Friday, July 10, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 4

सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले धर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिचन, बौद्ध, ज्यू, जैन इत्यादी, प्रत्येक धर्मात अनेक जाती आणि पोटजाती पण आहेत. यातील हिंदू धर्म वगळता इतर सर्व धर्म हे कोण्या एका संताच्या शिकवणीवर आधारलेले आहेत आणि ते एक ईश्वरवादावर आधारित आहेत.
इतके दिवस धर्मावरती वाचतोय, एक प्रश्न मला सारखा पडत होता धर्माचा उद्येश्य काय? what is purpose of religion? प्रत्येक धर्मामध्ये आचरण कसे असावे, दुसऱ्याशी कसे वागावे, काय खावे, काय कपडे घालावेत, परमेश्वराची आराधना कशी करावी. असे नाना प्रकार सांगितलेत. थोडक्यात काय तर जगण्याच्या रिती सांगितल्यात, बरोबर! त्या कशासाठी? तर माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात सुसूत्रता रहावी. माणूस शांततेत आणि आनंदात राहावा. हाच उद्येश्य असला पाहिजे, नाही का?  हा उद्येश्य कोणताही धर्म सध्या पूर्ण करतोय का? समाजात जातीय ताणताणाव आहे, दंगली घडतात, जाळपोळ होते, दुकानं लुटली जातात, स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष मारला जातो, युद्ध होतात, बॉम्बहल्ले होतात, असं का?
उदाहरण घेऊ, समजा ४ लोकांना सांगितलं कि तुम्ही गणिताचा वापर करा पण उत्तर हे १० आलं पाहिजे. हे १० तुमचं उद्दिष्ट आहे, तुमचं ध्येय आहे. पहिल्याने लिहिलं ५+५ =१०; दुसऱ्याने ५x२ =१०, तिसऱ्याने १५-५=१०; चौथ्याने २०/२=१०. सगळ्या पद्धती ह्या बरोबर, नाही का. मग कोणती पद्धत अवलंबवायची, मग हे चौघे एकमेकांशी भांडायला लागले माझी पद्धत तुझ्यापेक्षा सरस आहे म्हणून. धर्माच्या बाबतीत पण असंच आहे कि, सर्व धर्मांचा उद्येश्य सारखाच आहे कि, पद्धती वेगवेगळ्या आहेत. फक्त या पद्धतींच गणित वरच्या गणिताइतकं सोप नाही तर ते बरच क्लिष्ट आहे.
अडचण इथं आहे कि सर्वाना आपलीच पद्धत भारी वाटते आणि ते त्या दुसऱ्यावर लादू पाहतात. मग तो हिंदू असो मुस्लीम असो ख्रिश्चन असो बौद्ध असो किंवा आणखी कोणी असो. मग ते दहशतीने असो, प्रेमाने किंवा राजकारणाने असो किंवा पैसे देऊन असो.
दुसरी गोष्ट म्हणजे या क्लिष्ट प्रकारच्या धार्मिक भाषेमुळे, सामान्य माणसाला स्वतःच्या धर्माविषयी काही ज्ञान नसतं. त्यामुळे तो एका विशिष्ट अश्या व्यक्तींकडे जात असतो ज्याला धर्माविषयी ज्ञान आहे. (असं सामान्य माणूस मानतो) ज्यांना हिंदू लोकं साधू-संत म्हणतात, मुस्लीम मुल्ला-मौलवी, तर ख्रिश्चन प्रिस्ट म्हणतात. अश्या वेळी जे हे लोकं सांगतील त्याला सर्वसामान्य माणूस खर मानतो आणि त्या पद्धतीने वागतो. सामान्य माणूस अजिबात त्या गोष्टी पडताळून पहायची, त्यावर आकलन करायची तसदी घेत नाही. कारण एक तर त्याला ह्या व्यक्तींवर प्रचंड विश्वास असतो, दुसरं म्हणजे तो घाबरत असतो मी जर असे वेडेवाकडे प्रश्न विचारले तर माझं काही वाईट होईल का? समाज काय म्हणेल? तिसरं म्हणजे कुटुंबाची दोन वेळेची खळगी भरणे आणि संसार करणे यात तो इतका गढून गेलेला असतो कि या विषयावर विचार करायला वेळ देणे त्याला परवडणारे नसते. ह्या गोष्टींचा फायदा हि वरची मंडळी, राजकारणी मंडळी घेऊ पाहतात. भडक विधानं केली जातात, तरुण वर्गाला भडकावले जाते. कधी नीट लक्ष दिले तर लक्षात येते कि जास्ती जास्त दंगलींचे प्रमाण हे निवडणुकीच्या आधी, सणासुदीच्या काळात घडतात. प्रत्येक दंगलीमागे काहीतरी कारस्थान लपलेले असते. खरतर यात भरडला जातो सामान्य नागरिक. नाही का? पुढे याच दंगलीचा आधार घेतला जातो आणि तरुणांना सांगितलं जात/मनात येतं कि आपल्या धर्माच्या लोकांची काय अवस्था केली दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी आणि परत हि धार्मिक तेढ पुढच्या पिढीमध्ये नुसती टिकवली जात नाही तर वाढवली जाते. मी MBBS ला असतानाची गोष्ट आहे आम्ही ३rd year ला होतो तेंव्हा धुळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती, सगळीकडे तणावाच वातावरण, सारख सारखं काहीतरी नवीन कानावर यायचं, अफवांचे उधान आले होते. अश्या सुन्न मानसिक अवस्थेत आम्ही होस्टेल च्या कट्यावर बसलो होतो, दोन जुनिअर पण होते दोन्ही धर्माचे, हिंदू होता तो उद्विग्न होऊन म्हणाला “साल्या तुमच्यामुळे असं होतं नेहमी, कापून काढलं पाहिजे सगळ्यांना.” मुस्लीम म्हणाला “मी काय केलंय आणि येऊन तर बघ मीच कापून काढेन.” ते दोघं एकमेकांच्या अंगावर गेले. मी त्यांना अडवलं म्हणालो “अरे तुम्ही दोघ चांगले मित्र आहात का उगाच भांडताय. हि जी काही दंगल घडलीय ती तुमच्या दोघांमुळे नाही झालीये. तुम्हाला जर कापून काढायचे आहे तर त्या ५-५० लोकांना कापा जे अत्याचार करत आहेत. त्यांच्या चुकीसाठी तुम्ही एकमेकांना का जबाबदार धरताय. तसं जर केलं तर पुढच्या दंगलीची जबाबदारी तुमच्या दोघांची असेल. कारण तुम्ही एकमेकांची मन कलुषित करता आणि दुसऱ्यांची सुद्धा.” दोघं ढसाढसा रडली. एक प्रकारचं दुष्टचक्रच होऊन बसलंय हे. नाही का?
दहशदवाद, संपूर्ण मनुष्यजातीच्या अवघड जागेचं दुखण होऊन बसलंय. हि जी माथेफिरू लोकं आहेत जे स्वतःला मुस्लीम समजतात, त्यांना इस्लाम समजलाय कि नाही देव जाणे. कारण इस्लाम मध्ये निरपराधी व्यक्तीला इजा करणे/मारणे हे पाप आहे. प्रत्येक दहशदवादी सगळ्यात पहिल्यांदा हेच करतोय. साधारण १००-१५० वर्षापूर्वी या गोष्टींचे पाळेमुळे सापडतील, युरोप-अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली, व्यापारानिमित्त अनेक युरोपियन देश जगभर प्रवास करू लागले, त्या काळच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अरब-आफ्रिकन देशांमध्ये त्यांनी आपली पाळेमुळे रोवली. साहजिकच त्यांच्याबरोबर ख्रिश्चन धर्मप्रसारक तिथे पोहोचले. त्यांनी धर्माचा प्रचार-प्रसार सुरु केला. तिथे काही मुस्लीम व्यक्तींनी त्या विरोधात एक वैचारिक लढा सुरु केला, पुढे त्या संघर्षाने हिंसक वळण घेतलं, पुढे मोटारींमुळे खनिज तेलाची मागणी होऊ लागली आणि अरब देशात पैशाची बरकत आली. २ महायुद्धे झाली, रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सूर झाले. या देशांच्या तेलसाठा मिळवण्यासाठी छुप्या चढाओढी सुरु झाल्या आणि कट्टर मुस्लीम धर्मवाद्यांचा वापर अमेरिकेने रशियाचा विरोध करण्यासाठी केला. या काळात त्यांना भरपूर शस्त्रसाठा, पैसे पुरवण्यात आले. आता हेच राजकारण सगळ्या जगासाठी त्रासदायक ठरतंय. हा विषय एवढा गुंतागुंतीचा आहे, प्रत्येक देशाचं एक वेगळ राजकारण आहे. त्याची व्याप्ती आहे. यावर एखाद मोठ पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. काहीही असो पण दहशद्वादामुळे सामान्य माणसाचेच हाल होतात, मग तो हिंदू असो मुस्लीम असो वा ख्रिश्चन, त्रास सगळ्यांना होतो. मनुष्याजातच नष्ट होते कि काय अशी भीती कधीकधी वाटते.
अंधश्रद्धा आणि धर्माचा जवळचा संबंध आहे. काही वर्षापूर्वी गणपती दुध पितोय म्हणून कित्येक लिटर दुधाची नासाडी झाली. अजूनही नरबळी सारखे प्रकार आपल्या देशात घडतात. दाभोलकर सारख्या माणसाची हत्या होते. जेवढा माणूस शिकतोय तेवढाच अंधश्रधाळू बनतोय असं वाटत. मेसेजेस फिरत असतात, शिर्डीतून हा मेसेज आलाय, ५ जणांना पाठवा म्हणजे भलं होईल नाहीतर काहीतरी वाईट बातमी कळेल. काय म्हणावं याला काही कळत नाही. गणपती उत्सवात डॉल्बी चालू असते गाणी काय तर “पोरी जरा जपून दांडा धर...”; “तुझा झगा ग....” आणि त्यावर दारू पिऊन धिंगाणा चालू असतो. असं करणाऱ्यांच्या आया-बहीणीचा चेहरा मला बघायचा आहे, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे ती बघायचीय.

माझ्यासारख्या व्यक्तीची फार घालमेल होते हे बघून, मग शब्दातून, लिखाणातून ते व्यक्त होऊ लागते. तरीही मी आशा करतो कि आजचा तरुण कुठेतरी शहाणा होईल, स्वतःच आकलन करेल. स्वतःच्या धर्माविषयी जाणून घेईल, दुसऱ्या धर्माविषयी आदर ठेवेल. मी या दिवसाची वाट बघतोय कि प्रत्येक माणूस सद्सात्विवेक बुद्धीने वागेल, प्रत्येक गोष्टीचं आकलन करेल, पडताळून बघेल आणी माणसाला माणसासारखं वागवेल. कारण माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

Wednesday, March 4, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस ३

धर्माची/संस्कृतीची निर्मिती का केली किंवा कशी झाली? या प्रश्नासाठी आपल्याला इतिहासात जाव लागेल. विचार करूयात कि पृथ्वीवर माणूस अजून यायचा आहे, तर पृथ्वीवर आत्ता डायनासोर आहेत आणि त्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. मग एक फार मोठा उल्कापात झाला आणि त्या उल्कापातामुळे पृथ्वीचं वातावरण ढवळून निघालं, जंगले पेटली, ज्वालामुखी फुटले, भूकंप झाले आणि पृथ्वी हिमयुगात पोहचली. या सगळ्या घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाले. पुढे काही हजार वर्षांनी माकडांपासून मानवाची उत्क्रांती झाली. हि उत्क्रांती कशी झाली या बद्दल बरंचस माहिती नाहीये, उत्क्रांती साठी लागणाऱ्या माकड आणि मानव या मधल्या बऱ्याचश्या कड्या गायब आहेत आणि या उत्र्कांतीचा वेगही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. एक अशीही विचारसरणी आहे कि प्राचीन काळी काही बुद्धीजीवी परग्रही इथं आले होते त्यांनी इथल्या माकडांच्या जनुकामध्ये आपली काही जनुके मिसळून मानवजातीची निर्मिती केली. काही का असेना पण एक गोष्ट मात्र नक्की आहे कि मानवाचं पृथ्वीवरील अस्तित्व फार अलीकडच म्हणजे २०-३० हजार वर्षांचं असावं. आता तेंव्हाच्या आदीवासी लोकांची राहणीमान कस असावं? त्यांची संस्कृती कोणती?

अश्मयुग, तांब्रयुग आणि लोहयुग, अस आपण इतिहासाच्या पुस्तकात मानवाच्या इतिहासाबद्दल वाचलंय. अश्मयुगात(stone age) धर्म तयार झाले नसावेत, असतील तर त्याबद्दल माहिती नाही. त्याकाळी माणूस टोळक्याने राहायचा, वेगवेगळ्या जमाती असायच्या. अभ्यासकांच्या मते तेंव्हा माणूस गुहेत राहायचा, अंगावर पाला किंवा जनावरांची कातडी पांघरायचा, कंदमुळे आणि जनावरे जे मिळेल ते खायचा. शिकारी करता त्याला हत्यारे माहित नव्हती, दगडाने शिकार करायचा. त्या काळी त्याचा एकच धर्म होता, जगणे. तो भटकायचा, अन्न मिळवायचा, नैसर्गिक आसरा शोधायचा, आपली पिढी बनवायचा, तो फक्त जगायचा. त्यावेळी त्याने नैसर्गिक गोष्टी उदा. पाऊस, वीज, वादळ, वणवा(आग), संसर्गजन्य आजार इ. बघितले असणार पण त्या विषयी काहीच ज्ञान नव्हतं त्याला. अश्या गोष्टीमुळे एक तर इजा व्हायची किंवा मृत्यू व्हायचा. साहजिकच तो यांना घाबरायला लागला. त्याने ह्या सर्वांचं निरीक्षण/आकलन करायला सुरु केलं असणार. सुरुवातीला ह्या गोष्टींचा तर्क लावायला त्याला आलं नसावं. ते का होतय हे कळाले नसावे. मग त्याने ह्या गोष्टींना दैवी मानायला सुरु केलं असणार. तो या ताकदींना पुजायला लागला असणार. त्या शक्तींपासून त्रास होऊ नयेत म्हणून त्याने काही विधी तयार केले असणार, काही नियम बनवले असणार, इथंच धर्माचा पाया घातला गेला असणार, त्या नियमात, त्या रूढी-परंपरेत पिढी दर पिढी वाढ होत असणार. त्यात तर्कसंगती कमी तर श्रद्धा-अंधश्रद्धेचा प्रभाव जास्त असणार.

पुढे माणसाने वेगवेगळी दगडी हत्यारे तयार केली, आगीचा वापर सुरु झाला, चाकाचा शोध लागला, शेती करायला लागला, धातूचा शोध लागला आणि हत्यारे धातूची बनली. माणूस तांब्रयुगात(bronze age) पोहोचला. ह्याच काळात प्राचीन संस्कृती अस्तित्वात होत्या उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेत मायन, प्राचीन ग्रीक, प्राचीन रोमन, प्राचीन इजिप्तिअन संस्कृती, प्राचीन वैदिक/आर्य संस्कृती. या संस्कृती कोणी एका माणसाच्या विचारावर चालत नव्हत्या तर त्या पिढी दर पिढी चालत असलेल्या रूढी-परंपरेवर आधारित होत्या. ह्या काळात माणूस बऱ्यापैकी स्थिरावला, त्याने गावं-नगरे बनवली, त्याची कला, कारीगिरी सुधारली, तो जनावरं पाळू लागला, घोडा-बैलगाडी हे त्याचे वाहने झाली. कारीगिरी सुधारल्यामुळे चांगल्या दर्जाची हत्यारे त्याने बनवली आणि तो आणखी ताकदवर बनला. त्याने देवांच्या मुर्त्या बनवल्या प्रार्थनास्थळे बनवली. समाजाचे स्तर बनले, त्या काळच्या सर्व संस्कृतीत साधारतः राजा, धर्मगुरू, सैनिक, व्यापारी, कारागीर, शेतकरी असे समाजाचे वर्गीकरण दिसायचे. बऱ्याचदा धर्मगुरू हाच राजा असायचा, तोच न्यायनिवाडा करायचा. त्याने नियम बनवले असायचे. हे नियम पारंपारिक रूढी-परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असायचे.

बहुतांश संस्कृतीमध्ये अनेक देव असत. त्या देवांना खुश(प्रसन्न) करण्यासाठी किंवा त्यांचा कोप होऊ नये म्हणून बऱ्याच प्रथा होत्या. बहुतेक सर्वच धर्मामध्ये ईश्वराला खुश करण्यासाठी काही तर अर्पण करण्याची प्रथा होती. त्यातल्या बऱ्याच विदारक होत्या कारण त्यात ईश्वराला बळी देण्यासाठी मनुष्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होता, उदा. माया लोकं सूर्यग्रहणादिवशी देवाला शांत करण्यासाठी माणसांचा बळी द्यायचे, त्यांचे जिवंतपणी छाती फाडून धडधडते हृदय ईश्वराला अर्पण करायचे. काही संस्कृतीच्या उत्ख्ननात बळी दिलेल्या हजारो कवट्या सापडल्या आहेत ज्या एका ठिकाणी साठवून ठेवलेल्या आहेत.  काही ठिकाणी तर लहान मुलांना बळी द्यायचे. कारण काय तर लहान मुलं निरागस असतात आणि त्यांचा बळी दिल्यावर परमेश्वर खुश होतो म्हणे. या विषयावर बरचसं संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे. जर या विषयावर documentry बघायचं असेल तर YouTube वर Ancient beliefs and sacrifices हा विडियो https://www.youtube.com/watch?v=gHzsqlP8H3Q&list=WL&index=2  ह्या लिंकवर बघा. एक गोष्ट नक्की होती सर्व धर्मांमध्ये एक उच्च धार्मिक व्यक्ती होती आणि ती धर्माशी निगडीत नियम सांगत असे आणि त्यानुसार न्यायनिवाडा करत असे. त्या व्यक्तीच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व असे, कारण सामान्य व्यक्तीच्या मते ती व्यक्ती परमेश्वराशी संवाद करू शकत होती. त्या व्यक्तीचा शब्द म्हणजे ईश्वराचा शब्द मानला जायचा. या गोष्टीमुळे ती व्यक्ती ताकदवर बनली. तिच्या हातात सत्ता आली. अशी व्यक्ती काहीही करू शकते. समाजाला आपल्या बोटावर नाचवू शकते.


पुढे लोह्युग(iron age) आले आणि काही अपवाद वगळता बहुतांश प्राचीन संस्कृती लुप्त झाल्या, त्यांची जागा आधुनिक धर्मांनी घेतली.   
क्रमशः 

Friday, February 20, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 2



मला असंख्य प्रश्न पडले होते त्यातला एक मुख्य प्रश्न हा होता कि धर्माची निर्मिती ईश्वर निर्मित आहे काय? त्याआधी हा प्रश्न पडला ईश्वराच अस्तित्व आहे कि नाही? हा एक बराच वादाचा मुद्दा असल्याने, माझ्या लिहिण्याचा उदेश्य धर्माविषयी असल्याने आणि प्रत्येक धर्मात ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता असल्याने मी सध्या अस समजून चालतोय कि ईश्वर अस्तित्वात आहे. आता प्रश्न हा होता परमेश्वर म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? थोडं-फार वाचल्यावर मला असं वाटलं ईश्वर म्हणजे या विश्वाचा निर्माता, जे आपल्याला दिसते, जे आपल्याला समजलेले आहे/नाही त्याची निर्मिती करणारा तो म्हणजे परमेश्वर, थोडक्यात एक अशी दिव्य गोष्ट ज्याने अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी बनवल्या. हो ना?

म्हणजे ही पृथ्वी, पृथ्वीवरील जीवन, माणूस, प्राणी, पक्षी, झाडे, नद्या पर्वते, समुद्र सर्व ईश्वराने बनवले. इतकंच काय तर सूर्य, ग्रह-तारे, चंद्र, तारकामंडले(galaxies) पण ईश्वराने बनवलीत. आपल्या या सूर्यमालेत फ़क़्त पृथ्वीवरच जीवन आहे  असे आपण मानतो. असेच सूर्यासारखे असंख्य तारे मिल्की वे  नावाच्या तारकामंडलात आहेत. या तारकामंडलातील ताऱ्यांच्या भोवतीने करोडो-अरबो ग्रह फिरताहेत आणि त्यातल्या लाखो ग्रहावर जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आणि तशी अनुकूल परिस्थिती आहे. या सर्व ग्रहताऱ्यांचे आपले शास्त्रज्ञ शोध लावताहेत त्यांचा अभ्यास करताहेत, त्यावर जीवसृष्टी शोधताहेत.

हल्लीच्या नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला दुर्बिणीतून खूप दूरच पाहता येतं, शास्त्रज्ञांना असे करोडो तारकामंडलं (Galaxy) सापडली आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
(हा विडियो बघा म्हणजे आपल्याला पृथ्वी केवढी आहे ते समजेल)


मुद्दा असा आहे हे सर्व परमेश्वराने बनवले आहे आणि या विश्वाची व्याप्ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. जर ईश्वर एवढ सर्व बनवू शकतो तर धर्म पण त्यानेच बनवले कायजर आपण मानलं कि धर्म हे त्यानेच बनवलेत तर मग ते फक्त माणसासाठीच का? दुसऱ्या प्राण्यांसाठी का नाही? कोणीतरी म्हणेल किंवा असा युक्तिवाद करेल कि मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे आणि त्याच्यासारखं या विश्वात कुणीच नाहीये म्हणून हा धर्म ईश्वराने तयार केला.
कल्पना करा सहारा वाळवंटासारख एक मोठं वाळवंट आहे आणि त्यात एका ठिकाणी मुंग्यांचे वारूळ आहे आणि या मुंग्यांना आपल्यासारखी आकलन करण्याची बुद्धी आहे. तरी पण त्यांचा आकार बघता त्यांची त्या वाळवंटात वावरण्याची क्षमता फक्त काही किलोमीटरचा दायरा आहे आणि त्यांच्या त्या दायरयात दुसरं कोणीच नाहीये. मुंग्या म्हणतात कि या वाळवंटाचा आमचं वारूळ हे एक मध्य आहे आणि त्यात दुसरं कुणीच नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे कि ईश्वराने या विश्वाची(वाळवंट) निर्मिती आपल्यासाठीच केली आहे. तर त्यांची हि मान्यता किती खरी असावी? त्या वाळवंटात दुसरे जीव नसतील का? फक्त मुंग्यांना माहित नाही म्हणून दुसऱ्या जीव-जंतुंच अस्तित्व नाकारायचं का? आपणही या विश्वाच्या वाळवंटातील मुंगीसारखेच आहोत की. इतकंच काय तर मुंग्याच्या त्या वाळवंटाच्या तुलनेत आपलं विश्व कैकपटीने जास्त आहे. फक्त आपल्याला माहित नाही म्हणून दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी नाही असं मानायचं का? आणि जर जीवसृष्टी असेल तर त्यामध्ये मानवाप्रमाणे बुद्धीजीवी नसतील का? असंही असू शकेल माणसापेक्षा जास्त प्रगतीशील असणारे परग्रही जीव असतील. एक theory अशी ही आहे कि या पृथ्वीवर आधी परग्रही प्राचीन काळी आले होते त्यांनी इथल्या जीव-जंतुंवर जनुकीय प्रयोग केले आणि अश्याच माकडावरच्या जनुकीय प्रयोगातून त्यांनी मानवाची निर्मिती केली. त्यांनाच आपण देव म्हणतो. असो.

दुसरी गोष्ट अशी कि माणसाच अस्तित्व फक्त ३० ते ४० हजार वर्षापासून माहित आहे, त्याआधी तो होता कि नव्हता याबद्दल नीटस माहित नाहीये आणि धर्मांचा इतिहास २००० ते ५००० वर्षापेक्षा जास्त नाही. काही प्राचीन संस्कृती होत्या त्याबद्दल १०००० वर्षापेक्षा जास्त माहित नाही. पृथ्वी आणि सूर्याचा जन्म मानवाच्या अस्तित्वाच्या लाखो वर्ष आधीचा आहे आणि आपल्या मिल्की वे तारकामंडलाचा तर सूर्याच्या जन्माच्या लाखो वर्ष आधीचा आहे. याचा अर्थ परमेश्वर आधीपासूनच अस्तित्वात आहे कारण त्यानेच हे सर्व बनवले ना. जर धर्माची निर्मिती ईश्वराने केली असा मानलं तर मग मानवाच्या अस्तित्वाच्या अगोदर कोणता धर्म होता? हा फार मोठा प्रश्न आहे. असा विचार करून बघू, संपूर्ण विश्व हे ईश्वराचं साम्राज्य आहे तर या विश्वाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पृथ्वी केवढी असेल? संपूर्ण विश्वाचा फक्त १ खरब-खरब-खरब- खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब.............. भागापेक्षा पण कैकपटीने लहान. म्हणजे परमेश्वरच्या नजरेत एका ठिपक्यापेक्षा पण लहान. मग एवढ्याश्या लहान जागेत असणाऱ्या करोडो जीवजंतू पैकी फक्त मनुष्यासाठी एवढे धर्म निर्माण करायची त्याला गरज का वाटली असावी?

माझ्या मते धर्माची निर्मिती हि माणसानेच केली आहे आणि त्यासाठी त्याने ईश्वराचा एक tool म्हणून वापर केला आहे.

आता प्रश्न असा आहे कि धर्माची निर्मिती का केली किंवा झाली?

क्रमशः

Saturday, February 7, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 1

काही महिन्यांपूर्वी मला whatsapp वर एक विडियो आला होता, त्या मध्ये एका सलून दाखवलं होतं. त्या सलून मध्ये एक दुसऱ्या धर्माचा तरुण मुलगा दाढी करायला येतो, तो एका नोकरी साठी मुलाखतीला जाणार असतो. न्हावी आणि तो मित्र असतात. न्हावीला काही दिवसांपूर्वी त्या मुलाची आई भेटलेली असते आणि ती त्याला सांगत असते की ती त्याच्या मुलाच्या बाबतीत किती काळजीत आहे ते वगैरे, हे सगळ तो न्हावी त्या मुलाला सांगत असतो, तो त्याला म्हणत असतो कि “अरे जरा आई कडे लक्ष दे, ती आता म्हातारी झालीये, थकलीये, तिला तूच एक आधार आहेस.” तो मुलगा म्हणतो “हो आजच एका मुलाखतीला जायचं आहे, ती नोकरी मिळाली कि सगळं चांगलं होईल, म्हणूनच तुझ्याकडे दाढी करायला आलो. मुलाखतीला नीटनेटके जायला पाहिजे ना.” त्याचं बोलणं चालू असत, तो मुलगा दाढीसाठी बसलेला असतो, न्हावी त्याला फेस लावतो, आता वस्तऱ्याने तो दाढी करणार इतक्यात बाहेर गोंधळ सुरु होतो. तिथे जातीय दंगल सुरु झाली असते. त्या मुलाच्या आणि त्या न्हाव्याच्या धर्मांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. एका मिनिटात त्या सलूनमधील वातावरण बदलतं, तो तणाव त्या दोघांमध्ये येतो, त्यांचा संवाद खुंटतो, न्हावीच्या नजरेत राग दिसतो तर त्याच्या नजरेत भीती, न्हाव्याच्या हातात वस्तरा असतो, तो मुलगा त्याला विनवणी करायला लागतो इतक्यात न्हावी वस्तऱ्याने त्याचा गळा कापतो आणि हातात वस्तरा घेऊन जोरात ओरडत दरवाज्याकडे पळतो. तो दरवाज्याजवळ पोहोचतो इतक्यात बाहेरून “कट कट” असं कुणीतरी म्हणत आणि तो दंगलीचा आवाज थांबतो. न्हावी दरवाज्यातून बघतो तेंव्हा त्याला समजतं की इथं दंगलीचं शूटिंग चालू असतं. आता मात्र तो घाबरतो, त्याला जाणीव होते कि आपण काय करून ठेवलं हे. तो सलूनचं शटर ओढून घेतो. इथं विडियो संपतो.

तो विडियो संपला आणि माझ्या मनातले विचार सुरु झाले. बरेच दिवस मी यावर विचार करत होतो. मनात आलं यावर काही लिहाव पण हा विषय तसा खूप नाजूक आहे शिवाय बराच वादग्रस्त ही. त्यातून माझी कामाची धांदल म्हणून यावर लिहिणं राहून गेलं, पण पाकिस्तानात शाळेवर झालेला हल्ला आणि pk चित्रपट यामुळे परत माझे हे विचार डोके बाहेर काढू लागले आणि मग मी यावर लिहायचं ठरवलं. या विषयावर सुरुवात कशी करावी हा मला प्रश्न पडला होता.

वरच्या प्रसंगाबद्दल थोडं बोलूया. २ मित्र आहेत, वेगवेगळ्या धर्मातले, आधी त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी होती पण अचानक धार्मिक तणाव निर्माण होतो आणि एकजण दुसऱ्याचा गळाच कापतो. हे चूक आहे कि बरोबर? हे धर्म आहे कि अधर्म? कोणता धर्म हे सांगतो कि आपल्याच मित्राला मारा म्हणून? अशी कोणती भीती वाटते कि आपण आपल्याच मित्राच्या, शेजाऱ्याच्या जीवावर उठतो? हि दंगल का घडते आहे याची शहनिशा आपण करतो का? जे लोक धर्माच्या नावाखाली अशी कत्तल करतात त्यांना त्यांचा धर्म कधी समजलाय काय? जेंव्हा दंगल घडते तेंव्हा त्याचा उदेश्य खरोखर धार्मिक असतो कि राजकीय वा व्ययक्तिक? धर्माची लोकांना गरज का आहे? धर्मानुसार प्रत्येकाचा देव वेगवेगळा असतो कि एकच? धर्माची सुरुवात कशी झाली? धर्म मानव निर्मित आहे का परमेश्वर निर्मित? जर परमेश्वर निर्मित आहे तर मग वेगवेगळी धर्म का निर्माण केली गेली? असे असंख्य प्रश्न मला पडले. त्यावर मी स्वतंत्र पणे विचार करायला लागलो. माहिती घ्यायचा प्रयत्न करू लागलो. एक मला नक्की समजलं कि जे घडलं ते काही धर्म नव्हत तर अधर्म होतं. स्वतःला धर्माचा माणूस समजणाऱ्या त्या न्हाव्याचा तो धर्म नव्हता.
क्रमशः

डॉ. सारंग कोकाटे 
sarangkokate@gmail.com