Wednesday, January 8, 2014

टर्निंग पॅाईंट



आपण अधूनमधून आपल्या आठवणीत गर्क होत असतो, असचं एकदा जुन्या आठवणीनां उजाळा देत असताना एक घटना माझ्या डोळ्यासमोर आली. त्या घटनेने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं.
नवोदयमध्ये असतानाची गोष्ट आहे. मी त्या वेळी पौगंडावस्थेत होतो. ७वी ते ९वी मी अभ्यासात बराच मागे पडलो. मन extra-curricular activity मध्ये गुंतायचं, डान्स, नाटकं, तबलावादन इत्यादीमध्ये मी रमलो होतो. यात अभ्यास मात्र मागे पडला. मी २ वर्षे अभ्यासच नाही केला. कसाबसा मी पास व्हायचो. माझ्यापुढे काही उद्देश्य नव्हता आणि मी बेदरकारपणे वागत होतो. दहावी उजाडली पण माझं असच वागणं चालू होतं. मला माझ्या मित्रांनी भरपूर सांगितलं पण मी ऐकत नव्हतो, नोव्हेंबरला आमची प्रि-टेस्ट सुरु झाली. पहिल्या टेस्ट चा गणितचा रिझल्ट माझ्या वाढदिवसाला ११ डिसेंबर ला आला. मी फेल झालो होतो मला १०० पैकी १८ मार्क पडले होते. वर्गात माझा नंबर सगळ्यात शेवटी होता. मला फार वाईट वाटल होता पण मी हसत होतो. त्या वेळी आम्हाला गणित शिकवायला मणीकंदन सर होते, मुळचे केरळचे, बुटके, काळा रंग, अंडाकार चेहरा आणि बोलण्यात दाक्षिण्यात सूर. ते स्वभावाने खूप शांत होते कधी कुणाला जास्त रागवत नसत, पण त्या दिवशी ते माझ्यावर खूप चिडले. कदाचित मला हसताना बघून ते चिडले असावेत. ते मला म्हणाले “आज तेरा बर्थडे हे पर तुझे विश करने के बजाय मेरा तेरे को गाली देनेका मन कर रहा हे, कीस चीज कि तुम्हे हसी आ रही हे. तुम्हे क्या लगता हे तुने बहोत बडा काम किया है. तुझमे बोहोत talent है पर तुम्हारे ऐसे बरताव के कारण तुम अपनी जिंदगी बरबाद करणे वाले हो. ऐसे जीयोगे तो तेरे जिंदगी का कोई मतलब नही रहेगा, समाज के लिये तुम एक बोज बनके रहोगे.”
मला हे शब्द खूप बोचले. त्या दिवशी मी रात्रभर विचार करत होतो, माझी झोप उडाली होती.
दुसर् या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो म्हणालो “सर मै पुरी मेहनत करुंगा, पढाई करुंगा क्या आप मेरा एक्स्ट्रा क्लास लेंगे?” ते म्हणाले “तुम बस शुरू हो जाये तुझे गणित सिखाने कि जिम्मेदारी मेरी.”
मी मग जोमाने गणित शिकायला लागलो, माझे ८ वी आणि ९ वी चे बेसिक कच्चे होते ते सर पक्के करून घेत होते. या शिकण्यात अमृत म्हणून माझा मित्र होता त्याने खूप मदत केली. महिनाभर चांगला अभ्यास केला आणि १ महिन्याने दुसरी टेस्ट दिली. त्या टेस्ट मध्ये मला १०० पैकी ७५ मार्क्स पडले. माझ्याकडे बघून सर म्हणाले “देखा तुम्हारी क्या ability है.” आणि माझी पाठ थोपाटली.
त्या दिवशी जाणीव झाली मला माझ्या क्षमतेची, त्या वेळी आत्मविश्वासाची लहर माझ्या मनामध्ये दौडू लागली. पुढे १० वी च्या बोर्ड परीक्षेला मला distinction मिळाले.
गणित माझा एक आवडीचा विषय बनला, इतका कि ११-१२ वीत मला गणितातील एक हुशार विद्यार्थी म्हणून लोक ओळखायला लागले. खरंतर या आत्मविश्वासाच्या जोरावरच मी मेडिकलला अॅडमिशन मिळवली. मी २nd MBBS ला असताना माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी माझ्याकडे आली आणि माझ्याकडे ३rd B. Sc चा गणितच पुस्तक देऊन म्हणाली मला यातले काही चाप्टर समजले नाहीत ते मला समजावून सांग. मी म्हणालो ‘अगं हे मी शिकलेलो नाही तर मला कस येणार’. ती म्हणाली ‘तू हे पुस्तक वाच, तुला ते समजेल मग मला समजावून सांग.’ आणि मला ते समजल, मी तिला शिकवलं. हे सर्व फक्त मणीकंदन सरांमुळे शक्य झालं. त्या दिवशी जर मला ते काही बोलले नसते, मला शिकवलं नसत तर कदाचित मी एक डॉक्टर सोडाच पण सायन्स ग्रॅजुएट पण नसतो झालो. एक टुकार पोरगा झालो असतो. निश्चितच ही घटना माझ्यासाठी टर्निंग पॅाईंट ठरली आहे. आत्ताही जर मला माझ्या क्षमतेवर शंका यायला लागली तर मी ही घटना आठवतो आणि आत्मविश्वासाने कामाला लागतो
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

No comments: