Tuesday, May 6, 2014

संवाद


संध्याकाळची वेळ होती, मी आणि ती (बायको) सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल बघून सारस बागेजवळून जात होतो. तिला पावभाजी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे गेलो. नेहमीप्रमाणे गर्दीतून गाडी काढत तिथे पोचलो. तिथं पावभाजीच्या दुकानदारांची खूप मोठी कॉम्पिटिशन चालू असते. प्रत्येकजण इकडे-इकडे म्हणून गिऱ्हाईकांना ओढत असतात. आम्ही विचार करत होतो कुठल्या दुकानावर जाऊन बसाव; इतक्यात एक मुलगा माझ्या गाडीच्या समोर आला, “साहेब इथं लावा गाडी आणि या बसा”. मी गाडी लावली आणि आम्ही दोघं टेबल खुर्ची लावली होती तिथं बसलो. काही सेकंद गेले. “काय खाणार पोरांनो” असा एक गावरान आवाज कानावर पडला. आमच्या शेजारी एक ७०री गाठलेला एक माणूस उभा होता. घोगरा आवाज, गावरान लहेजा (बहुतेक खानापूर, पानशेत भागातला असावा, मी अंदाज बांधत होतो), पांढरी खुंट वाढलेली दाढी, तिरकी मळकट गांधी टोपी, पांढरा कुर्ता (तोही मळलेला), सुरकुतलेला काळपट पण हसरा चेहरा आमच्याकडे बघत होता. मी विचारलं काय काय आहे. इतक्यात ती म्हणाली “मला फक्त पावभाजी पाहिजे”. (बहुतेक पावभाजी खायचा पक्का निर्णय केला असावा)
एक पावभाजी मी ऑर्डर दिली, तो “तुम्हासनी काय द्यायचं”. मला काही भूक नव्हती, मी ज्यूस मागवला. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आणली. न सांगता त्याने बटर मध्ये भाजलेले २ जास्तीचे पाव त्याने मुद्दाम ठेवले, “लागले तेव्हढे खा म्हणाला”.(जास्तीचे पाव खपवायची चांगली कल्पना होती) काही वेळ गेला मी त्याला विचारले “कुठं राहता तुम्ही? कुठल्या गावचे?” तो म्हणाला “इथंच राहतो पर्वतीच्या पायथ्याला, लहान होतो तवाच आईबाप गेले. अनाथ झालो, इकडची तिकडची कामं करून पोट भरायचो, गेल्या ३० वर्षांपासून इथ कामाला हाय, आधी ह्या मालकाचा बा होता त्यान रहायला एक खोपी दिली, पोटा पाण्यापुरता पगार हाय हो साहेब.” त्याची टेप सुरु झाली “एवढा म्हातारा झालो तरी बी एकदा सुदिक दवाखान्याची पायरी चढलो न्हाय बघा; बॉडी एकदम टकाटक. इथंन पुढं बी न्हाई चडणार. मेलो तरी चालल”. मी विचारलं असं का? तो म्हणाला “मग काय, हि डॉक्टर लोकं नुस्त लुटत्यात, अवं शेजारच्या अमक्या अमक्याच्या बा च्या छातीत दुखायला लागलं तवा त्याला अॅडमीट केलता, त्याच्या नाकातोंडात नळ्या घातल्या, चार ठिकाणी सुया घातल्या आणि  नुसती औषधं चालू पर काय फायदा तो जायचा तसा गेला. त्याच्या मुलान ४ लाखांचं कर्ज काढलं आता बसलाय आयुष्यभर फेडत. त्या डॉक्टरांनी आधीच सांगितलं असतं कि त्यो न्हाई वाचणार म्हणून तर एवढा खर्च झाला असता का त्याचा. डॉक्टर काय आपली तिजोरी भरेपर्यंत सांगतोय बघू, होईल, प्रयत्न चालू आहेत म्हणून, जवा तिजोरी भरली तवा सांगतोय काय होणार न्हाय म्हणून. त्याचा बाप तर गेलाच पर पैसा बी गेला. ह्या डॉक्टर माणसाचं काय खर नसतंय त्यांच्या नादी न लागलेलं बर.” मला त्याने एक सणसणीत कानफटीत मारल्याची भावना झाली. त्याच्या मनावर डॉक्टर म्हणजे पैसे लुटणारा माणूस हि संकल्पना ठासून भरली होती. हे ऐकताना मी तिच्याकडे(बायकोकडे) बघितले, ती माझ्याकडेच बघत होती कि आता माझा काय रिप्लाय असेल. मी एक डॉक्टर आहे हे त्याला सांगायची माझी हिम्मत झाली नाही. मी त्याच्या बोलण्यावर फक्त हसलो आणि त्याला बिल दिले सोबत ५० रुपये टीप पण दिली. कदाचित त्याला एका डॉक्टरकडून खुश करायचा एक छोटासा प्रयत्न असावा तो. ती मात्र माझ्यावर चिडली तुला काय कळतं का? असो टीप घेऊन तो मात्र खुश झाला म्हणाला इथनं पुढ कधी बी इकडं आलात कि इथच यायचं, ह्यो म्हातारा तुमच्या सेवेला इथंच सापडल.
ती घटना माझ्या मनातून काही जाईना. मी विचारात पडलो का बर ह्याला डॉक्टर बद्दल एवढी चीड निर्माण झाली? खरंच त्या डॉक्टर ने तिजोरी भरेपर्यंत त्या मुलाला लुटलं असेल का? नक्की काय झालं असाव? कुठं चुकलं असावं?
मला असं वाटत कि चुकतो तो संवाद. एखादा पेशंट अतव्यस्थ असतो, मरणाच्या दारावर असतो तर त्या पेशंट्स च्या नातेवाईकांशी डॉक्टरने पुरेसा वेळ देऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना पेशंट्स च्या प्रकृतीबद्दल स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. ते त्या पेशंट बद्दल काय निदान करतात, काय तपासण्या करतात आणि नेमकी काय उपचार पद्धती अवलंबतात या बद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. विशेष म्हणजे या सर्व प्रयत्नात किती खर्च येऊ शकतो, किती प्रमाणात अपयश येण्याची शक्यता असते हे पण सांगण गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हंजे आपला जवळचा कुणी मृत्यूमुखी पडू शकतो ही कल्पनाच कुणी करू शकत नाही, त्यापेक्षा हे सत्य सहजासहजी स्वीकारले जात नाही. बहुतांश लोकांचा आता समज असतो कि आता हॉस्पिटल ला घेऊन आलोय तर होईल सगळे व्यवस्थित. खरी गोष्ट अशी आहे कि मृत्यू हा अटळ आहे. कधी ना कधी तो येणारच आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, जगातल्या सर्वात भारी दवाखाने फिरा किंवा भारी डॉक्टरांचा उपचार अवलंबवा त्या पासून काही सुटका नाही. जेंव्हा केंव्हा गंभीर रुग्णावर डॉक्टर उपचार करत असतो तेंव्हा तेंव्हा त्याने/तिने त्या रुग्णाच्या एकंदरीत परिस्थितीची कल्पना स्पष्टपणे नातेवाईकांना देणे गरजेचे आहे. कोणत्या उपचारपद्धती मुळे रुग्णाला फायदा होईल, बरा होण्याची शक्यता किती आणि त्यातून त्याचा खर्च किती या सगळ्या बाबी विचारात घेऊन उपचार केले पाहिजे. त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले पाहिजे. थोडासा संवाद अश्या संवेदनशील गोष्टीसाठी आवश्यक असतो, नाही का?
डॉ. सारंग कोकाटे
९४० ४९५ ४७४३

Post a Comment