट सांगा आणि फी मध्ये सवलत मागा”.
***
त्या दरम्यान हि केसवर मी एका अर्थोपेडीक मित्रासोबत चर्चा केली, त्याच मत असं पडलं कि पाय काढला तर त्यांना हे बर आहे, कारण आता जरी ती जखम भरली त्यावर कृत्रिम त्वचा चढवली तरी पण पुढे काही दिवसांनी १००% पुन्हा तशीच जखम त्यांना होणार आणि शेवटी हा पाय काढावाच लागणार, दुसरं म्हणजे आता फार थोडा भाग काढायला लागेल, घोट्यापासून कृत्रिम पाय बसवला कि त्यांना त्यांच्या कामात काहीच अडचण होणार नाही उलट नंतर पाय काढला तर तो थोडा जास्त काढावा लागेल, जास्त तडजोड करावी लागेल आणि खर्चही दुप्पट होईल.
दुसऱ्या दिवशी फोन आला, मी विचारलं काय झालं म्हणून, पलीकडून नवरा बोलला “काही नाही साहेब पैसे भरायचे ठरलंय आजच २०००० भरले, ४-५ दिवसात उरलेले भरणार आहे.” मी विचारलं “बरं पण डॉक्टर काय म्हणाले?”, “काही नाही जर पाय पाहिजे असेल तर फुकट होत नाही आणि चॅरिटी पाहिजे असेल तर पाय काढून टाकूयात” तो हताशपणे बोलला. मी काहीच बोललो नाही, काय बोलावं हेच कळेना; “ जाऊ द्या साहेब, तिचा पाय चांगला होणं महत्वाचं” तो म्हणाला. मी त्याला, माझी आणि माझ्या मित्राची काय चर्चा झाली ते सांगितली. योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं. परत मला त्यांचा फोन काही आला नाही, कि काही नवीन कळाल नाही.
***
काही आठवड्यांनी मला दुसऱ्या एका कामानिमित्त त्या हॉस्पिटलला जाण्याचा योग आला. जाता जाता सहज मला ती पेशंट आठवली. मी चॅरिटी ऑफिसला गेलो, तिथल्या त्या मुलीशी ह्या पेशंट बद्दल विचारलं. ती म्हणाली “अहो कसले ते नातेवाईक, १००००० बिल झालं फक्त २०००० भरले आणि ऑपरेशन झाल्यावर पळून गेले, पैसे न देता.” मी चमकलो “अरे बापरे! पण तिचा पाय वाचला का?”. ती “ते काय मला माहित नाही, तुमच्याजवळ त्यांचा पत्ता आहे का?” मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो. त्या पायाची काय किंमत हा प्रश्न मात्र अजून मनात घोळतोच आहे.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे