Monday, January 27, 2014

नशीब



सकाळचा राउंड संपवून मी आणि माझा मित्र बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बँकेचे काम आटोपून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि पार्किंग कडे गाडी लावायला जात होतो इतक्यात आमच्यासमोर एक माणूस भोवळ येऊन पडला, मी उतरलो आणि त्याच्याकडे धावलो मित्राला सांगितलं गाडी पार्क करून ये, जवळच हॉस्पिटलच कॅन्टीन होतं तिथून कोणीतरी कांदा घेऊन त्याच्या नाकाला लावत होतं. तो पर्यंत मी तिथे पोचलो, त्याला बघितलं त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मी लागलीच त्याला कार्डियाक मसाज द्यायला लागलो(कार्डियाक मसाज मध्ये पिक्चर मध्ये दाखवतात तस छातीवर बुक्क्या मारत नाहीत तर चेस्ट बोन वर जोर देऊन मेंदूचा रक्त प्रवाह सुरु ठेवायचा  असतो). एकाला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि त्या माणसाला तातडीच्या सेवेच्या ठिकाणी आणलं. मग त्याला भराभरा इन्जेक्शनस दिली आणि त्याला ७-८ शॉकचे झटके दिले, श्वासाची नळी घातली. सर्व लोकं म्हणाले काही फायदा नाही, तरी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले १/२ तासाने त्याच हृद्य सुरु झालं. त्याला आम्ही अतिदक्षता विभागात ठेवले, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं. त्याला असा अचानक का झालं याचा शोध घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच्या हृदयाच्या तिन्ही मुख्य वाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या त्यातली १ १००% ब्लॉक होती आणि २ ९०% पेक्षा जास्त ब्लॉक होती. ५-६ दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि १०-१२ दिवसांनी त्याला वार्डमध्ये शिफ्ट केला. योगायोगाने तो आमच्याच युनिटमध्ये अॅडमिट होता त्यामुळे मी त्याला दररोज तपासणार होतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहित नव्हतं कि त्याला अॅडमिट करणारा मीच होतो ते, तो आता इतका चांगला झाला होता कि तो आता फिरायला लागला होता, मी त्याला विचारलं “आता कस वाटतय?” तो म्हणाला “सगळ चांगलं आहे पण डॉक्टरांनी माझ्या छातीवर एवढ दाबलय कि माझ्या २ फासळ्या तुटल्यात, लई दुखतंय बघा” मी त्याला पेनकिलर चा औषध दिलं आणि काही मलम लावायला दिलं आणि म्हणालो “जाऊदे काका जीव वाचला ते चांगलं, ते फ्रॅक्चर काय ३-4 आठवड्यात भरेल”.  त्याला बायपास ऑपरेशन सांगितलं होत, पण त्याच्याकडे पैसे नव्हते चॅरिटी ऑफिस ने त्याचा आत्तापर्यंत पूर्ण खर्च केला होता, ते त्याच्या ऑपरेशन चा निम्मा खर्च उचलायला तयार होते, पण तो नाही म्हनाला म्हणून त्याला औषधांवर घरी पाठवला. त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
आणखी एक अशीच घटना पुढे काही महिन्यांनी घडली, १ पन्नाशीचा माणूस त्याला १ वर्षापूर्वी सौम्य अर्धांगवायूचा झटका आला होता व तो मधुमेही आहे हे तेंव्हा समजलं होतं. तो वर्षभर काही हॉस्पिटलला फिरकला नाही, त्याची बहिण डॉक्टर होती आणि ती त्याला मधुमेहासाठी उपचार करत होती, त्याला २ दिवस धाप लागत होती आणि त्याची शुगर कंट्रोल मध्ये अजिबात नसायची, २ दिवस बहिणीने फोन वरून काही औषधं सांगितली पण त्याने काही फरक पडला नाही. घरच्यांनी त्याला हॉस्पिटल आणायचं ठरवलं आणि हॉस्पिटल ला येतानाच घरच्या जिन्यावर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले, घरच्यांना काहीच कळाल नाही आणि त्याला रिक्षात घालून हॉस्पिटलला आणेपर्यंत अर्धा-पावून तास झाला होता. हृदयाचे ठोके बंद झाल्यावर जर १० मिनिटाच्या आत कार्डियाक मसाज सुरु केला नाही तर ती व्यक्ती १००% दगावते, तरी आम्ही १/२ तास प्रयत्न केला पण या वेळी मात्र काळही आला होता आणि वेळही. काही वेळाने तिची डॉक्टर बहिण आली तिला आम्ही त्याचा मृत्यूची बातमी दिली, ती म्हणाली “असा कस शक्य आहे”. मी म्हणालो “जर मधुमेह कंट्रोल मध्ये नसेल तर बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही आणि अश्या वेळी फक्त दम लागतो, ते जर काल आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती”. खिन्न मनाने तिच्या भावाचा देह ती घेऊन गेली.
या दोन्ही घटना तश्या सारख्याच आहेत फक्त पहिला हॉस्पिटलच्या आवारात पडला म्हणून वाचला आणि दुसरा हॉस्पिटलच्या बाहेर पडला म्हणून गेला. दोघांचही नशिबच म्हणायचं.
                                                                                                                          -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, January 23, 2014

डॉक्टर



घरी मेहुणा आणि सासरे आले होते, गप्पागोष्टी मध्ये डॉक्टरची लाईफ हा विषय निघाला, डॉक्टरला पर्सनल लाईफ कमी असते, मरमर काम कराव लागत आणि डॉक्टर भावनाशुन्य आणि अरसिक असतो असं माझ्या मेहुण्याच मत होतं. मी त्याला थोडा विरोध केला म्हणालो गिरीश ओक, श्रीराम लागू, हे सर्व डॉक्टर आहेतच पण ते नावजलेले अॅक्टर पण आहेत मग तू अरसिक कस काय म्हणू शकतो वगैरे वगैरे. त्या विषयावर फार काही चर्चा झाली नाही पण माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला कि जे वैद्यकीय शास्त्राशी निगडीत नाहीत अशा लोकांच्या मध्ये डॉक्टर बद्दल काय संकल्पना असाव्यात? डॉक्टरांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काय वाटत असाव?
आदर्श डॉक्टर कसा असावा याच बऱ्याच ठिकाणी वर्णन केलय आणि आम्हाला आमच्या गुरूंकडून बऱ्याचदा सांगण्यात येत. डॉक्टर नेहमी निट-नेटका असावा, त्याला/तिला वैद्यकीय ज्ञान असाव व त्याने/तिने त्याचे/तिचे ज्ञान काळाप्रमाणे अपडेट ठेवावे, पेशंटशी बोलताना त्याने/तिने सौम्य भाषा वापरावी, तो/ती चारित्र्यवान असावा/असावी. असे काही ठळक मुद्दे आहेत. बरेच जण या मुद्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात.
डॉक्टरांचं मुख्य काम असत ते आजारचे निदान करणे आणि त्याच्यावर उपचार करणे. वैद्यकीय शास्त्रात निदान करण्यावर खूप भर दिला जातो कारण बहुतांश उपचारामध्ये फारसा बदल होत नाही आणि योग्य निदान केल्यास पटकन उपचारही करता येते. आणखी एक महत्वाच काम असतं ते म्हणजे आजाराच प्रोग्नोसीस करणे म्हणजे आजार बरा होणार आहे कि बळकावत जाणार आहे, त्या पासून जीवाला धोका आहे कि नाही, बरा होण्यास किती काळ लागेल वगैरे. हे अत्यंत अवघड काम असतं कारण कोणती व्यक्ती/आजार कसा/कशी रियाक्ट करेल हे अनिश्चित असतं. या व्यतिरिक्त डॉक्टर ला पेशंटचं आणि नातेवाईकांच सांत्वन कराव लागत. काही कठोर निर्णयही घ्यायला लागतात. हे सर्व करायला डॉक्टरला स्वतःला भावनाशुन्य रहाव लागत पण तो शेवटी एक माणूसच आहे त्यामुळे मी असा म्हणतो कि त्याला स्वतःच्या भावनेवर्ती नियंत्रण ठेवावे लागते. बहुतांश डॉक्टर हे करत असतात, असं करताना बऱ्याच वेळा असा वाटता कि डॉक्टर मंडळी हे भावनाशुन्य व अरसिक असतात पण असं नसतं. त्याने/तिने बरेच दुखी चेहरे बघितलेले असतात, प्रत्यक्षात मृत्यूला बघितलेलं असतं, जीवनातले कटुसत्य त्याने जवळून बघितलेलं असत आणि त्याने/तिने हे सत्य स्वीकारलेलं असतं.
बऱ्याच डॉक्टरांना मी त्यांचे छंद जोपासताना पाहिलं आहे, कुणी चित्रकलेत आवड असते, कुणी पहाटे ४ ला उठून सतार वाजवतं, कुणी उठून जंगलात फोटो काढायला जातं, काही जण बायकामुलांना घेऊन फिरायला जातात, काही सिनेमा नाटक बघतात तर काही त्यात कामही करतात, असे बरेच छंद डॉक्टरांना असतात आणि कामाच्या व्यापातून ते ह्यासाठी वेळ काढतात.
सलग ७२-७२ तास काम करण्याची क्षमता कित्येक डॉक्टरांमध्ये असते. कस काय ही लोक तहानभूक विसरून असा काम करू शकतात, खूप पैसे मिळतात म्हणून? तस नाहीये त्याच कारण अस आहे कि त्यांच्यासाठी हे फक्त काम नसतं ते त्याचं एक PASSION असत, एखादा व्यक्ती आपल्यामुळे बरा होतोय, त्याच दुखण आपण कमी करतोय हि भावना, तो आनंद त्याला काम करण्यास प्रवृत्त करते आणि त्याच्या रुग्णांनी दिलेल्या अशिर्वादामधून त्याला काम करण्याची ताकद येत असते. एखाद्या गणिताचे कोडे सुटल्यावर जसा आनंद होतो तसा एका पेशंटच्या आजाराचे निदान झाल्यावर डॉक्टरला आनंद होतो. तो आनंद मी कित्येकदा आमच्या सरांच्या चेहऱ्यावर बघितलाय, जर का कोड सुटलं नाही तर अस्वस्थता पण बघितालीये.
खासगी आयुष्य डॉक्टरांना कमी मिळते हे थोड खरं आहे, इतर प्रोफेशनच्या व्यक्तींपेक्षा डॉक्टरांना सुट्टी कमी मिळते हेही खर आहे पण जी मिळते ती सुट्टी पूर्णपणे डॉक्टर आनंदाने लुटतो, जितकं शक्य असेल तितकं तो कुटुंबियांना वेळ द्यायचा प्रयत्न करत असतो. मी विचार केला कि इतर लोकांना किती वेळ मिळतो उदा; एखादा आय टी चा माणूस घ्या, तो आपल्या आपली गाडी किंवा कंपनीची गाडीतून २५-३० किमी रोज प्रवास करत कंपनीत जातो ८-१० तास काम करतो, जाण्या येण्यात आणि कामात दिवसाचे १२-१५ तास जातात, घरी आल्यानंतर तो किती वेळ देतो २-३ तास फार फार तर, उरलेल्या वेळात जेवणे, झोपणे आणि त्याचे प्रोजेक्ट चे काम सुरूच असते, कधी ओवर टाइम, तर कधी प्रोजेक्ट निमित्त प्रवास ह्या गोष्टी सुरूच असतात. असच डॉक्टरांचं असतं.
एक मात्र खर आहे कुठलही काम करताना त्या कामाची आवड लागते, डॉक्टरकी साठी तर ती अत्यंत गरजेची आहे. या प्रोफेशन मध्ये पैसे तर चिक्कार मिळतात पण त्या सोबत दुसऱ्याच दुखः कमी केल्याच समाधान ही मिळतं. या प्रोफेशन चा मी एक भाग आहे याचं मला समाधान आणि अभिमान आहे.
                                                -डॉ. सारंग कोकाटे 

Saturday, January 11, 2014

अतिरेक


Pediatrics(लहान मुलांचा विभाग) मध्ये पोस्टेड असतानाचा हा किस्सा आहे. त्या दिवशी माझी नाईट ड्यूटी होती. रात्री १० ते १ पर्यंत भरपूर पेशंट येऊन गेले होते. मी खूप थकलो होतो. रात्री १ वाजता मी झोपी गेलो मला पटकन झोप लागली, १/२ तासात फोन आला पलीकडून साउथ इंडिअन आवाज आला “सर पेशंट आया है”. मी उठलो आणि बघायला गेलो, एक गोरागुमटा माणूस तिच्या ३-4 वर्षाच्या लहान मुलीला घेऊन उभा होता, ती मुलगी पण गोरीपान, देखणी आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर झोपली होती. मी त्याला विचारले काय झालं? तो म्हणाला “डॉक्टर हि ना २ वेळा शिंकली, कधी ती अस शिंकत नाही हो, तिला सर्दी झालीये का बघा, निमोनिया तर नसेल ना?” मला प्रचंड राग आला, फक्त शिंकली म्हणून हा रात्रीच्या या वेळी घेऊन आला आणि माझी झोप खराब केली, आता त्या पोरीने शिंकू पण नये का? सकाळी उठून आला असता तर काही बिघडले असते का? वगैरे विचार माझ्या मनात आले. मनावर आणि रागावर ताबा ठेवत मी त्याला विचारले, एक दोन दिवस ती आजारी होती का, तर तो “ठणठणीत होती हो तासापूर्वी पण झोपेत २ वेळा शिंकली”. मी तिला तपासलं तिला काही झालं नव्हतं. मी त्याला म्हणालो ती व्यवस्थित आहे तिला काही झाल नाहीये ती व्यवस्थित आहे असा शिंकण नॉर्मल असू शकत. तो “अहो तिला आजाराची सुरुवात तर नसेल, तुम्ही तिला चांगले अँटीबायोटिक्स द्या. मी थोडा दटावूनच म्हणालो “अहो काही झाल नाहिये तिला कशाला विनाकारण औषधांचा मारा करायचा तिच्यावर.” सिस्टर ला सांगितलं बिल दे आणि पाठवून दे. मी परत झोपायला गेलो, १० मिनिटांनी सिस्टर चा परत फोन कि ते अजून गेले नाहीयेत. मी परत त्याला भेटलो, तो माझ्याशी भांडायला लागला “माझी मुलगी आजारी असताना तुम्हाला झोपावं कस वाटत, तुम्ही काही टेस्ट सांगितल्या नाहीत कि औषधं दिली नाहीत, तुम्ही तुमच्या सिनियर ला बोलवा.” मी माझ्या सिनियरला बोलावलं आणि त्याला सर्व सांगितलं. त्याने तपासलं आणि म्हणाला तसं घाबरण्यासारख काही नाहीये, तो परत काही टेस्ट करायच्या का, मग मात्र सिनियर ने त्याला नाईलाजास्तव एक्सरे काढायला सांगितला आणि ते बघून म्हणाला “एक्सरे नॉर्मल आहे घाबरण्यासारख काही नाहीये. मी एक औषध लिहून देतो ते २-३ दिवस द्या.” त्याने एक टोनिकचं नाव खरडलं आणि त्याला दिलं. तो बाप खुश होऊन निघून गेला. त्यानंतर सिनियर बोलला “बिचारी मुलगी माझी इच्छा नसताना केवळ तिच्या बापाच्या हट्टापायी तिला एक्सरे ला सामोर जाव लागलं.” आणि तो झोपायला गेला.
मला असा प्रश्न पडला कि याच्या(मुलीच्या बापाच्या) अश्या सवयीमुळे त्याला डॉक्टर्स तपासण्या सांगतात कि हल्ली अति तपासण्या करण्याच्या पद्धतीमुळे त्याला अशी सवय लागली. असो पण एवढ मात्र होत कि हा अतिरेक होता.

                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, January 9, 2014

दुखणं



Emergency मध्ये बरीच शांतता होती, संध्याकाळचे ५ वाजले होते, इतक्यात एक गाडी जोरात गेट मध्ये आली आणि २-३ लोकांनी एका मुलीला आणले. ती विव्हळत होती, मी त्यांना विचारलं काय झाल तर ते म्हणाले कालच हि आमच्या ऑफिसमध्ये झाडूपोच्यासाठी कामाला लागली आज तिला त्रास व्हायला लागला म्हणून घेऊन आलो. ती १६-१७ वर्षाची मुलगी होती, सावला रंग, चेहऱ्यावर भरपूर पावडर लावलेली, लाल लिपस्टिक, डोळ्यात काजळ घातलेलं, (ह्या पोरी इतकं काजळ का घालतात कळत नाही, मग त्या रांजणवाडी घेऊन येतात हॉस्पिटल मध्ये), लाल भडक नेल पॉलिश लावलेलं. मी तिला विचारलं काय होतंय तर ती विव्हळत म्हणाली पोट दुखतंय, छातीत दुखतंय, पाठ दुखतीये आणि दम पण लागलाय. ती तळमळत होती आणि तिच्या आजूबाजूला गर्दी खूप झाली होती. मी सर्वाना बाहेर काढलं. मी तिला तपासलं तिचे नाडीचे ठोके व्यवस्थित होते, ब्लड प्रेशर पण चांगलं होता कुठंच काही अब्नोर्मल नव्हतं. माझ्या लक्षात आलं कि हिला दुखतंय कमी पण ती खूप दुखतंय अस भासवत होती, पण मला त्याची खात्री करून घ्यायची होती म्हणून मी ECG आणि पोटाची सोनोग्राफी करायला सांगितलं, तिला एक पेनकिलरच इन्जेक्शन दिलं. ECG नॉर्मल होता सोनोग्राफीला थोडा वेळ लागणार होता. तिच्या ऑफिसमधल्या दोन बायका तिला धीर देत होत्या, १०-१५ मिनिटे गेली पण तिचं विव्हळण सुरूच होतं उलट ती जास्तच करत होती. तिच्या जवळची एक बाई आली आणि म्हणाली डॉक्टर जरा बघता का ती जास्तच विव्हळतिये, मी त्या बायकांना बाहेर बसवलं आणि त्या पोरीला विचारलं “कितवीला तू?”, ती “दहावीला”. विव्हळण सुरूच होतं. मी “ तुझ्या बॉयफ्रेंडच तुझ्याशी भांडण झालय का?”. जस मी अस विचारलं तस ती विव्हळायची थांबली (मी मनातल्या मनात म्हटलं आता औषध लागू पडलं.) आणि व्यवस्थित बोलायला लागली “नाही तस काय नाय”, मी म्हटल खर सांग नाहीतर तुझ्या आईवडिलांना सांगीन. ती मग पोपटासारखी बोलायला लागली “व्हय, माझं हाय पर दोन दिवस झालं त्यो माझ्याशी बोलना, कुणाला सांगू नका बर”. मी म्हणालो “ प्रेग्नेंट वैगेरे आहेस काय?”. ती परत “तस काय न्हाई”. मी म्हणालो खर सांग तुझी सोनोग्राफी होणार आहे त्यात मला समजेलं सगळ. ती म्हणाली “आमच्यात झालय पण तस काय न्हाई”. तिच्या सोनोग्राफीत तस काय नव्हतं, तिचे आईवडील आलेले त्यांना सांगितल काही घाबरण्यासारखं नाहीये आणि विटामिन च्या गोळ्या देऊन घरी पाठवलं. माझ्या सोबत CMO होता तो म्हणाला “ऐसा क्या बताया उसको बे कि वो चूप हो गयी”. मी म्हणालो “कूछ नही रे मैने सिर्फ उसके बॉयफ्रेंड को याद किया” आणि emergency मध्ये हशा पिकला.

Wednesday, January 8, 2014

टर्निंग पॅाईंट



आपण अधूनमधून आपल्या आठवणीत गर्क होत असतो, असचं एकदा जुन्या आठवणीनां उजाळा देत असताना एक घटना माझ्या डोळ्यासमोर आली. त्या घटनेने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं.
नवोदयमध्ये असतानाची गोष्ट आहे. मी त्या वेळी पौगंडावस्थेत होतो. ७वी ते ९वी मी अभ्यासात बराच मागे पडलो. मन extra-curricular activity मध्ये गुंतायचं, डान्स, नाटकं, तबलावादन इत्यादीमध्ये मी रमलो होतो. यात अभ्यास मात्र मागे पडला. मी २ वर्षे अभ्यासच नाही केला. कसाबसा मी पास व्हायचो. माझ्यापुढे काही उद्देश्य नव्हता आणि मी बेदरकारपणे वागत होतो. दहावी उजाडली पण माझं असच वागणं चालू होतं. मला माझ्या मित्रांनी भरपूर सांगितलं पण मी ऐकत नव्हतो, नोव्हेंबरला आमची प्रि-टेस्ट सुरु झाली. पहिल्या टेस्ट चा गणितचा रिझल्ट माझ्या वाढदिवसाला ११ डिसेंबर ला आला. मी फेल झालो होतो मला १०० पैकी १८ मार्क पडले होते. वर्गात माझा नंबर सगळ्यात शेवटी होता. मला फार वाईट वाटल होता पण मी हसत होतो. त्या वेळी आम्हाला गणित शिकवायला मणीकंदन सर होते, मुळचे केरळचे, बुटके, काळा रंग, अंडाकार चेहरा आणि बोलण्यात दाक्षिण्यात सूर. ते स्वभावाने खूप शांत होते कधी कुणाला जास्त रागवत नसत, पण त्या दिवशी ते माझ्यावर खूप चिडले. कदाचित मला हसताना बघून ते चिडले असावेत. ते मला म्हणाले “आज तेरा बर्थडे हे पर तुझे विश करने के बजाय मेरा तेरे को गाली देनेका मन कर रहा हे, कीस चीज कि तुम्हे हसी आ रही हे. तुम्हे क्या लगता हे तुने बहोत बडा काम किया है. तुझमे बोहोत talent है पर तुम्हारे ऐसे बरताव के कारण तुम अपनी जिंदगी बरबाद करणे वाले हो. ऐसे जीयोगे तो तेरे जिंदगी का कोई मतलब नही रहेगा, समाज के लिये तुम एक बोज बनके रहोगे.”
मला हे शब्द खूप बोचले. त्या दिवशी मी रात्रभर विचार करत होतो, माझी झोप उडाली होती.
दुसर् या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो म्हणालो “सर मै पुरी मेहनत करुंगा, पढाई करुंगा क्या आप मेरा एक्स्ट्रा क्लास लेंगे?” ते म्हणाले “तुम बस शुरू हो जाये तुझे गणित सिखाने कि जिम्मेदारी मेरी.”
मी मग जोमाने गणित शिकायला लागलो, माझे ८ वी आणि ९ वी चे बेसिक कच्चे होते ते सर पक्के करून घेत होते. या शिकण्यात अमृत म्हणून माझा मित्र होता त्याने खूप मदत केली. महिनाभर चांगला अभ्यास केला आणि १ महिन्याने दुसरी टेस्ट दिली. त्या टेस्ट मध्ये मला १०० पैकी ७५ मार्क्स पडले. माझ्याकडे बघून सर म्हणाले “देखा तुम्हारी क्या ability है.” आणि माझी पाठ थोपाटली.
त्या दिवशी जाणीव झाली मला माझ्या क्षमतेची, त्या वेळी आत्मविश्वासाची लहर माझ्या मनामध्ये दौडू लागली. पुढे १० वी च्या बोर्ड परीक्षेला मला distinction मिळाले.
गणित माझा एक आवडीचा विषय बनला, इतका कि ११-१२ वीत मला गणितातील एक हुशार विद्यार्थी म्हणून लोक ओळखायला लागले. खरंतर या आत्मविश्वासाच्या जोरावरच मी मेडिकलला अॅडमिशन मिळवली. मी २nd MBBS ला असताना माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी माझ्याकडे आली आणि माझ्याकडे ३rd B. Sc चा गणितच पुस्तक देऊन म्हणाली मला यातले काही चाप्टर समजले नाहीत ते मला समजावून सांग. मी म्हणालो ‘अगं हे मी शिकलेलो नाही तर मला कस येणार’. ती म्हणाली ‘तू हे पुस्तक वाच, तुला ते समजेल मग मला समजावून सांग.’ आणि मला ते समजल, मी तिला शिकवलं. हे सर्व फक्त मणीकंदन सरांमुळे शक्य झालं. त्या दिवशी जर मला ते काही बोलले नसते, मला शिकवलं नसत तर कदाचित मी एक डॉक्टर सोडाच पण सायन्स ग्रॅजुएट पण नसतो झालो. एक टुकार पोरगा झालो असतो. निश्चितच ही घटना माझ्यासाठी टर्निंग पॅाईंट ठरली आहे. आत्ताही जर मला माझ्या क्षमतेवर शंका यायला लागली तर मी ही घटना आठवतो आणि आत्मविश्वासाने कामाला लागतो
                                                 -डॉ. सारंग कोकाटे