Thursday, November 21, 2019

‘पुरा’नुभव


४ ऑगस्ट २०१९, रविवार. पुण्याहून घरी येत होतो. घरच्यांचा फोन वर फोन, कधी येतोयस कधी येतोयस. का तर नदीला महापूर आलेला होता कोणत्याही क्षणी नरसोबावाडी-कुरुंदवाड चा पूल बंद होणार होता.  कुरुंदवाडमध्ये प्रवेश केल्या केल्या शिवाजी पुतळा आहे त्याच्या समोर जो रस्ता आहे त्यावर पाणी आले होते. त्याची पातळी अजून वाढली कि ते पाणी जोरदार वाहणार होतं, हा नेहमीचा अनुभव. याला आमच्या भागात पाण्याला धार पडली असं म्हणतात. एकदा का हि धार पडली कि मग तिथं गाडी तर सोडाचं चालताही येत नाही. प्रयत्न केला तर पुरात वाहून जाण्याची शक्यता दाट, म्हणून धार पडायच्या आधी मी घरी यावं अशी आमच्या घरच्यांची इच्छा. रात्री ११ वाजता शिरोली फाट्यावर पोहोचलो, वेड्यासारखा पाऊस पडत होता, समोरचं अजिबात दिसत नव्हतं. शिरोली पुलाच्या कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडला पाणी आलं होतं आणि असा अंदाज होता तासाभरात दुसऱ्या बाजुनेपण पाणी भरणार होतं. बऱ्याचश्या बसेस बंद केल्या होत्या. मला जयसिंगपूरला कोणत्याही परिस्थितीत पोहचायचं होतं, तिथं मला न्यायला वडील आणि एक मित्र येणार होते. बऱ्याच वेळाने मला कर्नाटकची एसटी मिळाली, गर्दी होती, कसाबसा  जयसिंगपूरला पोचलो. वडील कधीच येऊन थांबले होते. गाडीतून आम्ही घरी जायला निघालो. वाडी-कुरुंदवाड पुलावर १-२ इंच पाणी आलं होतं, तीच परिस्थिती शिवाजी पुतळ्यासमोर होती. रात्री १२.३०- १ च्या दरम्यान घरी पोचलो. सगळं गाव जागं होत. प्रत्येकाच्या तोंडात पुराचीच चर्चा. जोरदार पाऊस सुरूच होता.
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे OPD सुरु केली पण एकदमच शांत होती. २ व्हीलर वरून आख्या गावाची चक्कर मारली, रात्रीत वाडी-कुरुंदवाड रस्त्यावर ३-४ फूट पाणी आलं होतं, दुसऱ्या बाजूला तेरवाडचा रस्ता पण बंद झाला, शिरढोण मार्गे इचलकरंजी रोड  तर कधीच बंद झाला. आता फक्त एकच रस्ता उरला होता गावातून बाहेर पडायचा तो म्हणजे मजरेवाडी मार्गे, गुरुदत्त कारखाना तिथून हुपरी.
दुपारी साधारण ३ च्या दरम्यान, गावातले एक माझे डॉकटर मित्र होते गायनॅक त्यांचा फोन आला "अरे सारंग तुझ्या हॉस्पिटलला बेड आहे का रे?" मी "आहे कि, का?"; सर "अरे सकाळी मी एक सेक्शन केलं पण दुपारपर्यंत माझ्या हॉस्पिटलमध्ये पाणी आलंय, तुझ्याकडे शिफ्ट करायचं म्हणतोय, २००५ ला तुझ्या कडे पाणी आलं नसेल ना?". कुरुंदवाडच्या इतिहासात आजपर्यंत २००५ चा महापूर हा सगळ्यात मोठा होता, त्यावेळी जवळपास ८०% गाव बुडालं होतं. मी " नाही सर नव्हतं आलं, तुम्ही पाठवा पेशंट काही प्रॉब्लेम नाही". तासाभरानं पेशंट आला, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काही मिनिटात सर आले आमच्यात थोडं डिस्कशन झालं आणि तिला पुढची पोस्ट ऑपरेशन ची ट्रीटमेंट सुरु केली. इकडं पाणी गावात शिरत होत, शालिकाच्या शाळेत पाणी गेलं होत त्यामुळे तिला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ती घरीच होती. तिचा आणि संयुजांचा धुडकुस चाललेला त्यात भर म्हणजे त्या पेशंटचा २ वर्षांचा मुलगा होता राजवीर, तो पण त्या दंग्यात सामील झाला. इकडं सगळ्या गावात मात्र चिंता पसरत होती, पाणी झपाट्याने वाढत होतं, कोयना, राधानगरी धरणभागात पाऊस थांबत नव्हता त्यामुळं अजून पाणी वाढणार होती. मी न्यूज चॅनेल लावून बसलो. मीडिया नुसता मोदी आणि अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होता का तर काश्मीर प्रश्न सोडवला कलम ३७० रद्द केलं या साठी. मराठी न्यूज चॅनेलवर पण तेच. खाली बातम्यांच्या पट्या फिरतात त्यात मात्र पाऊस, पुणे, नाशिक, मुंबई मध्ये वाहतुकीची कोंडी, महालक्षमी एक्सप्रेस मधले प्रवासी असे वाचवले याची चर्चा. बाकी काहीच अपडेट नव्हते. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती असताना जलसंपदा मंत्री मात्र काश्मीर प्रश्न सोडवल्यामूळ आनंदात होते आणि रस्त्यावर डान्स चालला होता. असो.
बुधवारी पाणी घरापासून फक्त १०० फुटावर राहिले होते, उरला सुरला मजरेवाडी रस्ता एव्हाना बंद झाला होता. आमचं गाव आता ३ बेटांसारखं दिसत होतं. एक छोटा बेट राजवाडा, दुसरा सगळ्यात मोठा बेट म्हणजे माळभाग, इथं माझं घर आणि हॉस्पिटल होतं. तिसरा सगळ्यात लहान बेट म्हणजे दत्त कॉलेज परिसर. बहुतांश लोक गाव सोडून आधीच गेले होते. राजवाडा भागात काही लोकं निर्वासित झाली होती तिथं साधारण २०००-२५०० माणसं होती, आमच्या म्हणजे माळभागावर सगळ्यात जास्त १०-१५ हजार लोक निर्वासित झालेली आणि दत्त कॉलेज परिसरात हजारभर माणसं होती. या तिन्ही ठिकाणी जायचं एकचं साधन म्हणजे बोट. भैरेवाडी म्हणून एरिया पूर्ण बुडाला होता त्यांचे २ मजले पाण्याखाली होती. तिथं शेकडो माणसं अडकली होती, त्यांची जी दुभती जनावरं होती त्यांना तिथल्या उंच इमारतीच्या गच्चीवर बांधण्यात आलं होतं. त्यांना सांभाळण्यासाठी पुरुष मंडळी तिथं राहिले होते व लहान मुले, बायका यांना माळभागावर राहायला पाठवलं होतं. ३ त्यातली कुटुंबं माझ्या घरी राहायला होती, बाकीची आपापल्या ओळखीने राहत होती तर बरेच लोक रस्ता बंद व्हायच्या आधी गुरुदत्त कारखान्यावर गेली होती.
गावामध्ये जसजसं पाणी वाढत होतं  तसतसं त्या भागातली लाईट बंद करत होते. आईला २००५ च्या पुराचा अंदाज होता, पिण्याचा पाणी पुरवठा लवकरचं बंद होणार होता. सोमवारपासून आम्ही घरातली सगळी माणसं RO केलेले पाणी हळूहळू भरायला लागलो, दर तासादोन तासाला घरच्या RO फिल्टर मधनं फक्त १५ लिटर पाणी मिळायचं, आम्ही ते भरायचो आणि वरच्या मजल्यावर ४-५ पिंप ठेवले होते त्यात भरायचो. ते सर्व पिंप भरायला बुधवार उजाडला. बुधवारी संध्याकाळी आमच्या एरियाचा DP पाण्याखाली गेला आणि घर व हॉस्पिटल ची लाईट गेली. दरम्यानच्या काळात आईवडिलांनी गहू, तांदूळ व डाळी १५-२० दिवस पुरतील या हिशोबाने भरून ठेवलं होतं.
या काळात वैद्यकीय अनुभव तर तुफान आले. इन्व्हर्टरवर बुधवारची रात्र कशी बशी गेली, माझी ECG मशीन मी चार्ज करून घेतली होती. आता जवळपास ८० टक्के गाव पाण्यात होतं माझं आणि आणखी २-३ जणांचे दवाखाने फक्त चालू राहिले होते. आम्ही ठरवलं कि आता रस्ता मोकळा होईपर्यंत मोफत उपचार करायचे त्यामुळं दवाखान्याला भरपूर गर्दी. एक जण आला अति दारू प्यायल्याने बेशुद्ध होता त्याला फिट येत होत्या. त्याला ऍडमिट केलं, दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला त्याला समजावून घरी पाठवलं. संध्याकाळी भैरेवाडीतली ओळखीतले ३ कुटुंब राहायला आली. ती ८-१० जण, आम्ही घराचे ६ जण आणि बाळंतिणीचे ४-५ जण अशी घरात २० एक लोकं होती. त्या सगळ्यांचं जेवणखाणं वगैरे करण्यात आमची हि आणि आई लागली होती. जिन्याच्या पोर्च आमचं स्वयंपाक घर झालं होतं. गुरुवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान पाणी आमच्या घराच्या मागच्या बाजूला लागलं. पहाटे ४ ते सकाळी ११ वाजेपर्यंत आख्या तळमजल्यावरचं सामान ३ ऱ्या मजल्यावर शिफ्ट केलं होतं. गुरुवारी संध्याकाळी जवळपास ९५ टक्के कुरुंदवाड पाण्याखाली होतं. घरात मागच्या बाजूला पाणी चढलं. आता माझ्याकडे अस्वस्थ असलेले पेशंट यायला लागले होते. कुणाचं शेतीच नुकसान झालेलं, कुणाचं घर पडलेलं, कुणाचं सामान वाहून गेलेलं. माझ्याकडे औषधं होती तोपर्यंत मी ती दिली. समोरच्या मेडिकल वाल्याने मात्र तप्तर सेवा दिली. लोकांकडे हार्ड कॅश नव्हती. त्याने उधारीवर  ६०-७० हजाराचा माल वाटला. शुक्रवारी घराच्या पुढच्या साईडला म्हणजे हॉस्पिटलमध्ये पाणी आलं. जवळपास माझं घर रस्त्यापासून ३ फूट उंचावर आहे. माझ्या घरात १ फूट पाणी होतं. म्हणजे रस्त्यावर ४ फूट (म्हणजे कमरेच्या वर पाणी आलं होतं). त्या पाण्यातच माझी ओ . पि . डी  चालायची. एक गरीब कुटुंब आलं लहान बाळाला घेऊन, त्याला चांगलाच ताप आलेला आणि खूप खोकला होता. माझ्याजवळची औषधं  संपली होती. समोरच्या मेडिकल मध्ये पण संपली होती. अजून एक मेडिकल दुकान उघडं होतं  तिथं त्या पोराचा बाप जाऊन आला अर्थात कमरेएवढ्या पाण्यातनं, त्याला १०० रुपये कमी पडत होते. मी २०० रुपये दिले म्हणालो त्या पोराला कायतरी खायला पण दे. तो बापडा हात जोडून बघत राहिला, मी त्याला थोपटलं आणि जा म्हणालो. २ दिवसांनी तो परत आला २०० रुपये द्यायला. स्वाभिमानी होता. त्याला कसबस समजावलं आणि म्हणालो लेकरांसाठी दूध घे याच; १०० रुपये लिटरनं मिळतंय आजकाल. आशीर्वाद देत गेला.  दुसऱ्या एका गायनॅक डॉक्टरांचा मला फोन आला; त्यांच्याकडे ८ महिन्यांची प्रेग्नेंट बाई ऍडमिट होती, तिला न्यूमोनिया झाला होता. धाप लागत होती. डॉक्टरांनी मला कंसल्टेशन ला येशील का म्हणून विचारलं. त्यांचं हॉस्पिटल १ कि.मी. लांब आहे, तिथं जायला मला साधारण १००-२०० मीटर अंतर कमरेएवढ्या धार पडलेल्या पाण्यातून जावं लागणार होत . या दरम्यान माझा जरा जरी तोल गेला असता तर मी वाहून गेलो असतो. मी क्षणभर विचार केला आणि हो म्हणालो. ते १००-२०० मीटर अंतर पार करायला मला दीड तास लागला. मी पेशंट बघितला, ट्रीटमेंट प्लॅन दिला, परत जाताना मात्र माझ्या दिमतीला ४ माणसं आली त्यांनी मला परत सोडलं. पुढं २ दिवसांनी सरांचा निरोप मिळाला कि पेशंट आऊट ऑफ डेंजर आहे.
शुक्रवार-शनिवार पर्यंत कोणत्याच सरकारी खात्याची मदत आलेली नव्हती. लोकांकडे खायला अन्न कमी पडायला लागलं, गावातल्या काही पुढारी मंडळींनी एक लाकडी नाव घेतली आणि अडकलेल्या लोकांची सुटका करायला सुरु केलं. गावातल्या एका धान्य व्यापाऱ्याच्या गोडावून मध्ये पाणी शिरलेलं, जी चांगली धान्याची पोती होती ती त्याला पैसे देऊन मागत होती. त्याने नकार दिल्यावर त्याच्या समोर गावातल्या लोकांनी त्याचं आख्ख दुकान लुटलं आणि घराघरात धान्य वाटत सुटली. आम्हा डॉक्टरांना पण प्रश्न पडला होता आता करायचं काय, कारण लोकं पुराच्या घाण पाण्यानं अंघोळ करत होती, शौचालयं नसल्यानं कुठंही बसत होती, त्यामुळं साथीचे आजार पसरण्याची भीती होती. सर्दी-खोकला ताप, जुलाब-उलट्या, स्किन इन्फेक्शन यांनी ऊत आणला होता. ट्रीटमेंट द्यायला डॉकटर तर होते पण औषधं नव्हती. कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन ने जयसिंगपूर, इचलकरंजी असोसिएशन च्या मदतीने, बोटीतून जाऊन औषधं आणली. ती कुरुंदवाडच्या ३ टापूवरील डॉक्टरांकडे पोचली आणि दिवसरात्र वैद्यकीय सेवेचा घाणा फिरत होता. रोज कॅम्पवर कॅम्प होऊ लागले. ४ पोरं अशी सापडली ज्यांना मोठेमोठे गळू होते, त्यांना ड्रेन करणं गरजेचं होतं. त्यांना हॉस्पिटलला घेऊन येत होतो तोवर आमचे सर्जन मित्र भेटले. त्यांना घेतलं त्यांनी लीलया ते गळू फोडले ते पण बॅटरीच्या उजेडात. त्या पोरांना औषधं दिली आणि पाठवलं. असंच एका रात्री साडेअकरा-बारा च्या  एक पेशंट आली. तिच्या छातीत दुखत होतं. धाप लागत होती. ३ महिन्यापूर्वी तिची अँजिओ प्लास्टी झाली होती. माझी आई मेणबत्ती धरून उभी होती, लाईटच नव्हती. त्या पेशंट ची BP २४०/१२० होती. ECG मध्ये हृदयावर ताण पडतोय असं वाटत होतं (Unstable Angina). ऑक्सिजन होता तो तिला लावला. माझ्याकडे ना औषधं होती ना कुठली वैद्यकीय उपकरणं चालवू शकत होतो. हॉस्पिटलचं बरंच सामान हलवलं होतं, त्यामुळे कुठं काय ठेवलंय याचा पत्ता नव्हता. एकतर ती गाव सोडून बाहेर कुठे उपचार घ्यायला जाऊ शकत नव्हती आणि प्रयत्न केला असता तर तिला उपचार मिळायला ५-६ तास लागले असते. तोपर्यंत २४० BP मुळे तिला स्ट्रोक बसला असता किंवा डेथ झाली असती. जे काय व्हायचं होत ते फक्त इथंच होतं त्यामुळे मी ती मेणबत्ती घेतली आणि जिथं सामान ठेवले तिथं काय सापडतंय का बघितलं. ५-१० मिनिटं शोधल्यावर मला betaloc नावाचं इंजेक्शन सापडलं, त्यानं तिची BP कमी येणार होती पण छाती दुखणं बऱ्यापैकी कमी येईल का या बद्दल शंका होती. तिच्याबरोबर तिची मुलगी होती, तिला सगळं सांगितलं. ती म्हणाली तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. मी ते इंजेक्शन दिलं. तिच्याजवळ तिच्या रक्त पातळ करायच्या गोळ्या होत्या त्या दिल्या आणि आता सगळं देवावर सोपवलं. २ तासांनी तिची BP कमी झाली. छातीवरचा ताण पण कमी झाला. खरं हे २ तास माझी एवढी वाट लावतील असं वाटलं नव्हतं. त्या बोचऱ्या थंडीत मला घाम फुटला होता. मॉनिटर नसल्याने मी दर १०-१५ मिनिटाला तिची BP चेक करत असे. रात्रीची वेळ असल्याने पेशंट झोपली. त्यामुळे मी तिला दार १/२ तासानं उठवायचो अन विचारायचो कमी आहे का? खर तर ती जिवंत आहे का असली तर शुद्धीवर आहे का हे बघत होतो. २ तासांनी तिला बर वाटलं तोवर तिचा नवरा पण आला होता. तो म्हणाला साहेब तीला टेन्शन आलं कि तिची BP वाढते. मी तिला विचारलं कसलं टेन्शन आहे तर ती बया चक्क गायला लागली "दुष्मन न करे दोस्त ने ऐसा काम किया है.... ". मी म्हणालो छान आहे या परिस्थितीत पण गाणं सुचतंय. तिला घरी पाठवल, रात्री हॉस्पिटल ला ठेऊन फायदा नव्हता, चालूच नव्हतं काही, शिवाय आपल्या लोकांच्यासोबत असली कि मन शांत राहील हा हेतू. रात्री काही वाटलं  तर यायला सांगितलं नाहीतर सकाळी परत भेटायला सांगितलं. आता ती आहे व्यवस्थित. एक म्हाताऱ्याला संध्याकाळी काही लोकं घेऊन आली. त्या पेशंटला रोज दारू लागायची आता या परिस्थितीत त्याला मिळत नव्हती म्हणून त्याचे हातपाय थरथरायला लागले होते, असंबंध बरळत होता याला आमच्या भाषेत अल्कोहोल विड्रावल म्हणतात. त्या लोकांमध्ये एक लोकप्रतिनिधी होता त्याला म्हटलं "साहेब, ह्या पेशंटला आठवडाभर ऍडमिट ठेवावं लागेल, बांधून घालायला पाहिजे आणि उपचार करायला पाहिजे. याच्या उपचारासाठी जी औषधं लागणार आहेत ती आत्ता नाहीयेत आणि लवकर मिळणार पण नाहीत. एक काम करा त्याला दारू द्या प्यायला तासाभरात सरळ होईल नंतर पूर ओसरला कि मग आपण ट्रीटमेंट करू". तो लोकप्रतिनिधी माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला आणि हसायला लागला. त्याने पोरांना चपटी आणायला सांगितली. आई त्याला म्हणाली "साहेब त्याला हॉस्पिटलच्या बाहेर द्या नाहीतर लोकं रांग लावतील इथं दारू प्यायला सांगत्यात म्हणून". सगळी हसायला लागली. त्याला हॉस्पिटलच्या बाहेर नेलं चपटी पाजली १५ मिनिटात पेशंट एकदम टकाटक.
रोज कॅम्प व्हायचा, आम्ही १००-१२५ पेशंट बघायचो. सर्दी खोकला, जुलाब, पोटदुखी, फंगल इन्फेक्शन यांना ऊत आलेला. ६-७ दिवसानी सरकारी मदत यायला सुरु झालेली. त्यात औषधं यायची ती वाटायला लागायची. माळभागावर जी थोडी जमीन शिल्लक त्यात एस. पी. हायस्कुल होतं, तिथं मोठं ग्राउंड आहे, त्या शाळेत बरीच निर्वासित राहिले होते आणि तिथं बोर्डिंग स्कुलची चारपाचशे पोरं होती. तिथंच सरकारी यंत्रणा राबत होती. हेलिकॉप्टर तिथं उतरायचं त्यातनं सामान यायचं मग ते कुरुंदवाड सह आजूबाजूच्या खेडयांना बोटीतून पाठवत असे. त्याच चॉपरने आम्ही काही पेशंट शिफ्ट केले. एक हार्ट अटॅक, एक अवघडलेली बाई, २ अत्यवस्थ मुलं, एक ९५ वर्षाची मांडीचे हाड मोडलेली म्हातारी इत्यादी.
संपूर्ण गावातून पुराचं पाणी जायला चांगले १५-२० दिवस गेले होते. ८-१० दिवसांनी मजरेवाडी रोड खुला झाला त्यामुळं गावात मदत यायला सुरु झाली. आता पर्यंत TV वर कुरुंदवाडची बातमी गेली होती आणि अख्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ यायला सुरु झाला. जसं जसं पाणी कमी झालं तस तस त्याची भयानकता जाणवायला लागली. आख्या गावाला कचऱ्याकुंडीचं स्वरूप आलेलं, दुर्गंध आणि कचऱ्याने सगळे हैराण झालेले. प्रत्येकजण आपापल्या  घरात जात होता, कुणाचं घर पडलं होतं, कुणाची भांडी-कपडे वाहून गेलेले, कुणाचं फर्निचर खराब झालेलं, इलेकट्रॉनिक वस्तूंचा तर खुळखुळा झालेला. प्रत्येकजण डोक्याला हात लावून बसायचा. शेतातली पिकं तर विचारू नका. लाखो-करोडॊ रुपयांचं नुकसान झालेलं. आता प्रत्येक कुरुंदवाडकर पुढले काही दिवस सफाईचा मागे लागला. नगरपालिकेच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे दिवस रात्र राबून ते कचरा वाहून नेत होते. बऱ्याच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते संपूर्ण देशातून येत होते त्यांचाही हातभार लागत होता. वायरमन परत लाईट जोडत होते. ज्यांची घरं पडली होती ते लोकं पुढचे काही महिने राहण्यासाठी भाड्याच्या जागा शोधत फिरत होते. अख्या महाराष्ट्राने सर्व पूरग्रस्त भागाला मदतीचा हात दिला. २-२ महिन्याचं रेशन दिलं. स्टोव्ह, कपडे औषधं इत्यादी सामान दिलं गेलं. त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नाही हे खरं. बाहेरून बरीच वैद्यकीय मदत येत होती. कॅम्प घडत होते. बाहेरून डॉक्टर्स येत होते. पुढचे काही आठवडे असच चालू होतं त्यामुळं गावातल्या डॉक्टरांना थोडा आराम मिळाला. या पूर काळात मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे पहायला मिळाले. मदतीचे हात दिसले, परिस्थितीवर पोळ्या भाजणारे लोकं पण बघितली. मदतीच्या आलेल्या गाडयांना अडवून त्यातल्या सामानाची लुटालूट पण बघितली. त्याच सामानाची साठेबाजी करून विक्रीस काढलेलं पण बघितलं आणि आलेली मदत ढापून नंतर निवडणुकीत त्याचा वापर केला, स्वतःला दानशूर समाजसेवक असल्याचं भासवून मतं विकत घेणारे उमेदवार पण बघितले. या वर्षीच्या पुराने पुरा अनुभव दिला हे खरं .
                                                   -डॉ. सारंग कोकाटे